सोलापूर : शहर व परिसरात आज गुरुवारी होणाऱ्या घटस्थापनेसाठी बाजारात घटस्थापनेचे पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी बाजार फुलून आला. आंब्याची पाने, घट, माळ लावण्यासाठी छोटा मंडप यासारख्या अनेक वस्तूंची खरेदी नागरिक करत होते.

नवरात्री पर्वाला गुरुवारी (ता. 7) रोजी सुरवात झाली आहे. आज घटस्थापना आहे. सकाळपासून शहरातील सर्व रस्त्यावर बाजार फूलून आला होता. दूरड्यांची खरेदी केली जात होती. तसेच घटस्थापनेसाठी लागणारी सुगडी यांची विक्री मोठ्या प्रमाणात केली.
लहान व मोठ्या आकाराची सुगडी नागरिक खरेदी करत होते. सिताफळ, डाळिंब, चिकू, केळी, पपईसारख्या अनेक फळांची जोरदार विक्री सुरु होती. घटासाठी काळी मातीदेखील विकली जात होती. घटाची माळ लावण्यासाठी लोखंडी छोटे मंडप बाजारात मिळत होते.
या मंडपांची किमंत 150 ते 200 रुपयांपर्यंत होती. या मंडपाला वरच्या बाजूला माळ लावून मध्यभागी घट स्थापना करता येते. घटासाठी सप्त धान्याची खरेदी महिला करत होत्या. कलशास लावण्यासाठी आंब्याची पाने, पूजेसाठी विड्याची पाने, नारळ, असे अनेक प्रकारचे पूजा साहित्य शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर विकले जात होते.
तसेच नवरात्रोत्सवासाठी झेंडूची फुलेदेखील विक्रीस आली आहेत. घरांना तोरणे करण्यासाठी व पूजेसाठी या फुलांचा उपयोग केला जातो. याशिवाय बाजारात देवीच्या प्रतिमा, फोटोदेखील विक्रीस आले होते. तोरणमाळा, लायटींग, प्लॅस्टीक फुलांची सजावट, नारळ यांचीदेखील विक्री अगदी जोरात सुरु होती.
मधला मारुती परिसरात फुलांचे हार व फुलबाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. याशिवाय रंगीत वस्त्रे, कोहळा, सजावटीचे सामान, पाट, चौरंग आदी अनेक प्रकारच्या साहित्याची देखील खरेदी सुरु होती.
शहरातील रुपाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. गुरुवारी (ता. 7) सकाळी पाच वाजता प्रक्षाळ पूजा होणार आहे. त्यानंतर दुपारी 11 वाजता महापुजेला सुरवात होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी घटस्थापना केली जाणार आहे. कोरोनाच्या काळात मागील वर्षाच्या नवरात्रोत्सवात भाविकांना दर्शन उपलब्ध नव्हते. यावर्षी मात्र सर्व मंदिरे नवरात्रोत्सवापासून खुली होणार आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शनाची संधी मिळणार आहे.
मधला मारुती परिसरात खरेदीची मोठी गर्दी. शहरातील फूटपाथ व मोकळ्या जागांवर पूजा साहित्याची विक्री सुरु. घट लावण्यासाठी तयार छोट्या लोखंडी मंडपची विक्री. झेंडूच्या फुलांची जोरदार आवक. बाजारातील गर्दीने अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाले होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here