पाली – राज्य सरकारने गुरुवार (ता. 7) पासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर मंदिर देखील दर्शनासाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. मंदिर उघडणार म्हणून भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करणाऱ्यांनाच बाप्पाचं दर्शन दिले जाणार आहे. शासन नियम न पाळणाऱ्यांना दर्शन घेता येणार नसल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ऍड धनंजय धारप यांनी बुधवारी (ता. 6) दिली.

यावेळी धनंजय धारप म्हणाले, की मंदिर परिसरात प्रवेशद्वारावर प्रवेश करताच हॅण्ड सॅनिटायझर व थर्मल स्कॅनिंग होणार आहे. प्रत्येक भाविकाला मास्क अनिवार्य असणार आहे. सभा मंडपात प्रत्येक भाविकांमध्ये अंतरासाठी सहा फुटांवर गोल सर्कल करण्यात आले आहेत. यामध्ये बसूनच भाविक दर्शन घेऊ शकतील. कुठेही गर्दी किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देवस्थान ट्रस्टचे सुरक्षा रक्षक बंदोबस्त करिता तैनात आहेत.

मंदिरात आतमध्ये प्रवेश व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची सोय केली आहे. मुख्य गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाही. सभा मंडपातूनच भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था केली आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शासन नियमांचे पालन करून ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष ऍड. धनंजय धारप यांनी केले आहे.

दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नियम व अटी

१) मंदिरात प्रवेशासाठी व मंदिरातून बाहेर पडण्यासाठी सभामंडपातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील एक दरवाजा उघडा राहील व अन्य सर्व दरवाजे बंद राहतील.

२) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी दर्शन रांगेतून येऊन उत्तरेकडील दरवाज्यातून सभामंडपात प्रवेश करण्याचा असून सभा मंडपातील नेमलेल्या जागेतून श्री. बाप्पाचे दर्शन घेण्याचे आहे, व दक्षिणेकडील दरवाज्यातून बाहेर पडण्याचे आहे.

३) पुढील निर्णय होईपर्यंत श्रींचे मंदिराचे उंदीर गाभा-यात व मुख्य गाभा-यात संस्थेच्या अधिकृत पूजारी / कर्मचारी व संबंधीत सेवेकरी गुरव यांचे शिवाय अन्य कोणासही प्रवेश दिला जाणार नाही.

४) पुढील निर्णय होईपर्यंत आंतर गाभा-यातील प्रत्यक्ष पूजा बंद ठेवण्यात आल्या आहेत . त्याचप्रमाणे सोवळे नेसलेल्या व्यक्तीस देखील उंदीर गाभारा व आंतर गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही.

५) श्री बाप्पाचे मंदिरात गर्दी टाळण्यासाठी या वर्षी काकड आरती होणार नाही .

६) मंदिरात दर्शनास येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करणे अनिवार्य असेल मास्क नसलेल्या भाविकांस मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे दहा वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीक व गर्भवती महिलांना मदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वरील सर्व अटी व शर्ती भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here