पत्नीचा अपघाती मृत्यू आणि त्यनंतर काही वर्षांनी आई-वडीलांच्या निधनामुळे ते मानसिकरित्या पूर्णपणे खचले. व्यसनांच्या आहारी गेले आणि त्यांच्या जीवनात काळोख दाटून आला. मात्र, काही दिवसांनी त्यांना स्वत:ची जाणीव झाली आणि या सुंदर जगासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे वाटले. त्यानंतर त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जगाची सायकल यात्रा सुरु केली. मलेशियातील अपघातात गंभीर जखमी होऊनही ते माघारी फिरले नाही. आतापर्यंत त्यांनी ६१ हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला असून सध्या ते आपल्या यात्रेतील ६०व्या देशात आहेत. ही कहाणी आहे डॉ. राज ऊर्फ सायकलबाबची..!

सायकल बाबाचे नाव डॉ. राज पाडेयन असून मे भारतातील हरिणायामधील फतेहाबाद जिल्ह्यातील भुगा गावचे निवासी आहे. त्यांनी बी. एस्सी. नंतर एम.डी.चे (आयुर्वेद चिकित्सक) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांचा विवाह ४ मार्च २००६ रोजी डॉ. कविता यांच्याशी झाला. त्या दोघांनी ‘आस्था’ नावाचे रुग्णालय सुरु करत समाजातील गरजूंवर मोफत उपचार सुरु केले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे त्यांचे हे रुग्णालय अल्पावधीत नावारूपाला आले. त्यांच्या जीवनात सर्व काही सुरळीत सुरु असताना २ ऑक्टोबर २००८ रोजी डॉ. राज यांच्या पत्नीचा एक रोड अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. राज पूर्णपणे खचले आणि त्यांना मानसिक नैराश्य आले. यात साधारणतः: एक वर्षाचा काळा लोटल्यानंतर आता आपल्याला आई-वडील व गरीब रुग्णांच्या सेवेसाठी जगावे लागेल, याची जाणीव त्यांना झाली. यानंतर त्यांनी पत्नीच्या स्मृतीप्रित्यार्थ पुन्हा एकदा रुग्ण सेवेला वाहून घेतले. त्यांच्या नातेवाइकांनी पुन्हा लग्न करण्याचा त्यांना आग्रह धरला. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला.

डॉ. राज रुग्ण सेवेत व्यस्त असताना त्याच्यावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. २०१४ मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले. या दुःखातून ते सावरत असताना २०१५ मध्ये त्यांच्या वडीलांचे निधन झाले. यामुळे त्यांना मनावर मोठा आघात झाला आणि पुन्हा एकदा ते नैराश्याच्या गर्तेत लोटले गेले. त्यांनी सांगितले की, त्यानंतर जीवनातील सहा महिन्याचा काळ कसा गेला हेच कळले नाही. याच काळात मी अंमली पदार्थांच्या आहारी गेलो. जीवनात चारही बाजूने कोळोख दाटून आला आणि पुन्हा उभारी घेण्याची आशाच मावळली. मात्र, एक दिवस मनात विचार आला, आता हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि मी पुन्हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहू लागलो.

डॉ. राज पुन्हा जीवनाची लढाई लढण्यासाठी सिद्ध झाले. या वेळी मात्र त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वाहून घेण्याचा निर्धार केला. पर्यावरणाबाबत त्यांना वडिलांकडून लहानपणीच शिकवण मिळाली होती. त्यांना वायू प्रदूषण आणि वृक्षतोडीबाबत लहानपणापासूनच चिंता होती. यामुळे ते पर्यावरणाबाबत जागरूक होते. यातून त्यांनी जगाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जगभर सायकल यात्रा करण्याची मोहीम आखली. सायकलवरुन एवढा मोठा प्रवास करणे अवघड काम आहे. याची जाणीव त्यांना होती. याबाबत ते म्हणतात, ‘‘मी जगाला पर्यावरण संवर्धनाचे डोस इतरांना द्यायचे आणि स्वत: वायू प्रदूषण करत वाहनातून फिरायचे, हे माझ्या मनाला पटले नाही. यामुळे मला या मोहिमेसाठी सायकल खूप जवळची वाटली. कारण सायकलमुळे वायू प्रदूषण होत नाही.’’

