कोलकात्याच्या शाकीबनं विजयी फटका मारला, त्यावेळी कव्हरवर उभा असलेल्या विराट कोहली हळूवारपणे खेळपट्टीकडे आला. मात्र, यावेळी त्याची देहबोली सर्वकाही बोलून जात होती. त्याची मान झुकलेली होती अन् चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती. प्रत्येक सामन्यानंतर त्याच्यामध्ये दिसणारी आक्रमकता आणि उत्साह मावळला होता. या परिस्थितीतही त्याने प्रतिस्पर्धी आणि संघातील खेळाडूंसोबत खिलाडूवृत्तीनं हस्तांदोलन केलं. पण खेळपट्टीवर जात एलईडी बेल्स हळूवारपणे पाडत मनातील खिन्नता त्याला लपवता आली नाही. कर्णधार म्हणून त्यानं अखेरचा स्टम्पला स्पर्श केला होता. अक्षरशः यंदाही विराटच्या पदरी आयपीएल ट्रॉफी आलीच नाही. एकाच संघाकडून आजतगायत आयपीएल खेळणाऱ्या विराटच्या चाहत्यांना याचं दु:ख वाटलेच असेल. पण आयपीएलवर राज्य करणाऱ्या विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा शेवट मनाला चटका देऊन गेला. सर्वोत्परी प्रयत्न करुनही विराटला एकदाही चषक पटकावता आला नाही. कधी नशीबानं साथ दिली नाही, तर कधी संघातील इतर खेळाडूंनी….

धोनीचे चाहते नेहमीच विराट कोहलीला ट्रोल करण्यात आघाडीवर असतात. विराट कोहलीला ट्रोल करण्यात ते धन्यता मानतात. विराट कोहलीला आयपीएल चषक, अथवा आयसीसीची एकही ट्रॉफी आतापर्यंत जिंकता आलेली नाही असं बोललं जाते, पण हे अर्धसत्य आहे. कारण, ज्यावेळी मिसरुड फुटलं नव्हतं तेव्हा विराटनं भारताला विश्वचषक जिंकून दिलाय. मुळात प्रश्न चषक जिंकण्याचा नाही, कारण चषक कुणी एकटा व्यक्ती जिंकत नाही. त्याला सर्व संघाचं योगदान गरजेचं असते. विराट कोहली कर्णधार असताना भारतीय संघानं अनेक विक्रम केले. धोनीलाही शक्य न झालेल्या गोष्टी त्यानं करुन दाखवल्या. पण या दोन महान खेळाडूंची तुलना का होते? त्या त्या वेळची परिस्थिती नेहमीच वेगळी असते. विराट-सचिन, धोनी-गांगुली, विराट-गांगुली… तुम्ही खेळाडूंची तुलना कधीपर्यंत कराल? यापलीकडेही खूप क्रिकेट आहे. हे आपण विसरतोय का? या प्रश्नांचा क्रिकेट चाहत्यांनी कधीतरी शांत डोक्यानं विचार करायलाच पाहिजे… आपण आपल्याच खेळाडूंना ट्रोल करण्यात का धन्यता मानतो… धोनी, सचिन, विराट किंवा गांगुली अथवा कपिल देव आणि गावसकर हे महान खेळाडू आहेतच.. अन् यापुढेही राहणार आहेत… पण एकमेकांची तुलना करत तुम्ही कमीपणा का आणताय? विराटला चषक जिंकता आला नाही, हो हे वास्तव आहे… पण त्यानं भारतीय संघाला आतापर्यंत काय दिलेय? याचाही विचार होणं गरजेचं आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात निरोप घेताना त्याचे डोळे पाणावले होते. आपण 120 टक्के देऊ शकत नाही म्हणून एखादा खेळाडू कर्णधारपद सोडतोय….. मग ते आयपीएलचं असो किंवा टी-20 संघाचं… पण ही एका महान खेळाडूची निशाणी नाही का?

कोणत्या कर्णधाराला ट्रॉफी उंचवायला आवडणार नाही? विराट कोहली संघातील खेळाडूनं विकेट जरी घेतली तरी त्यापेक्षा जल्लोष करत असतो. संघातील खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम तो सातत्यानं करत असल्याचं आपण पाहिलेय. कर्णधार असताना आणि खेळाडू होता, तेव्हाही. मनोरंजनाचं असेलेलं व्यासपीठ आता थोडं बाजूला ठेवूयात. आठवडाभरात सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली अखेरचं भारताच्या टी-20 संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएलची ट्रॉफी उंचावत विराटला फ्रेन्चायजी कॅप्नसीचा शेवट गोड करता आलं नाही. पण आता टी-20 विश्वचषकात निळ्या जर्सीमध्ये तो आपल्या कर्णधारपदाचा शेवट गोड करेल अशीच इच्छा आहे….

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here