सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) पक्ष विरहितच्या नावाखाली भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना (MLA Shivendrasinharaje Bhosale) घेऊन पॅनेल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरु आहे. त्यामुळे या निवडणुकीला माझा विरोध आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी आयत्यावेळी शरद पवारांना (Sharad Pawar) पाठ दाखवत भाजपमध्ये निघून गेले होते. त्यांना घेऊन पॅनेल करणार असाल, तर तो शरद पवार साहेबांचा अवमान असेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, जिल्ह परिषद सदस्य दीपक पवार (Deepak Pawar) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक पवार यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, जिल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पक्ष विरहितच्या नावाखाली शिवेंद्रसिंहराजेंना घेऊन पॅनेल करणार असाल, तर या निवडणुकीला माझा विरोध असेल. शरद पवार साहेबांच्या आशीर्वादांनी या आमदारांनी ५० वर्षे सत्ता भोगली. आयत्यावेळी शरद पवारांना पाठ दाखवून निघून गेले. यांना जर का जिल्ह्यातील राष्ट्रवादीची नेते मंडळी सामावून पॅनेल करणार असतील तर तो शरद पवार साहेबांचा अवमान असेल. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन दोन वर्षे झाली तरी जिल्हा बँकेत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे अध्यक्ष कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बँकेत एकतर्फी राष्ट्रवादीची सत्ता असताना यशवंतराव चव्हाण, किसन वीर, बाळासाहेब देसाई व विलासराव पाटील उंडाळकर यांच्या अथक प्रयत्नातून नावारपास आलेली व राज्यात प्रथम क्रमांकावर असलेली आपली जिल्हा बँक पूर्णपणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारातून उभी राहिलेली आहे. आज राज्यामध्ये फटाक्याची माळ लागावी, तशी आकस व सुडबुद्धीने राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींवर बिनबुडाचे आरोप भाजपचे नेते मंडळी करत आहेत.

हेही वाचा: 24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : सोमय्या

अशा वेळी समृद्ध सहकाराला बुडवायला निघालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना पॅनेलमध्ये घ्यात तर ती आपली चूक ठरेल. विकास सेवा सोसायटी मतदार संघामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची मजबूत पकड आहे. निवडून येणारे सर्व उमेदवार हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत. अशा वेळी संपूर्ण मतदारयादीमध्ये पूर्णपणे महाविकास आघाडीचे एकतर्फी पकड आहे. मग आपण सरकार विरोधी भाजप आमदारांना पॅनेलमध्ये का घ्यावे, असा प्रश्न श्री. पवार यांनी उपस्थित केला आहे. नुकतीच मी मुंबईमध्ये खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली, असे सांगून श्री. पवार म्हणाले, त्यावेळी त्यांनी पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या नावाखाली जर का नगरपालिका अथवा जिल्हा बँकेची निवडणूक झाली तर चांगली बाब होईल. त्यासाठी मी प्रत्यक्ष लक्ष घालण्याची तयारीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीतील नेते मंडळींनी एकत्रित येऊन कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या आमदाराला पॅनेलमध्ये घेऊ नये.

शरद पवार

शरद पवार

हेही वाचा: राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो!

शशीकांत शिंदेंनी जिल्हा पातळीवर काम करावे..

जावळी विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढणार आहे. मात्र, आमदार शशीकांत शिंदे हे देखील याच मतदारसंघातून इच्छुक आहेत. माझी त्यांना विनंती आहे, ते सतत जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पातळीवर काम करीत असतात. त्यामुळे मागील निवडणुकांमध्ये रिक्त झालेल्या राष्ट्रवादीच्याच जिल्हा पातळीवरील मतदारसंघ म्हणजेच खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था, नागरी सहकारी बँका व पतसंस्था येथून कै. लक्ष्मणराव पाटील, दादाराजे खर्डेकर व विलासराव पाटील उंडाळकर यांनी नेतृत्व केले होते. या मतदारसंघातून शशीकांत शिंदेंनी निवडणूक लढावी. त्यामुळे माझ्या सारखा राष्ट्रवादीतील कार्यकर्ता जिल्हा बँकेत संचालक म्हणून येऊ शकतो. मी हटवादी किंवा हेकेखोर नाही. मात्र, जर कोणी एखाद्या मतदारसंघाला न्याय देऊ शकत नसेल तर मी त्या ठिकाणी शरण जात नाही. त्यामुळे शशीकांत शिंदे यांनी जिल्हा पातळीवर मतदारसंघाचा विचार करावा, असा सल्ला दीपक पवार यांनी शशीकांत शिंदेंना दिला आहे.

हेही वाचा: उदयनराजेंचं मोठं वलय आहे, शब्द आहे.. यावर ‘राजे’ काय म्हणाले, माहितीय?

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here