कृषी जैवविविधतेकडे फक्त आपल्याकडे काहीतरी नष्ट होत चालले आहे आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही. संवर्धन, लागवड, आहारात आणणे आणि विक्री अशा चतुःसूत्री कार्यक्रमाची गरज आहे आणि हे करत असताना संशोधन आणि स्थानिक शहाणपण ही महत्त्वाची अंगे असली पाहिजेत. विकासाचा एकांगी विचार सोडून सर्वसमावेशक सहभागी पद्धतीने कृती कार्यक्रम आखणे गरजेचे आहे.

संत ज्ञानेश्‍वरांच्या ओव्यांमध्ये आपल्याला कृषिदर्शन आढळते. यामध्ये बियाणे, जमीन, मशागत, साठवणूक, पेरणी, कापणी यांचा अंतर्भाव आढळतो. एका ओवीत माउली म्हणतात,

मुंडा हूनी बीज काढीले,

मग निर्वाळालिये भूमी पेरिले

तरी ते सांडी विखुरी गेले,

म्हणो ये कायी?

बियाणे म्हणून वापरायचे धान्य पूर्वीच्या काळी वेगळे साठवून ठेवत असत. ‘मुडा’ हे बियाणे साठवणूक करण्यासाठी बांबूपासून बनविलेले खोलगट आकाराचे पात्र. चालू हंगामातील असलेल्या पिकातील, निरोगी, उत्तम, टपोऱ्या दाण्यांची निवडक कणसे हेरून ठेवीत असत आणि अशी कणसे पक्व झाल्यावर बाजूला स्वतंत्र काढणी करून ती घरात वाळण्यासाठी आढ्याला टांगून ठेवत. वाळल्यावर ती निराळी झोडपून तयार झालेले टपोरे दाणे पुढच्या पेरणी हंगामापर्यंत वेगळे कणगीत किंवा मुड्यात साठवून ठेवीत. साठवून ठेवलेल्या बियाण्याला कीड लागू नये, म्हणून वाळलेली कडुलिंबाची पाने व राख त्या बियाण्याच्या दाण्यात मिसळून ठेवीत व कणगीचे तोंड शेणाने लिंपून हवाबंद करून ठेवत. असे निरोगी बियाणे पुढच्या हंगामात वापरत.

भारत जगातील १७ जैवविविधता समृद्ध देशामध्ये गणना जातो. जगातील ८ पीक वाण समृद्ध देशामध्ये अव्वल भारतात वनस्पतींच्या आणि बुरशीच्या जवळजवळ ४९ हजार जाती (जगातील ११ टक्के प्रमाण) आहेत.

गरज स्थानिक वाणसंवर्धनाची

जागतिक अन्न संघटनेच्या अभ्यासानुसार, जगभरातील विविध पिकांमधली जैवविविधता सुमारे ७५ टक्क्यांनी संपुष्टात आली आहे आहे. जगभरात आढळणाऱ्या सुमारे ४ लाख वनस्पती प्रजातींपैकी फक्त ३० प्रजाती आज जगाला मुख्यत्वेकरून अन्न पुरवतात आणि सुमारे ६० टक्के अन्नपुरवठा हा तांदूळ, गहू आणि मका या तीन पिकांमधून होतो. यावरून आपण वैविध्याकडून एकपिक पद्धतीकडे किती वेगाने जातोय त्याचा अंदाज येईल. आणि ह्या पिकामध्ये त्यामध्येसुद्धा बोटांवर मोजता येणाऱ्या जाती शिल्लक आहेत. आज ‘अन्नसुरक्षा’ हे उद्दिष्ट आज साध्य झालेले दिसत असले, तरी ‘पोषणसुरक्षा’ हे नवीन आव्हान उभे राहिले आहे. या समस्येला तंत्रज्ञानाकडेही समाधानकारक आणि कायमस्वरूपी उत्तर नाही. सरकारी आकडेवारीनुसार भारतात १५.२ टक्क्यांवर लोकसंख्या कुपोषणाने ग्रस्त आहे. वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलाने कृषी उत्पन्न ४.५ ते ९ टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती आसीएआरने व्यक्त केली आहे. संस्थने पोषण सुरक्षा साधण्यासाठी विविध पिकांचे १७ Biofortified वाण विकसित केले आहेत. (भात, मका, गहू, मोहरी इत्यादी) त्याचबरोबर मागील आठवड्यात आयसीएआरमार्फत पंतप्रधानांच्या हस्ते तूर, सोयाबीन, भात, हरभरा इत्यादी पिकांचे वातावरण बदलात तग धरणारे आणि पोषण समृद्ध असे ३५ वाण प्रसारित केले आहेत.

