सिंधुदुर्ग: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शिवसेनेत एकत्र असणारे हे दोन नेते सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचं उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
-
विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असून चारशे ते पाचशे पोलिस तैनात आहेत. कार्यक्रमाला फक्त दोनशे ते अडीचशे जणांनाच परवानगी आहे.
आज तब्बल 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचं बांधकाम पूर्ण होऊन त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमात ते एकत्र आल्यावर ते एकमेकांशी बोलणार का, बोलले तर काय बोलणार? मंचावरची त्यांची देहबोली कशी असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खूर्ची तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खूर्ची असणार आहे.

Esakal