कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी व्यापारी, फेरीवाले यांच्या नशिबी उपेक्षाच आली. प्रशासनाने महाद्वार, राजाराम रोड, ताराबाई रोड, गुजरी परिसरातील रस्ते बंद केल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत येथे ग्राहक येऊन शकले नाहीत. दुपारी प्रशासनाशी भांडल्यावर ग्राहकांना रस्त्यावर प्रवेश मिळाला पण दिवसभर ग्राहक या बाजारपेठांत आलेच नाही.
आधी कोरोना लॉकडाउन त्यानंतर महापुराचा फटका, हे कमी की काय म्हणून प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे ऐन नवरात्रोत्सवात व्यावसायिकांवर वरवंटा फिरविल्याची संतप्त भावना व्यापारी, व्यावसायिक, फेरीवाल्यांनी व्यक्त केल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद झालेले अंबाबाई मंदिर आज खुले झाले. स्थानिक आणि परगावचा भाविक दर्शनाला येईल. त्यानिमित्ताने तो बाजारपेठेत खरेदी करेल. त्यामुळे व्यवसाय होईल. अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मात्र त्यांच्या आशेवर प्रशासनाने पाणी फेरले. नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल करताना, त्यांनी महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, राजाराम रोड हे अंतर्गत रस्ते बंद केले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी या रस्त्यावर शुकशुकाट होता. येथील व्यापारी, फेरीवाले यांचा व्यवसाय झाला नाही. अशीच स्थिती महाद्वार, जोतिबा रोडवरही होती. रस्ते बंद केल्याने भाविक येथे आलेच नाहीत. दुपारी ११ नंतर व्यापारी आणि फेरीवाल्यांचा संयम सुटला त्यांनी महापालिका, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली.
राजाराम रोड खुला करण्याची मागणी
कोल्हापूर : नवरात्रोत्सवाचे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात नियोजन केले आहे. परंतु या नियोजनाचा फटका व्यापारी, फेरीवाले व रहिवाशांना बसत आहे. वसंत मेडिकल ते बिंदू चौक या राजाराम रोडवरील व्यापारी व रहिवाशांना प्रभावित केले आहे. हा रस्ता भाविकांसाठी खुला करावा, अशी मागणी करत राजाराम रोड सबजेल व्यापारी व रहिवासी यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोल्हापूर जनशक्तीचे कार्याध्यक्ष समीर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. सचिन कोळेकर, विवेक वोरा, सचिन सातपुते, अमोल हंजे, आकाश बुधले, प्रसाद मोरे, अलताफ मोमीन, ताहीर शेख, सागर कदम उपस्थित होते.
रस्ते बंदीविरोधात व्यापारी आक्रमक
नवरात्रोत्सवात मुख्य रस्तेच बंद केल्याने महाद्वार रोड व परिसरातील व्यावसायिक अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या मनमानीमुळे जाच होत आहे. रस्ते बंद करण्याला व्यापारी, फेरीवाले यांनी रस्त्यावर उतरून आज विरोध केला. अखेर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी महाद्वार रोडवर येऊन पाहणी केली. त्यानंतर स्थानिकांच्या दुचाकी वाहनांना केवळ प्रवेश दिला. या वेळी व्यापाऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. प्रशासनाने सकाळपासून बिनखांबी गणेश मंदिरापासून दुचाकीसाठी रस्ता केला. त्याचप्रमाणे ताराबाई रोड आणि अंतर्गत गल्लीबोळही बंद केले. बॅरिकेड्स लावलेल्या ठिकाणी नागरिकांनी दुचाकी पार्किंग केल्यामुळे कोंडी झाली होती.

व्यापाऱ्यांनी हे रस्ते खुले करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर पोलिस अधीक्षक बलकवडे आणि अतिरिक्त अधीक्षक तिरुपती काकडे यांनी राजवाडा पोलिस व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बंद केलेल्या गुजरी कॉर्नर, जोतिबा रोड आणि महाद्वार रस्त्याची पाहणी केली. व्यापाऱ्यांनी रस्ता सुरू करण्याच्या धरलेल्या आग्रहामुळे महाद्वार रोडकडून गुजरीकडे जाणारे रस्ते बॅरिकेड्स काढून खुले करण्याचा निर्णय घेतला आणि अंतर्गतरित्या स्थानिक रहिवाशांसाठी दुचाकी प्रवेश खुला करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्याचप्रमाणे जोतिबा रोडवरील व्यापाऱ्यांनाही अंतर्गत दुचाकी पार्किंग आणि प्रवासास मुभा दिली. हे दोन्ही रस्ते पादचाऱ्यांसाठी खुले केले. या वेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, किरण नकाते, जयेश ओसवाल, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन;पाहा व्हिडिओ
“रस्त्यावर फेरीवाल्यांनी बसायचे नाही, असे सकाळी प्रशासनाने सांगितले. त्यांच्याशी चर्चा केल्यावर परवानगी दिली. पण तेवढ्यात निम्मा दिवस निघून गेला. शिवाजी चौकातूनच येण्याचा मार्ग असल्याने रसत्यावर तुरळक ग्राहक होते. संध्याकाळी आलेल्या पावसाने धंदाच संपवला.”
– अविनाश उरसाल, उपाध्यक्ष, महालक्ष्मी फेरीवाला संघटना
“प्रशासनाने विश्वासात न घेता निर्णय घेतले आहेत. रहिवासी, व्यापारी, फेरीवाले अडचणीत आहेत. व्यापाऱ्यांनी नवरात्रोत्सवासाठी लाखो रुपये गुंतवून माल खरेदी केला. पण अडमुठ्या धोरणामुळे ते अडचणीत आहेत.”
– समीर नदाफ, कार्याध्यक्ष, कोल्हापूर जनशक्ती
“अधिकारी फक्त निर्यण घेतात. त्यांना सामान्य माणूस जगतोय का मरतोय? याच्याशी देणे घेणे नसते. ग्राहक शिवाजी चौकातूनच परत जात आहे. त्यामुळे व्यवसाय बंद पडतोय की काय अशी स्थिती आहे.”
– कुलदीप गायकवाड, अध्यक्ष, जिल्हा सराफ संघ
Esakal