जागतिक पोस्ट दिवस 2021: स्मार्टफोनच्या जमान्यात पत्र कोण पाठवेल? हा प्रश्न तुमच्या मनात देखील नक्कीच आला असेल. मात्र, आजही भारतातील (India) काही ठिकाणी पत्र हेच एकमेकांशी संपर्क करण्याचं साधन आहे. एक काळ असा होता, जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असे. मात्र, बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, सोशल मीडियामुळे (Social Media) क्षणात कोणाशीही संवाद साधता येतो. आज आंतरराष्ट्रीय टपाल दिवस आहे. 1969 पासून आंतरराष्ट्रीय टपाल दिन 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. मात्र, आजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड (Postcard) आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही होतं.

युनिव्हर्सल पोस्टल युनियन
1874 : युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) संघटनेची स्थापना
9 ऑक्टोबर 1874 रोजी युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) या संघटनेची स्थापना बर्न (स्वित्झर्लंड) येथे केली गेली. या घटनेच्या स्मृतीत 1969 साली 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन म्हणून घोषित करण्यात आले. युनिव्हर्सल पोस्टल युनियनने कार्यक्षम अशा टपाल सेवेचा मार्ग खुला केला, जी पुढे सन 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक प्रमुख संस्था बनली. भारत स्वतंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकीटांच्या स्वरुपात, आकारात, रचनेत विविध बदल झालेत. त्यांच्यातील या बदलांमुळे त्या-त्या काळाविषयी माहिती मिळते. टपाल खाते नेते, फुलं, प्राणी-पक्षी, एखादी घटना, रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सवी, शतक, द्विशतक किंवा त्रिशतकनिमित्त तिकीटं काढतं. 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पोस्ट तिकीटात बदल करण्यात आला होता. त्या तिकीटावर तिरंग्याचे चित्र दिले होते, तर कधी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, राजीव गांधी, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या व्यक्तींच्या प्रतिमा टपाल तिकीटांवर विशेष काळात होत्या. यावरुन आपल्याला त्या काळात त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती मिळते. त्यामुळेच टपाल तिकीटे हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे.

जागतिक पोस्ट दिवस
हेही वाचा: जेव्हा नोबेल ॲकॅडमीचा Call आला, तेव्हा कादंबरीकार गुर्नाह स्वयंपाक करत होते!
टपाल दिन : आनंद नरुलांनी मांडली संकल्पना
जागतिक टपाल दिन साजरा करण्याची संकल्पना आनंद मोहन नरुला (Anand Mohan Narula) या भारतीयानं मांडली होती. सन 1969 मध्ये टोकियोत झालेल्या UPU परिषदेत हा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जात आहे. ‘इंडिया पोस्ट’ या ब्रॅंड नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग (DOP) ही भारतातली सरकारद्वारे संचालित अशी टपाल प्रणाली आहे, जी दळणवळण मंत्रालयाची एक उपकंपनी आहे. दिनांक 1 ऑक्टोबर 1854 रोजी ब्रिटिश भारतात लॉर्ड डलहौजी ह्यांनी आधुनिक भारतीय टपाल सेवेचा पाया रचला. डलहौजी ह्यांनी एकसमान टपाल दर (सार्वत्रिक सेवा) लागू केलेत आणि ‘इंडिया पोस्ट ऑफिस अॅक्ट 1854’ मंजूर करीत लॉर्ड विल्यम बेंटिक ह्यांच्या भारतात टपाल विभागाची स्थापना करण्याविषयीच्या 1837 सालाच्या कायद्यात दुरूस्ती केली.

पोस्टकार्ड
टपाल तिकीटं जागतिक पातळीवर नेण्यात जाल कुपरांचा मोठा वाटा
1977 मध्ये भारतानं जाल कूपर यांचं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं. याचं कारणंही तसंच होतं. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इंडियाझ स्टॅम्प जर्नलचे संपादन केले होते. भारतातील पहिल्या तिकीट संपादक ब्यूरोचे ते संपादक होते. त्यांनी इम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली होती. याच विषयावर त्यांनी पुढे पुस्तकही लिहिलं. त्यांच्या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरुप दिलं. भारतीय टपाल तिकीटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करुन जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान प्रचंड महत्वाचं आहे, हे त्यांच्यावर काढलेल्या तिकीटांवरुन लक्षात येतं. भारतात 23 टपाल क्षेत्रात विभागले गेले आहेत, प्रत्येक क्षेत्र चीफ पोस्टमास्टर जनरल यांच्या अध्यक्षतेखाली आहे. संपूर्ण देशासाठी ‘डायरेक्टर जनरल ऑफ पोस्ट’ हे प्रमुख पद आहे.

पोस्टकार्ड

भारतीय पोस्टमन
हेही वाचा: जगातील ‘या’ देशांत शिक्षकांना मिळतो सर्वाधिक ‘पगार’
इतिहास: सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. 1688 मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र, त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉरन हेस्टिंग्ज हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या देखरेखीचे अधिकार होते. त्या काळात सन 1774 मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने टपालासोबत वापरायला सुरूवात झाली. सुरवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सीं अंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, 1837 हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून 1854 चा टपाल कायदा अस्तित्वात आला. त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. 2011 पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने मागे पडून, 1 ऑक्टोबर 1854 पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे वापरात आली.

हिमाचल प्रदेश
हेही वाचा: 25 सैनिकांसह सुरु झालेली Indian Air Force आता जगात चौथ्या क्रमांकावर आहे!
जगातील सर्वात उंचावरील पोस्ट ऑफिस
हिमाचल प्रदेशमधील हिक्किम नावाच्या गावामध्ये जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय अर्थात पोस्ट ऑफिस आहे. 4440 मीटर उंची जेथे श्वास घेण्यास अडचण येते, अशा ठिकाणी 1983 पासून हे टपाल कार्यालय दुर्गम भागात पत्र पाठवण्याचे काम करते. हिक्किमच्या आजुबाजूच्या गावांचे संचाराचे एकमात्र साधन हे पत्र आहे. या टपाल कार्यालय हिक्किमबरोबरच लांगचा-1, लांगचा-2 आणि कॉमिक गावांमध्ये पत्र पोहचवण्याचे काम करते. बर्फामुळे जून ते ऑक्टोबरच्या काळात या ठिकाणी जाणे शक्य नसते. या टपाल कार्यालयात 1983 पासून रिनचेन नावाची व्यक्ती पोस्टमनचे काम करत आहे. अनेकदा बर्फामुळे त्यांना घरी परतण्यास अडचणीचा सामना देखील करावा लागतो.
टीप : या लेखात माहिती संकलनासाठी टपालवर आधारित पुस्तकं व इतर माध्यमांचा संदर्भ घेण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश
Esakal