ढेबेवाडी (सातारा) : मध्यंतरीच्या लॉकडाउनच्या (Lockdown) कठीण काळात अनेकांपुढे मोकळा वेळ घालवायचा कसा, असा प्रश्न उभा होता. काहींनी घरात विश्रांती घेत आणि शिवारात राबत तर काहींनी आपले विविध छंद जोपासत आणि भन्नाट कल्पना राबवत वेळ व्यतित केला. येळेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथील संगीता विठ्ठलराव येळवे (Painter Sangeeta Yelve) यांनी मात्र या कालावधीत आपल्या शालेय जीवनातील चित्रकलेच्या सुप्त छंदाला अनेक वर्षांनंतर मोकळी वाट करून देत थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल 150 चित्रे साकारून तसेच औषधी वनस्पती व फुलझाडांची बाग आणि घराच्या परिसरातील झाडांच्या फांद्या, दगड कलात्मकतेने सजवून लॉकडाउन सत्कारणी लावला.
साहित्यिका, कवयित्री, चित्रकार, चित्रपट व नाट्य कलाकार आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान देत असलेल्या संगीता येळवे उत्तम गृहिणीही आहेत. लॉकडाउनच्या काळात घरातच अडकून पडलेल्या येळवे यांनी शालेय जीवनात जोपासलेल्या आणि मध्यंतरीच्या धावपळीत कुठेतरी हरविलेल्या चित्रकलेच्या छंदाला मोकळी वाट करून दिली. त्यांच्या उपक्रमांना प्रोत्साहन व बळ देणारे त्यांचे पती ॲड. विठ्ठलराव येळवे यांचे त्यासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. येळवे यांनी मोकळ्या वेळेत विविध प्रकारच्या रंगांचा वापर करत ड्रॉईंग पेपर व कॅनव्हासवर विविध आकारातील दीडशेवर चित्रे साकारलेली आहेत. त्यात निसर्ग चित्रांची संख्या अधिक असून, त्याशिवाय वस्तू चित्र, व्यक्ती चित्र आदींचा समावेश आहे.
हेही वाचा: कॅलिफोर्नियात दुष्काळाच्या झळा; पाण्यासाठी घेतायत दीड कोटींचे मशीन

चित्रकार संगीता येलवे
अगदी जीव ओतून साकारलेल्या या चित्रमय दुनियेमुळे येळवे यांचे घर जणू कलादालनच बनलेले आहे. येळवे यांनी चित्रकारीबरोबरच औषधी व विविध प्रकारच्या वनस्पतींची बाग फुलवून आणि घराच्या परिसरातील झाडांच्या फांद्या, दगड कलात्मकतेने सजवून लॉकडाउन सत्कारणी लावला आहे. त्यांची कलाकारी बघायला परिसरातून अनेक नागरिक येळेवाडीत येत आहेत. ॲड. विठ्ठलराव येळवे म्हणाले, ‘‘संगीता यांना ग्रामीण जीवन व तेथील लोकांचे प्रश्न, अडीअडचणी याविषयी प्रचंड आत्मीयता असल्याने आम्ही शहरातून मूळगावी परतलो आहोत. त्यांनी विविध चित्रप्रकार साकारलेले आहेत. कलादालन बघायला येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत आम्ही पेंटिंग देऊन करतो.’’
हेही वाचा: एकदम झक्कास! सडावाघापूर पठारावर बहरली रंगीबेरंगी फुलांची दुनिया
चित्रकलेची आवड शालेय जीवनात जोपासली होती. परंतु, नंतरच्या धावपळीत ती मागे पडली. लॉकडाउनच्या काळात पुन्हा मी तिची वाट मोकळी केली. कलेला अंत नसतो, ती संपत नाही. काळाच्या ओघात ती अधिकाधिक बहरते अन् शेवटपर्यंत सोबतही करते, याचीच अनुभूती यानिमित्ताने येते आहे.
-संगिता येहवे
Esakal