पुणे : शहरात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आता सुरू झाले आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेतील फळे, बाके आणि भिंतीनाही विद्यार्थ्यांच्या सहवासाने पुन्हा एकदा जाणिवांचा जीवंतपणा लाभला आहे. कोरोनाची रूग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला, परंतू, अजूनही कोरोनाचे सावट पुर्णतः दूर झालेले नाही. आपल्या शाळेत कोरोना बाधित आढळल्यास नक्की काय करावे, सरकारचे निर्देश नक्की काय आहे, याचाच घेतलेला हा आढावा…!

वर्गात कोरोना बाधित विद्यार्थी सापडल्यास ः
– सर्दी, ताप, खोकला आणि घसा खवखवणे आदी लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्याने घरी थांबून अलगीकरणात थांबावे
– कोरोना चाचणी सकारात्मक आल्यास विद्यार्थ्याला घरी किंवा रूग्णालयात विलगीकरणात ठेवावे
– बाधिताच्या संपर्कातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करावी
– संबंधीतांनी शाळेत जाऊ नये

शिक्षकांनी काय करावे..
– घरात कोणी आजारी असल्यास शाळेत जाऊ नये
– मास्क आणि शारिरिक अंतराचे कडक पालन करावे
– स्टाफ रूम आणि जेवणाच्या वेळी अंतर ठेवून वागावे

तर शाळा बंद होणार…
१४ दिवसांच्या कालावधीत शाळेतील बाधितांची संख्या पाच टक्क्यांच्या वर किंवा १० च्या वर गेल्यास शाळा बंद करण्यात याव्यात. यामध्ये विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकांची संख्याही सामाविष्ट आहे.

”प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असून, सौम्य लक्षणे आढळली तरी पालकांशी बोलून विद्यार्थ्याची काळजी घेण्याचे आव्हान शिक्षकांवर आहे. आम्ही प्रात्यक्षिकांनी शाळेची सुरवात केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना कमी गटांच्या संख्येने शाळेत बोलविणे शक्य होईल. ”
– डॉ. राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

”पालकांनीही पाल्य आजारी असल्यास शाळेत पाठवू नये. वर्गात आजारी विद्यार्थी आढळल्यास घाबरून न जाता, त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. तसेच शिक्षकांनीही या काळात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ”
– डॉ. प्रमोद जोग, सदस्य, बालरोग तज्ज्ञांचा विशेष कार्यगट

काळजी आवश्यकच...
कोरोनाच्या सावटाखाली शाळा चालू करताना प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. वेळोवेळी वर्ग, स्वच्छतागृहांची निर्जंतुकीकरणाबरोबरच वैयक्तीक पातळीवर मास्क, सॅनिटायझर आणि शारिरिक अंतराचे नियम पाळण्यासंबंधी शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. परंतू, एवढी काळजी घेऊनही संसर्गाची भिती नाकारता येत नाही. अशा वेळी गाईडलाईनही जाहीर करण्यात आल्या आहेत.
Esakal