पोषणमूल्ये आणि स्थानिक वाण

पारंपरिक वाणांमधून केवळ ‘उत्पादन कमी’ एवढ्या एकाच दृष्टिकोनातून न बघता त्यांच्यामधून शरीराला मिळणारी पोषणमूल्ये, पूर-दुष्काळ अशा तीव्र वातावरणांमध्ये तग धरण्याची त्यांची क्षमता, कमी खर्च, कीड-प्रतिबंधक क्षमता अशा सगळ्या गुणवैशिष्ट्यांचा वैज्ञानिक अभ्यास आणि पारंपरिक ज्ञान संकलन केल्यानंतर आपल्याला ही वाण टिकवण्याची गरज का आहे ते कळतं. उदाहरणार्थ, सातपुडयाच्या पर्वतरांगांमध्ये उतारावर पिकवले जाणारे ‘मोर बंटी’ हे भरड धान्य पीक कुठल्याही खताशिवाय नुसत्या पावसाच्या पाण्यावर येते, त्यात १३ टक्के तंतूमय पदार्थ, लोह आणि फॉस्फरस अशी पोषण समृद्धी आढळते. अकोले तालुक्यातले ‘कडू वाल’ हे पीक नुसत्या जमिनीतल्या ओलाव्यावर चांगले उत्पादन देते आणि किडींना प्रतिकारक आहे.

महाराष्ट्रातल्या पुणे, नगर जिल्ह्यांत घेतला जाणारा ‘कुसळी गहू’ ‘बोडका गहू’; यांना ‘बिनपाण्याचा गहू’ असेही म्हणतात, कारण तो कमी पावसाच्या प्रदेशात ओलाव्यावर उत्तम पिकतो. पालघर आणि नगर जिल्ह्यातील डोंगराळ भागांत ३००० ते ३५०० मी.मी. पावसात तग धरणार ‘झिपरी’ आणि ‘उतावळी’ हे ज्वारीचे वाण आढळते. जव्हार तालुक्यातील लोक सांगतात, की १९७२च्या दुष्काळात ते काही दिवस झिपरी ज्वारीची आंबिल पिऊन जगले! या आंबिलीच्या सेवनाने तहान कमी लागते आणि शेतात काम करताना ऊर्जा टिकून राहते. ‘हुलगा किंवा कुळीथ’ हे पीक आता अत्यंत दुर्मिळ झाले आहे, जे प्रोटिनचा सर्वोत्तम स्रोत आहे.

मुतखडा, ताप यांमध्ये ‘हुलग्याच्या कढणा’चा अनेक पिढ्यांपासून स्थानिक लोक उपयोग करत आले आहेत. ‘महाडी’ भाताची पेज आणि भाकरी बाळंतीण महिलांना अत्यंत उपयोगी आहे. धान्य उत्पादनाबरोबरच चारा उपलब्धता, वातावरण बदलात तग धरण्याची क्षमता, त्यापासून बनविण्यात येणारे विविध पदार्थ, औषधी उपयोग इत्यादीचाही जाणीवपूर्वक विचार होणे गरजेचे आहे.

भरड धान्ये : पोषणाचे भांडार

भरड धान्ये, ज्यामध्ये नाचणी, वरई, सावा, कांग, मोर बंटी ह्यांचा समावेश होतो, काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना गरिबांची पिके म्हटले जात होते. मात्र, आता वातावरण बदल आणि पोषण समृद्धीसाठी त्यांना भविष्य काळाची पिके म्हणून संबोधले आहे.

