पुण्यात गेल्या दोन तासांपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. याबाबत हवामान विभागाने कालच जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता.
शहरातील अनेक भागांत आभाळ भरून आले असून, विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडला. स्वारगेट, कात्रज, कोंढवा, गोकुळ नगर, भारती विद्यापीठ भागांत तसेच केशव नगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, खराडी आणि नगररोड परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वडगावशेरीतील अनेक रस्ते जलमय झाले. तसेच, अनेक घरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने पार्किंग मधील वाहनांचे नुकसान झाले. धानोरी परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड होऊन बसले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. बाजीराव रोड वरील छायाचित्र. पावसाने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, राज्यात पुढील आठवडाभर आभाळ ढगाळ आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.