किरकटवाडी – खडकवासला पाटबंधारे विभागात काही वर्षांपासून सुमारे पन्नास टक्के पदे रिक्त असल्याने सद्यःस्थितीत अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर कार्यालयीन कामकाज सुरू आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.
खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, पानशेत व वरसगाव ही धरणे आणि खडकवासला धरणापासून लोणी काळभोरपर्यंत पंचेचाळीस किलोमीटर अंतराच्या कालव्याचा समावेश आहे. काही वर्षांपासून कर्मचारी भरती होत नसल्याने एकूण ३५४ मंजूर पदांपैकी तब्बल १७२ पदे रिक्त आहेत. परिणामी सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
वयाने अपात्र ठरताहेत उमेदवार
२००९ पासून अनुकंपा तत्त्वानुसार नोकरभरती न झाल्याने शेकडो उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. या यादीतील अनेक उमेदवार वयोमानानुसार अपात्र ठरत आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वानुसार भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
सद्यःस्थितीत सर्वच ठिकाणी पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया ही शासन स्तरावरून राबवली जाते. सरळसेवा किंवा अनुकंपा तत्त्वानुसार भरती प्रक्रियेबाबत काहीही सांगता येत नाही.
– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
Esakal