IPL 2021 KKR vs RR: कोलकाताच्या संघाने शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थानचा धुव्वा उडवला. कोलकाताने राजस्थानच्या संघाला ८५ धावांवर माघारी धाडले आणि ८६ धावांनी सामना जिंकला. शिवम मावीचा बळींचा चौकार आणि त्याला लॉकी फर्ग्युसनकडून मिळालेली ३ बळींची साथ यांच्या जोरावर कोलकाताने हा मोठा विजय साजरा केला. त्याआधी, शुबमन गिल (५६) आणि व्यंकटेश अय्यर (३८) या जोडीने कोलकाता संघाला चांगली सुरूवात मिळवून दिली तर दिनेश कार्तिक-इयॉन मॉर्गन जोडीने संघाला १७०पार मजल मारून दिली. या विजयासोबत आता कोलकाताचा प्ले ऑफ्समधील प्रवेश जवळपास निश्चित आहे. पण त्याधीच KKR ने एक महत्त्वाची माहिती दिली.
हेही वाचा: मुंबईला ‘प्ले ऑफ्स’चं तिकीट हवं असेल तर ‘हे’ आहे समीकरण
कोलकाताच्या संघाने शारजाच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या उभारली. या सामन्यात कोलकाचा पॉवर हिटर आंद्रे रसल नव्हता. असे असूनही कोलकाताने मोठी धावसंख्या उभारली. याच मुद्द्यावर कोलकाताचे मेंटॉर डेव्हिड हसी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. “रसलने बुधवारी फिटनेस टेस्ट दिली. त्यावेळी तो दुखपातीतून बराचसा सावरलेला दिसून आला. तो तंदुरूस्त होण्यासाठी मनापासून परिश्रम घेत आहे. प्ले ऑफचे सामने सुरू होण्याआधी संघात परतण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो संघात आला तर संघाचे मनोधैर्य खूप वाढेल. तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे. तो संघाला नक्कीच फायदेशीर ठरेल”, असे डेव्हिड हसी म्हणाले.
हेही वाचा: IPL 2021: ‘करो या मरो’च्या सामन्यात रसल संघाबाहेर, कारण…

आंद्रे-रसेल-केकेआर
दरम्यान, नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने २० षटकात १७१ धावा करत राजस्थानला १७२ धावांचे आव्हान दिले. शुबमन गिलचे अर्धशतक कोलकातासाठी फायदेशीर ठरले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाची त्रेधातिरपीट उडाली. यशस्वी जैस्वाल (०), लियम लिव्हिंगस्टोन (६), संजू सॅमसन (१), अनुज रावत (०), शिवम दुबे (१८), ग्लेन फिलिप (८), ख्रिस मॉरिस (०) हे सारे खेळाडू स्वस्तात बाद झाले. तेवातियाने ४४ धावांची खेळी केली, पण राजस्थानचा डाव ८५ धावांवर आटोपला.
Esakal