साखर खाल्लेला माणूस अशी ओळख असणारे अभिनेते प्रशांत दामले Prashant Damle त्यांच्या विनोदबुद्धीसाठी आणि हजरजबाबीपणासाठी अनेकदा चर्चेत असतात. खवय्येगिरीचे कार्यक्रमही सहज रंगवणारे आणि मराठी नाटकं सातासमुद्रापार नेणारे प्रशांत दामले यांनी फेसबुकवर नुकतीच एक पोस्ट लिहिली. भावी रंगकर्मींच्या कार्यशाळेबाबत ही पोस्ट होती. मात्र या पोस्टवरील एका कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. टुकार मालिका कशा बंद होतील, असा प्रश्न एकाने दामलेंना विचारला. त्यावर दामलेंनीही भन्नाट उत्तर दिलं आहे.
मालिकांविषयी प्रश्न विचारणाऱ्या त्या नेटकऱ्याला इतरांनीही मजेशीर उत्तरं दिली. मात्र प्रशांत दामलेंनी दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा आहे. टुकार मालिका कशा बंद होतील, या प्रश्नावर दामले म्हणाले, ‘बघणं बंद केलं की’. त्यांच्या या उत्तरावर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.
दामलेंचं हे उत्तर मात्र एका नेटकऱ्याला खटकलं. ‘बघणं बंद केलं की, हे जरी बरोबर उत्तर असलं तरीही उचित नाही. हे म्हणजे पुण्याच्या दुकानदारासारखे वागणे झाले (उगाचंच पुण्याचे आपले नाव). वस्तू घेणार तर घ्या, नाहीतर चालायला लागा. मग उत्तराला असभ्यपणाचा वास आला तरी फिकिर नाही,’ अशा शब्दांत संबंधित नेटकऱ्याने नाराजी व्यक्त केली. त्यावरही दामलेंनी विचारपूर्वक उत्तर दिलं. ‘जे माझ्या हातात नाही किंबहुना कोणाच्याच हातात नाही त्या प्रश्नाला अजून काय उचित उत्तर असू शकतं भाऊ?,’ असं ते म्हणाले.
हेही वाचा: BBM3 : “ती खूप काही शिकवून गेली”; विशाल निकम भावूक

प्रशांत दामले सध्या विविध कार्यशाळांच्या माध्यमातून अभिनयाचे धडे देत आहेत. त्यांच्या या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ४८६ जणांनी इच्छा दाखवली होती. त्यातून ३१ जणांना निवडून त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यावर ते तीन महिने काम करणार आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई, आंबेजोगाई , नागपूर, नाशिक, तुळजापूर, गडचिरोली, उस्मानाबाद इथून हे भावी रंगकर्मी आल्याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.
Esakal