भारतातील सर्वोत्कृष्ट हॉटेल्स कोणती हा प्रश्न कोणती, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. ट्रॅव्हल मॅगझिन कोन्ड नास्टने २०२१ साठी रीडर्स चॉईस अवॉर्डची यादी नुकतीच जाहीर केली. भारतासह आणि अनेक देशांतील सर्वोत्तम हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची नावे या यादीमध्ये जाहीर करण्यात आली आहेत. ही रँकिंग आलिशान हॉटेल्सच्या सुविधा आणि ग्राहक सेवेवर आधारित आहे.या अवॉर्डनुसार भारतातील कोणती हॉटेल्स टॉप १० मध्ये आहेत हे आपण पाहूया.

१) लीला पॅलेस ( नवी दिल्ली)-
हे अलिशान हॉटेल तब्बल ९८.४१ गुणांसह भारतातील सर्वोत्कृष्ट हॉटेल ठरलं आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त रुम्स, स्विमिंग पूल, खास पाहुणचार अशा अनेक वैविध्यपूर्ण कारणांमुळे भारतातील इतर हॉटेल्सना पाठीमागे टाकत हे हॉटेल प्रथम क्रमांकावर आले आहे. या हॉटेलमध्ये एक दिवस मुक्काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ११,००० रुपये मोजावे लागतील
२) ताज लेक पॅलेस (उदयपूर)-
तलावाच्या मधोमध वसलेले हे सुंदर हॉटेल ९८.४१ गुणांसह भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं हॉटेल ठरलं आहे. इथल्या शाही बेडरुम्समधून निसर्गाचं अद्भूत सौदर्य अनुभवता येते. या अलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी तुम्हाला तब्बल ४०,००० रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल.
३) ओबेरॉय हॉटेल (दिल्ली)-
९८.४१ गुणांसह हे हॉटेल भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं हॉटेल ठरलं आहे. या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा रुम्स, सुंदर गार्डनसह अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. या हॉटेलमध्ये एक दिवस मुक्काम करण्यासाठी तुम्हाला तब्बल ३०,००० रुपये मोजावे लागतील
४) लोधी हॉटेल ( दिल्ली)-
चौथ्या क्रमांकावर आहे दिल्लीतील लोधी हॉटेल. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्थित या हॉटेलनं ९८.३२ गुण मिळवले आहेत. सुप्रसिद्ध लोधी गार्डन शेजारी वसलेले हे हॉटेल आपल्या रुबाबदारपणासाठी देशभर प्रसिद्ध आहे. शहरातील सर्वोत्तम भोजन व्यवस्था हे या हॉटेलचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. या हॉटेलमध्ये एक दिवस मुक्काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी १५,००० रुपये मोजावे लागतील.
५) राजमहल पॅलेस (जयपूर)-
पाचव्या स्थानावरील या हॉटेलला ९८.२९ गुण मिळाले आहेत. उत्कृष्ट रुम्स, सुंदर बगीचा, स्विमिंग पूल या गोष्टी या हॉटेलच्या सौंदर्यात भर पाडतात. या हॉटेलमध्ये एक दिवस मुक्काम करण्यासाठी तुम्हाला तब्बल ४५,००० रुपये मोजावे लागतील.
६) सूर्यगड हॉटेल (जेसलमेर)-
या क्रमवारीमध्ये ९८.२८ गुणांसह सूर्यगड हॉटेलने सहावं स्थान मिळवलं आहे. आपल्या देखण्या इमारतीसाठी सूर्यगड हॉटेल प्रसिद्ध आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे ठिकाण फक्त देशातच नाही तर देशाबाहेरही प्रसिद्ध आहे. किल्ल्यासारखं भासणारं हे हॉटेल अनेक प्रसिद्ध लोकांच्या पसंतीचं ठिकाण आहे. या हॉटेलमध्ये एक दिवस मुक्काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी १२,५०० रुपये मोजावे लागतील.
७) ताज पॅलेस (दिल्ली)-
राजधानी दिल्लीतील हे हॉटेल ९८.०६ गुणांसह सातव्या स्थानी आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी कमीत कमी ६,००० रुपये मोजावे लागतात.
८) ताज हॉटेल (मुंबई)-
भारतातील सर्वोत्कृष्ट हॉटेलची चर्चा व्हावी आणि त्या यादीत मुंबईच्या ताज हॉटेलचा समावेश नसावा, असे होणे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सेवा बजावणारं हे हॉटेल जगभरात प्रसिद्ध आहे. या हेरिटेज हॉटेलने तब्बल ९६.६८ गुणांची कमाई केली आहे. या हॉटेलमध्ये नऊ शानदार रेस्टॉरंट आणि एक बारदेखील आहे. हॉटेलच्या रुम्समधून अरबी समुद्राचे मनमोहक दृश्य दिसते. सुप्रसिद्ध गेट वे ऑफ इंडियाचं सुंदर दर्शन हॉटेलच्या रुम्समधून होतं. शाही पाहुणचार काय असतो, हे या हॉटेलमध्ये आल्यावर अनुभवता येतं. या हॉटेलमध्ये एका दिवसासाचा मुक्काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी १६,००० रुपये मोजावे लागतील.

९) ओबेरॉय उदयविलास (उदयपूर)-
‘पिचोला’ तलावाच्या किनारी वसलेल्या या देखण्या हॉटेलला ९५.०७ गुण मिळाले आहेत. ३० एकरांच्या हिरव्यागार परिसरात वसलेल्या या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल तसेच स्पा उपलब्ध आहे. तलावाचे आकर्षक दृश्य या हॉटेलची शान अजून वाढवतं. या हॉटेलच्या प्रिमीयम रुममध्ये एक रात्र काढण्यासाठी तब्बल ३३,००० रुपये मोजावे लागतात.

१०) रामगड पॅलेस (जयपूर)-
या यादीमध्ये जयपूरच्या हॉटेल रामगड पॅलेसनं ९३.४६ गुणांसह दहावं स्थान पटकावलं आहे. हे हॉटेल राजा-महाराजांच्या महालासारखे भासते. आलिशान खोल्यांव्यतिरिक्त, शाही अतिथीगृहे आणि उत्कृष्ट लॉजेस देखील येथे आहेत. डेस्टिनेशन वेडींग आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी हे जयपूरमधील हे सर्वात शाही ठिकाण आहे. या हॉटेलच्या गार्डन व्ह्यू रूममध्ये रात्रीच्या मुक्कामाचे भाडे सुमारे ३१,००० रुपयांपासून सुरू होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here