नागपूर : बरेच लोक नुसत्या दुधाचा चहा पितात. परंतु, तो आरोग्यास चांगला नाही. त्यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळणे, पोटफुगी असे वेगवेगळे विकार होतात. चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त हवे. शक्य असेल तर गुळाचा चहा प्या. साखरेचा चहा टाळल्यास पोटाचे निम्मे आजार आपोआप दूर होतील.
दिवसाला पाच ते दहा कप अति उकळलेला चहा पिणाऱ्यांची पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध असे अनेक विकार जडतात.भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थूलता असे विकार जडू लागतात.दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ, पित्त आणि वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.टपरीवर चहा ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. ॲल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क अल्झायमर (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.चहा रक्ताची आम्लता वाढवतो. हाडे ठिसूळ करतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.