बांदा – गोव्यातून सरमळे येथे केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८१ हजार रूपयांच्या दारूसह एकूण दोन लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी डिट्टो तंगचद (रा. एर्नाकुलम केरळ, सध्या रा. सरमळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली जीप (केएल ०१ के २९९०) ताब्यात घेण्यात आली. बांदा पत्रादेवी सीमेवरील दत्तमंदिर येथे बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात केल्या जाणार्‍या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलीस सीमेवर नजर ठेवून आहेत. बुधवारी मध्यरात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पत्रादेवी दत्तमंदिरकडे बांद्याकडे येणारी जीप तपासणीसाठी थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान जिप मध्ये वरच्या बाजूस चोरकप्पा बनविल्याचे निदर्शनास आले. या चोरकप्प्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या भरण्यात आल्या होत्या. पोलिसांनी दारुसह मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस शिपाई प्रथमेश पवार यांनी केली. अधिक तपास बांदा पोलीस करत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here