पंढरपूर (सोलापूर): राज्य शासनाच्या आदेशानुसार आज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना मुखदर्शनासाठी प्रवेश सुरु करण्यात आला. अनेक महिन्यांच्या नंतर भाविकांना मंदिरात जाऊन सावळ्या विठूरायाला डोळेभरुन पाहता आल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दररोज सकाळी सहा ते सात या वेळात स्थानिक नागरिकांना आधारकार्ड दाखवून प्रवेश देणे सुरु झाल्याने स्थानिक भाविक देखील आनंदले आहेत.

मंदिर समितीने आज मंदिरात प्रवेश मिळालेल्या पहिल्या दहा भाविकांवर पुष्पवृष्टी करुन स्वागत केले. तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानी मंदिर भाविकांसाठी खुले केल्याचा पेढे वाटून आनंद व्यक्त केला. राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक दर्शनासाठी आलेले असल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून राज्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. आता शासनाच्या आदेशनुसार आज पासून मंदिरात पुन्हा मुखदर्शऩासाठी भाविकांना प्रवेश सुरु करण्यात आला आहे.
कासारघाटावरुन भाविकांना रांगेत प्रवेश दिला जात आहे. मंदिरात हार, फुले, प्रसाद नेण्यास बंदी आहे. त्यामुळे कोणी भाविकांनी ते आणले असल्यास ते बाहेर ठेवून रांगेत प्रवेश दिला जात आहे. प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर फवारणी करण्यात येत असून ठराविक अंतर सोडून भाविकांना रांगेतून मंदिरात सोडले जात आहे.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरुव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी आज रांगेतून मंदिरात प्रवेश केलेल्या पहिल्या दहा भाविकांवर पुष्पवृष्टी करुन स्वागत केले.
दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करुन आलेल्या पाच हजार आणि बुकींन न करता आलेल्या पाच हजार अशा एकूण दहा हजार भाविकांना सध्या दररोज मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. मंदिरात भाविकांना प्रवेश सुरु झाल्याने या भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना देखील आता भाविक येऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे.
घटस्थापनेच्या निमित्ताने आज मंदिरात रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. लक्षावधी तुळशी पाने आणि झेंडू, गुलाब, अष्टर , शेवंती, जरबेरा, कागडा, कामीनी, ग्लॅडिओ अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे. सुमारे अडीच टन फुलांचा आज वापर करण्यात आला आहे. फुलांची सजावट आणि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आलेले असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीचे रुप अधिकच खुलून दिसू लागले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here