विविध अभिनेत्यांची मंदिरं बांधल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. चाहते काय करतील, याचा नेम नसतो. असाच एक प्रकार तेलंगाणा राज्याच्या खम्माम या ठिकाणी पाहायला मिळालाय. तेलंगाणामध्ये सोनू सूदसाठी त्याच्या चाहत्यांनी आणखी एक मंदिर बांधले आहे. कोरोनाच्या काळात सोनूने अनेक लोकांना मदत केली. त्यामुळे आमच्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे की आम्ही सोनू सूद सरांचे चाहते बनलो आणि त्यांचे मंदिर बांधले, असे वेंकटेश म्हणाला.

गेल्या वर्षीही असाच एक प्रकार समोर आला होता. तेलंगाणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील दुब्बा तांडा गावात सोनूसाठी एक मंदिर बांधण्यात आले होते. कोविड -19 महामारी दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या स्थलांतरितांसाठी मदत पोहोचवल्याने सोनू सूदच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. याआधी आपण दाक्षिणात्य अभिनेत्यांची मंदिरं बांधल्याचं पाहिलंय. त्यातच आता सोनू सूदच्या मंदिराची भर पडली आहे.
सोनूने कोरोना काळात वंचित लोकांना मदत केली. त्यांनी अनेक रोजगार उपलब्ध करणाऱ्यांशी सहकार्य करून स्थलांतरित मजुरांसाठी जॉब पोर्टल देखील सुरू केले. यानंतर सोनूच्या घरावर आयकर विभागाचा छापाही पडला होता. मात्र यामुळे सोनूचं फॅन फॉलॉविंग आणखी वाढलं आहे.
Esakal