सातारा: कास धरणाची उंची वाढवण्याची संकल्पना साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष (कै.) श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज यांनी साकारली होती. त्यांची संकल्पना अस्तित्वात येत आहे याचा मनस्वी आनंद असल्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. कास धरण उंची वाढविण्‍याच्‍या तिसऱ्या टप्‍प्‍यातील अंतिम कामास आज त्‍यांच्‍या उपस्‍थितीत सुरुवात झाली. या वेळी त्‍यांनी कास येथे बोटिंग, प्रेक्षागॅलरी उभारणे इत्यादी प्रस्ताव लवकरच मंजूर करून घेऊन स्थानिकांच्या रोजगार वाढीचे सर्व प्रयत्न करणार असल्‍याचे सांगितले.

कास धरण साकारण्‍याचा पहिला प्रयत्‍न १८५३ मध्‍ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी सर्वप्रथम केले होते. दादामहाराज हे साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष असताना मूळ धरणाची उंची वाढवण्याची आणि कास बंदिस्त पाइपलाइनची संकल्पना त्‍यांनी मांडली होती.
यानंतर ते काम महसूलमंत्री असताना उदयनराजेंनी पूर्ण केले. कास भिंत उंची वाढविण्‍याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, पावसाळ्यामुळे तिसऱ्या टप्‍प्‍यातील बंद ठेवलेले काम आज सुरू झाले. हे काम येत्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होणार असल्‍याने सातारकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही.
या कामाची पाहणी केल्‍यानंतर उदयनराजे म्‍हणाले, ‘‘कास येथील निसर्गसौंदर्याचा पर्यटन विकासासाठी वापर करता येऊ शकेल. यासाठी येथे बोटिंग व प्रेक्षागॅलरी उभारण्‍याचा विचार आहे. या दोन्‍ही कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
येथील ग्रामस्‍थांचे प्रलंबित प्रश्‍‍न देखील सोडविण्‍यासाठी आम्‍ही आग्रही आहोत.’’ सध्‍या कास येथील फुले पाहण्‍यासाठी देशभरातून पर्यटक येत आहेत. कास भागातील पर्यटन विकासाला चालना दिल्‍यास हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण होईल, असा विश्‍‍वासही त्‍यांनी या वेळी व्‍यक्‍त केला.
या वेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, तसेच इतर अधिकारी उपस्‍थित होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here