संजीव वेलणकर

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो

अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ॥

रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो

आनंदे प्रेम तें आले सद्‌भावे क्रीडतां हो ।।उदो।।

नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), श्री ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुक्ल पंचमी ला उपांग ललिता व्रत करावयाचे आहे. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. एखाद्या करंडकाचे झाकण हे हिचे प्रतीक मानून पूजेला घेतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात.

ललितादेवीचे ध्यानमंत्र असे आहेत-

नील कौशेवासनम हेमाभम कमलासनम.

भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।।

” कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.” या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवैद्यासाठी लाडू, वडे, घारगे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वायन (वाण) देतात. रात्री जागरण व कथा श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी ललितादेवीचे विसर्जन करतात.

हेही वाचा: कोणत्या राज्यात कसा साजरा करतात नवरात्र उत्सव? जाणून घ्या

नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी घारगे आणि तांदुळाचे वडे करतात.

काकडीचे घारगे

साहित्य. जून काकडीचा कीस, गूळ, मीठ, तांदळाचे पीठ, जिरे, हळद.

कृती. भोपळ्याच्या घारग्याप्रमाणे पीठ तयार करून हे घारगे करावेत. येथे फक्त भोपळ्याच्या किसाऐवजी काकडीचा कीस वापरावा. घारगे (नारळाचे) साहित्य – १) १ नारळाचे खोबरे, २) खोबऱ्याइतकाच गूळ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोड जिरे, हळद, मीठ. कृती – नारळाच्या चवात गूळ घालून त्याचा पाक तयार करावा. त्यात जिरे, मीठ व हळद वाटून घालावी व त्याचा घट्ट असा पाक झाला की खाली उतरावा व त्यात मावेल एवढेच पीठ घालावे व भिजवून ठेवावे व १ तासानंतर वडे करावेत.

घारगे

घारगे

लाल भोपळ्याचे घारगे

साहित्य.२ वाटया भोपळा सोलून कीस करून, १ वाटी किसलेला गूळ, तांदुळाचे पिठ, १/२ चमचा तेल, तळणासाठी तेल.

कृती. प्रथम एका भांडयात भोपळा उकड्ण्यासाठी ठेवावा झाकण ठेवावे भोपळा वाफेवर शिजवावा. भोपळा शिजला की त्यात गूळ घालावा व गूळ पुर्ण एकजीव झाला कि त्यात मावेल एवढे तांदळाचे पिठ घालावे. मिश्रण छान चमच्याने एकजीव करावे. आणि झाकण लावून वाफवून घ्यावे. थंड झाले की छान मळून घ्यावे. थोडेसे तेल लावावे. एका प्लास्टिक पेपर वर तेल लावून छान थापुन पुऱ्या कराव्या. गरम तेलात छान खरपुस तळून काढाव्या.

हेही वाचा: आजचा रंग केशरी : पपई – आरोग्यासाठी लाभदायी

तांदळाचे वडे

साहित्य. ३ वाट्या तांदूळ, ५०० ग्रॅम गूळ, ४ वेलदोडे पूड, ३ चमचे खोबऱ्याचे काप, ३ चमचे पांढरी चवळी, अर्धा चमचा हळद.

कृती. तांदूळ तासभर भिजत ठेवावेत. पाणी बदलून चाळणीवर तांदूळ निथळत ठेवावे. वाटल्यास फडक्यावर पसरून ठेवावे. कोरडे होऊ लागले की खलात घालून कुटून घ्यावे. हे तांदळाचे पीठ फिक्या बदामी रंगावर येईपर्यंत भाजावे. भाजून झाले की पीठ मापून घ्यावे. तितकाच गूळ मापून घेऊन बारीक चिरावा. एका पातेल्यात अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात गूळ घालावा. पातेले चुलीवर ठेवावे. एकीकडे चवळी कोरडी भाजून घ्यावी. गूळ पातळ होऊन विरघळला की त्यात कुटलेले पीठ, हळद व भाजलेली चवळी घालावी. मिश्रण घट्टसर होईपर्यंत चुलीवर ढवळावे. घट्ट झाले की खाली उतरवून त्यावर वेलचीपूड घालावी. मिश्रण निवाले की त्याचे बेताच्या आकाराचे वडे तळून ठेवावे. कुकरमध्ये चाळणीवर केळीचे (किंवा कर्दळीचे) पान धुवून ठेवावे. त्यावर हे वडे ७-८ मिनिटे वाफवावे. गार झाले की लोण्याशी खावे.

हेही वाचा: Mental Health Day 2021: लॉकडाऊनमुळे आलेल्या एकटेपणाचं काय करायचं?

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here