कराड : पालिकेच्या शहरातील स्थावर मालमत्तेमधील तब्बल ७०४ गाळ्यांपैकी ५०० हून अधिक गाळेधारक व्यापाऱ्यांना दुप्पट भाडेवाढीचा झटका बसणार आहे. याबाबतच्या नोटिसा पालिकेने व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, जुन्यासहीत नव्या गाळ्यांचा कर मोठ्या प्रमाणात थकीत आहे, त्याच्या वसुलीसह वाढीव उत्पन्न मिळावे, यासाठी पालिकेने भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्याला लवकरच त्रिसदस्यीय समितीतही मान्यता घेण्यात येणार आहे.
पालिकेला मार्च २०२१ पर्यंत गाळ्यांच्या भाड्यातून दोन कोटी ५० लाखांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात केवळ एक कोटी २६ लाखांचा महसूल जमा झाला. त्यात पालिकेने जनरल गाळ्यातून ५१ लाख ७६ हजार, आययुडीपीतील गाळ्यांतून ३२ लाख ८० हजार, आययुडीपी योजनेतील गाळ्यांतून २८ लाख ५८ हजार, तर युडी सहा योजनेतील गाळ्यातून १३ लाख ७९ हजारांचा महसूल मिळाला आहे. दोन कोटी ५० लाखांपैकी केवळ सव्वा कोटींची भाडेवसुली झाली आहे. अद्याप सव्वा कोटीच्या थकीत कराच्या वसुलीचे आव्हान असतानाच दुप्पट भाडेवाढीचा प्रस्तावाने खळबळ उडाली आहे. ७०४ पैकी ५०० गाळेधारकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यात वाढीव दुप्पट कर आकारणी होणार आहे. तेही भाडे थकीत गेल्यास कर थकीत रकमेत वाढ होणार आहे. त्याच्या वसुलीचे पालिकेला नियोजन करावे लागणार आहे.

शहरात तब्बल ७०४ गाळ्यांपैकी जनरल योजनेतून २०८, आययुडीपीतून २३०, तर युडी सहा योजनेतून २६८ गाळ्यांची उभारणी पालिकेने केली आहे. पालिकेच्या गाळ्यांच्या स्थावर मालमत्तेत ६९८ गाळे आहेत. चार हॉल, तर दोन इमारती आहेत. त्यांचे भाडे अनेक वर्षांपासून एकसारखे आहे. यंदा मात्र त्या भाड्यात दुपटीने म्हणजेच १०० टक्के वाढीचा प्रस्ताव प्रशासकीय आहे. पालिकेच्या नव्या व जुन्या गाळेधारकांकडून तब्बल दोन काटी ५० लाखांचा कर स्वरूपात महसूल पालिकेला जमा होतो. त्यातील ५०० हून अधिक गाळे धारकांच्या भाड्यात एकदम १०० टक्क्यांनी दुप्पट वाढ होणार आहे. तो व्यापाऱ्यांसाठी झटकाच असणार आहे. मात्र, वर्षानुवर्षे एकच भाडे आकारले होते. त्यात फक्त यंदाच वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत १०० टक्क्यांची वाढ होऊन गाळ्यांच्या भाड्यापोटी जमा होणार महसूल पाच कोटींच्या घरात निश्चित जाणार आहे.
Esakal