बाळासाहेब भिलारे हे पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी सातत्याने पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.
भिलार (सातारा) : बाळासाहेब भिलारे हे पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी सातत्याने पक्षाला बळकटी देण्याचे काम केले. आमदार शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांची मश्वर तालुक्याची संपूर्ण जबाबदारी भिलारे दादांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.दादांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांबरोबर पक्षाची हानी झाली असून दादांचे ऋण पक्ष कधीही विसरू शकणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब भिलारे यांना श्रद्धांजली वाहिली. महाबळेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अजित पवार भिलार येथे आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, प्रदीप विधाते, राजेंद्र शेठ राजपुरे, अमित कदम, सभापती संजूबाबा गायकवाड, बाबुराव संकपाळ, अंजनाताई कदम, गॅब्रीयल फर्नांडिस, सरपंच शिवाजी भिलारे, प्रवीण भिलारे, सुरेंद्र भिलारे, किसन भिलारे, जतीन भिलारे, नितीन भिलारे व ग्रामस्थ उपस्थित होते.अजितदादा पुढे म्हणाले, दादांनी सुरू केलेले पुस्तकाचे गाव, दुर्गम मश्वर तालुका विकसित करण्याचे स्वप्न आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पुढे सुरू ठेवा, त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. दरवर्षी मश्वर तालुक्याला साडेतीन कोटी पर्यटक भेट देतात. मश्वर हे आमच्या सर्वांचं आवडत पर्यटन केंद्र आहे. भिलारेदादा मश्वर तालुक्यात सातत्याने विकासकामे करत होते.दुर्गम मश्वर तालुक्यातील वाडीवस्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम दादा करीत राहिले. तालुक्याची विकासात्मक जडणघडण करण्याचे काम दादा अहोरात्र करत होते. सुरुर-पोलादपूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देण्यास सांगितले आहे. लवकरच या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग बनण्याचा मार्ग मोकळा होईल. या कामाला पहिले प्राधान्य देऊन बाळासाहेब भिलारे यांचे विकासाचे स्वप्न साकार करू, असेही पवार यांनी शेवटी सांगितले.