राष्ट्रीय जनुक कोश

दिल्लीमध्ये नॅशनल ब्युरो ऑफ प्लॅंट जेनेटिक रिसोर्सेस (NBPGR) येथे भारत सरकारचा ‘राष्ट्रीय जनुक कोश’ असून, त्यात देशभरातील विविध पिकं, जंगली वनस्पती, कंद इत्यादींच्या चार लाखांपेक्षा जास्त जाती अतिथंड तापमानात ठेवलेल्या केले, तरी स्वस्थळी संवर्धनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण ही सर्व जैवविविधता प्रत्यक्ष जमिनीवर लागवडीखाली असणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे आता लोक सहभागातून विकेंद्रित पद्धतीने प्रत्यक्ष अधिवासात (स्वस्थळी) पारंपरिक वाणांच्या संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ भागातला आंबेमोहोर, सिंधुदुर्ग (कुडाळ) मधला ‘वालय’ भात, पालघरमधील (जव्हार) ‘काळ पेरी’ नाचणी, नाशिकमधला (त्र्यंबकेश्वर) ‘कमोद’ तांदूळ ही त्या-त्या स्थानाची भूषणे आहेत. ती एकदा संपली, की आपण त्याला कायमचे दुरावतो म्हणून त्या त्या कृषी-हवामान प्रदेशातली (Agro-climatic zone) पारंपरिक वाणे आणि त्याबरोबरच स्थानिक ज्ञान संकलित करणे, त्याचा शास्त्रीय अभ्यास करणे, जपणे, वाढवणे आणि त्यातून आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

‘बायफ’चा दृष्टिकोन आणि कृती

‘बायफ’ संस्थेने २००८पासून स्थानिक वाण संवर्धन यावर काम सुरू केले, ज्यामध्ये मुख्यतः पारंपरिक वाण असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेणे, त्यांच्याकडे असलेल्या बियाण्यांचा वैज्ञानिक अभ्यास करणे, शुद्ध बियाणेनिर्मिती करणे, बियाणे संवर्धक आणि उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन करणे, शेतकऱ्यांचे स्थानिक/पारंपरिक वाणावरील हक्क अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे. अशा प्रकारचे आहे.

महाराष्ट्रातल्या पाच आदिवासी भागांतल्या पिकांच्या ६००पेक्षा जास्त स्थानिक वाणांचे संकलन आणि दस्तावेजीकरण केले आहे. त्याचबरोबर १३४ पेक्षा जास्त जंगलातल्या रानमेवा आणि भाज्या याचे माहिती संकलन केले आहे. यामध्ये ‘दुधमोगरा’, ‘घोसी’ या वरईच्या जाती; ‘शितोळी’, ‘पितर बेंद्री’ नाचणीच्या जाती; ‘कसबई’, ‘रायभोग’, ‘ढऊळ’, इ. भाताच्या जाती; ‘कडू वाल’, ‘पताड्या घेवडा’ या वालाच्या जाती; ‘कुक्कड मका केहरी मुकाई इ. मक्याच्या जाती; ‘चिकणी’, ‘झांजरी’, ‘गेदी’ या ज्वारीच्या जाती; कंदांचे विविध प्रकार अशी काही ठळक उदाहरणे सांगता येतील. महाराष्ट्रातील राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग व ‘महाराष्ट्र जनुक कोष’ प्रकल्पाच्या सहकार्याने स्वस्थळी (in-situ) आणि बाह्यस्थळी (Ex-Situ) अशा दोन्ही प्रकारच्या संवर्धनासाठी बायफ संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या उरुळी कांचनमधील संशोधन केंद्रात ६०० वाणांची शीतपेटीमध्ये साठवणूक केली आहे. आज सहा ठिकाणी ‘बियाणे बँका’ तयार केल्या आहेत, ज्यांमधून शेतकऱ्यांना बियाणांची देवाण-घेवाण केली जाते.

विविध पिकांच्या २६४ स्थानिक वाणांच्या गुणवैशिष्ट्यांचा प्रक्षेत्रीय अभ्यास, त्याच बरोबर भात, नाचणी, वरई, मका, ज्वारी ११२ स्थानिक पीक वाणांचे पोषणतत्त्वे आणि जनुकीय रचनांचा अभ्यास केला आहे. धडगाव तालुक्यातील ज्वारीच्या पाच वाणांना राष्ट्रीय पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क २००१अंतर्गत याहा मोगी माता बियाणे संवर्धन समिती, धडगाव यांच्या नावे रजिस्टर झाल्या आहेत. दिल्लीतील राष्ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्युरो (NBPGR) यांच्याकडे विविध पिकांचे १५० वाण जमा केले असून, संबंधित बियाणे संवर्धकाच्या नावे रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे.

पीक वाण विविधता, पारंपरिक अन्न पदार्थ, सण, उत्सव आणि कृषी विविधता, पारंपरिक पीक लागवड पद्धती, बियाणे आणि धान्य साठवणूक पद्धती यांचे दस्तऐवजीकरण केले आहे.

