पुणे – लसीकरण आणि बहुसंख्य पुणेकरांना झालेल्या कोरोनाच्या संसर्गातून सामुहीक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या नियंत्रणात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधीतांचे प्रमाण कमी होत आहे. त्यातही गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधीतांचा आकडा खूप वाढलेला नाही. तो स्थिर आहे. साधारणतः दररोज दोनशेपेक्षा कमी रुग्णांचे नव्याने निदान होत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे नोंदण्यात आले.

याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘शहरात साडेपाच ते साडेआठ हजार संशयित रुग्णांची कोरोना चाचणी होत आहे. त्यातील संसर्गाचे प्रमाण सुमारे २.७ टक्के आहे. त्यामुळे नव्याने कोरोनाचे निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसते.’’

हेही वाचा: पुणे : आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा के. पी. गोसावी फरार आरोपी

कोरोनाची रुग्ण संख्या स्थिर होण्याची कारणे

1) कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. महापालिकेने लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. तेथे जाऊन नागरिक लस घेत आहेत. तसेच, खासगी लसीकरण केंद्रांमधूनही लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.

2) शहरात गेल्या दीड वर्षांमध्ये पाच लाखांहून अधिक रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला. तितक्याच नागरिकांना कोरोना होऊन गेला. पण, त्याची कोणतीच लक्षणे रुग्णांना दिसली नाहीत. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘लक्षणे नसलेला कोरोना’ म्हटले जाते. अशा रुग्णांची संख्या पाच लाखांच्या दरम्यान आहे. त्यातून नागरिकांमध्ये कोरोनाची प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) तयार झाल्या.

3) लसीकरण आणि कोरोना झाल्याने तयार झालेल्या अँटिबॉडीजमुळे पुण्यात ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होत आहे. त्यातून कोरोनाच्या संसर्गाला आळा बसला. ही संख्या आता स्थिर होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

मृत्यूचे प्रमाण कमी

कोरोनामुळे शहरात मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी झाले आहे. यापूर्वी दररोज मृतांचा आकडा दहापेक्षा जास्त होता. तो आता दोन ते तीनपर्यंत कमी होत आहे.

हेही वाचा: बदलत्या आव्हानांसाठी लोहगाव एअर फोर्स स्टेशन मोलाचे ठरत आहे; भूषण गोखले

लसीकरण, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही कोरोना नियंत्रणाची चतुःसूत्री आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोना उद्रेकाच्या दोन लाटांचा भयंकर अनुभव पुण्याला आला आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी या चतुःसूत्रीचा पुणेकर काटेकोर पालन करत आहेत. त्यातून कोरोनाला रोखण्यात यश मिळत असल्याचे चित्र दिसते.

– सचिन पाटील, वैद्यकीय तज्ज्ञ

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण कोरोनातून खडखडीत बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील संसर्गाचा दर ११.०२ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत पाच कोटी ९६ लाख १९ हजार ६३७ रुग्णांचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले. त्यापैकी ६५ लाख ६७ हजार ७९१ रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान प्रयोगशाळा तपासणीतून झाले. या दरम्यान, राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका झाला आहे.

– डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here