भाजीपाला व गच्चीवरील बाग

भाजीपाला पिकांच्या उत्तम वाणाचे परस बाग, गच्चीवरील बाग यांच्या माध्यमातून संवर्धन केले असून ८ हजार ५३८ कुटुंबांपर्यंत हा कार्यक्रम पोचला आहे. कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन व सामाजिक संस्था, अकोलेमार्फत आतापर्यंत १० हजार परसबाग बियाणे संच विक्री, स्थानिक कृषी जैव विविधता संवर्धनामध्ये देश आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्था आणि शेतकरी ह्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि देवाणघेवाण सुरू आहे, सुनील भोये आणि मावंजी पवार या जव्हार तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनी भात पिकाच्या चार जाती निवड पद्धतीने विकसित केल्या आहेत.

राष्ट्रीय जीनोम सेव्हीअर पुरस्कार २०१२-१३, बियाणे संवर्धक शेतकरी श्रीमती राहीबाई पोपेरे, अकोले, नगर यांना भारत सरकारतर्फे २०१९च्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सदर कार्याची दखल घेतली असून, त्याबद्दलचे संशोधनपर लेखन प्रकाशित केले आहेत. वनराई, सह्याद्री स्कूल, इस्कॉन, सेवा सहयोग, ॲग्री कार्ट शेतकरी कंपनी अशा विविध संस्थांना विविध पिकांच्या १५०पेक्षा अधिक वाणाचे नमुने वितरित केले आहेत. सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांपर्यंत गावरान बीजसंवर्धनाचा कार्यक्रम पोहोचवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. हवामानबदलामुळे पिकांच्या नुकसानीचे प्रमाण वाढल्यामुळे प्रतिकूल हवामानात तग धरतील अशा पारंपरिक वाणांना शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे.

जव्हार तालुक्यातल्या मावजी पवार यांनी ‘कमल’ नावाची तांदळाची जात स्वतःच्या शेतातच विकसित केली, जी मध्यम उंचीची, बारीक तांदळाची असून अधिक पावसात तग धरणारी आहे. सुनील कामडी (अश्विनी भात) यांनी निवड पद्धतीने विकसित केल्या असून, त्यांना भारत सरकारने जीनोम सन्मान २०११-१२ ने गौरविले आहे. अशी उदाहरणे शेतकऱ्यांमध्ये गावरान बियाणांबाबत असलेल्या उत्साहाचा पुरावा आहेत. कृषी जैवविविधता संवर्धनासाठी बायफ आणि इतर अनेक संस्था काम करीत आहेत.

इतर कार्यरत संस्था

महाराष्ट्रात संगमनेरमधील ‘लोकपंचायत’, वर्ध्यातील ‘चेतना विकास’ नागपूरमधला ‘बीजोत्सव गट’, नांदेडमधील ‘संस्कृती संवर्धन मंडळ’ सांगलीमधील शेती परिवार कल्याण संस्था, भंडाऱ्यामधील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, पुण्यातील पर्यावरण शिक्षण केंद्र (Centre For Environment Education), सह्याद्री स्कूल (राजगुरुनगर) अशा अनेक संस्था; त्याचप्रमाणे रमेश साकरकर, वसंत फुटाणे, सुभाष शर्मा, डॉ. सुरेश पाटील, कीर्ती कडलग असे अनेक प्रयोगशील शेतकरी महाराष्ट्रात स्थानिक पीक वाण संवर्धनासाठी झटत आहेत. बंगळूरमधील ‘सहज समृद्ध’; उत्तराखंडामधील ‘बीज बचाव आंदोलन’, ‘नवधान्य’ राजस्थानमधील ‘वाग्धरा’, पंजाबमधील ‘खेती विरासत मिशन’, डॉ. देबल देब, ओरिसा अशी अनेक नावे सांगता येतील. याशिवाय कर्नाटकातील गणी खान, मध्य प्रदेशातील बाबूलाल दहिया असे अनेक बीज संवर्धक त्यांच्या पातळीवर स्थानिक जैवविविधता जोपासत आहेत.

कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे यांच्या कामाचाही हा एक मुख्य अजेंडा व्हावा अशी खूप मोठी अपेक्षा आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘विकेल ते पिकेल’ योजनेत अशा पोषण समृद्ध, मागणी असलेल्या, विशेष गुणधर्म असलेल्या पीकनिहाय वाणांची निवड करून त्याचे सार्वत्रिकीकरण आणि विक्री व्यवस्थेसाठी प्रयत्न आवश्यक आहेत. अशाप्रकारे गावरान बीजसंवर्धन ही खऱ्या अर्थाने राष्ट्रव्यापी चळवळ बनणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘जैविक विविधता कायदा २००२’, ‘Protection of Plant varieties and Farmer Rights Act’ अशा कायद्यांचा प्रत्यक्ष संवर्धनासाठी आणि शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी धोरणात्मक पातळीवर विचार होणे गरजेचे आहे.

पारंपरिक वाण शेती फायद्याची?

उत्पादन खर्च कमी करून शाश्वत उत्पन्न मिळवता येते. विशेष गुणधर्माच्या पीक वाणांना चांगला बाजार भाव मिळू शकतो. वाडा कोलम, काळभात, चिन्नोर, ‘वालय’ यांना त्याच्या विशेष गुणधर्मामुळे चांगला भाव मिळतो. खडक्या भातासारख्या काही वाणाचे दर हेक्टरी उत्पादन कमी आहे; परंतु त्यात कॅल्शिअम, लोह इ. शरीराला आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात आहेत. अशा वाणांचे आरोग्यदायी अन्न, अन्न हेच औषध अशा प्रकारे ब्रॅण्डिंग करून चांगला भाव मिळवून देता येईल. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, वातावरण बदलात तग धरणाऱ्या पीक वाण वापराने नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी होईल. शुद्ध बियाणे उत्पादन व वापर, सुधारित लागवड पद्धत, सेंद्रिय निविष्ठाचा उत्पादन व वापर करून शाश्वततेच्या दिशेने वाटचाल करता येईल. या स्थित्यंतरासाठी खूप संयम आणि प्रयोगशीलता आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील कृषीसंस्कृती आणि सण

महाराष्ट्रातील कृषी भौगोलिक विभागानुसार पीकपद्धती आणि अन्न संस्कृतीमध्ये विविधता आढळते. परंपरेने साजरे केले जाणारे सण, उत्सव त्यांची कृषी जैवविविधतेची सांगड घातली आहे.

दसरा – देशातील महत्त्वाचा सण म्हणजे दसरा ज्याला ‘फेस्टिव्हल ऑफ सीड्स’ म्हटले जाते, कारण घटस्थापनेच्या दिवशी दिवशी विविध पिकांचे बियाणे रुजविले जाते, ज्याला कुंभ असे म्हटले जाते आणि नवव्या दिवशी त्यांची उगवण क्षमता पहिली जाते.

नोवापुजा – गडचिरोलीतील माडिया समाजात नोवापुजा केली जाते. मक्का, अंबाडी आणि काकडी परिपक्व झाल्यावर हे खाण्याआधी त्यांची नोवापुजा केली जाते. या पुजेसाठी मोहाची पाने वापरतात. ही पूजा प्रत्येक घरी स्वतंत्र साजरी केली जाते. संध्याकाळी गोटुलमध्ये नाचगाणे होतात. दुसऱ्या‍ दिवशी गावातील तरुण मंडळी घरातील कचरा गोळा करून गावाच्या वेशीबाहेर फेकतात, याला पीडा उतरवणे म्हणतात.

होळी – होळी पेटवण्यासाठी बांबूंचे लाकूड मध्यवर्ती ठेवले जाते. होळी पूजनासाठी पाच जातीचे अन्न एकत्र गोळा करून पूजले जाते. यात ज्वारीचे आद्यपूजन करून होळीला पूजले जाते. होळी पेटवण्यासाठी टेंभुर्णी झाडाची वाळलेली फांदी वापरली जाते. होळी पेटवून झाल्यावर बांबूंचा शेंडा पोलिस पाटील कापतो आणि त्याच्या घरी गावप्रमुख म्हणून ठेवला जातो. तिथेच गावकऱ्यांना जेवण दिले जाते.

देव मोगरा – देवमोगरा ही नंदुरबार येथील आदिवासी देवता आहे. या नावावरुनच देवमोगरा या ज्वारीचे नाव पडलेले आहे. मार्च महिन्यात देवमोगरा देवीची पूजा करण्यासाठी चांगल्या ज्वारीचे मोठी कणसे देवीला घेऊन जातात. त्यानंतर पुजारी ही ज्वारीचे कणसे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा वाटप केले जाते.

आवाहन

‘देशी वाण संवर्धन’ पुरवणीबद्दलची आपली मते व प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा!

ई-मेल – editor@esakal.com व्हॉट्‌सअॅप क्रमांक – ८४८४९ ७३६०२

(लेखक ‘बायफ’ संस्थेत प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असून, भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (ICAR) National Bureau of Plant Genetic Resources (NBPGR) संशोधन सल्लागार समितीचे सदस्य आहेत.)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here