हेही वाचा: वेडात मराठे वीर दौडले पाच

२०१६ मध्ये त्यांनी सायकलवर भारत भ्रमण केले. सहा महिन्यांत त्यांनी देशातील विविध राज्यांत जाऊन पर्यावरणाबाबत जनजागृती केली. त्यानंतर त्यांनी ‘व्हिल्स फॉर ग्रीन’ या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात केली. या यात्रेची सुरुवात त्यांनी श्रीलंकेतून केली. त्यानंतर बांगलादेश, हाँगकाँग, मलेशिया या यह दक्षिण आशिया खंडातील विविध देशांची त्यांनी सैर केली. या ठिकाणी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर त्यांनी युरोप खंडातील बऱ्याच देशांची यात्रा केली. याच कालावधीत मार्च २०१९ मध्ये जगात कोरोना संसर्ग सुरु झाला. यामुळे प्रवासावर निर्बंध आल्याने डॉ. राज यांच्या सायकलचा वेग मंदावला. ते युरोप खंडातून भारतात आले.

भारतात कोरोनाचे कडक निर्बंध असल्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. याकाळात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली. त्यानंतर निर्बंध शिथिल झाले, खरे पण परदेशी प्रवासावर बंधने कायम होती. या काळात डॉ. राज यांनी जम्मू काश्मीर, लेह, लडाख, शिमला आणि मनालीच्या बराच भागात त्यांच्या सायकलची चाके धावली. पुन्हा भुना (हरियाना) येथे आल्यावर काही काळ त्यांनी विश्रांती केली. तोपर्यंत जगात कोरोना प्रादुर्भाव काहीसा ओसरल्याने अटी-शर्थीवर अनेक देशांनी प्रवासासाठी विदेशी नागरिकांसाठी दारे खुली केली. या अटींचे पालन करत सायकल बाबा आपल्या यात्रेला पुन्हा सुरुवात करत आफ्रिका खंडात जाण्यासाठी सज्ज झाले. या मोहिमेची सुरुवात त्यांनी इजिप्त देशातून केली. पुढे त्यांनी सुदान, इथोपिया, युगांडा, रवंडा, झांजिबार या देशांत प्रवास केला. सध्या त्यांची सायकल टंझानियामधील महामार्गांवर धावत आहे.

सायकल बाबा हे कसे नाव मिळाले ?
डॉ. राज सुरुवातीला विविध देशात यात्रा करत असताना यु-ट्यूबवर व्हिडिओ प्रसारित करत नव्हते. मात्र, नंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाबर व्हिडिओ प्रसारित करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांच्या यु-ट्यूब चॅनलची खास ओळख नव्हती. मात्र, फिलीपीमधील राजदुतांनी त्यांना ‘सायकल बाबा’ हे नाव दिले. पुढे डॉ. राज ऐवजी लोक त्यांना सायकलबाबा नावाने ओळखू लागले.

हेही वाचा: इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाक्का

जगभ्रंमतीच्या खर्चाबाबत…
या साहसी यात्रेच्या खर्चाबाबत डॉ. राज यांना विचारले असते ते सांगतात की, ”हा सर्व खर्च मी स्वत: उचलतो. सुरुवातीला माझ्याकडे या मोहिमेसाठी पैसे नव्हते, म्हणून मी माझी वडिलोपार्जित जमीन व प्लॅट विकला. यातून यात्रेसाठी पैसे उभे केले. कधी गरज पडल्यास हितचिंतक मदतीला धावून येतात. मला जमीन विकल्याचा अजिबात पश्चाताप होत नाही. कारण या यात्रेतून पर्यावरणाची जनजागृती होत असून हे माझ्या जीवनातील सर्वात उच्च व समाधानाचे काम आहे.”

सायकलचे नाव ‘धन्नो’
जगाचा प्रवास करायचा म्हटले की, ”सायकल देखील तशीच खास असायला हवी. डॉ. राज यांची सायकल सूरली कंपनी असल्याचे ते सांगतात. तिची किंमत ७० ते ८० हजारांच्या आसपास आहे. तिच्यावर ते दररोज सुमारे ५० किलोचे जीवनावश्यक साहित्य घेऊन प्रवास करतात. या सायकलचे नाव त्यांनी ‘धन्नो’ ठेवले आहे. कधी विमानाने प्रवास करायची वेळ आली, तर ते ही सायकल पूर्णपणे खोलून बॉक्समध्ये पॉक करतात व अपेक्षीत स्थळी पोचल्यावर ती पुन्हा जोडतात. आपल्या बहुतांशी व्हिडीओमध्ये ते या सायकलबद्दल बरेच काही बोलत असतात.”

वनस्पती चरबी
डॉ. राज यांनी आतापर्यंत प्रवास केलेल्या प्रत्येक देशात झाडे लावली असून तेथील नागरिकांकडून त्यांच्या संवर्धनाचे आश्वासनही वदवून घेतले आहे. त्यातील बरीच झाडे मोठी झाल्याचे ते सांगतात. ज्या देशामध्ये ते जातात तेथे भारतीय राजदुताच्या परिसरात वृक्षारोपणाचा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. शक्य असेल त्या ठिकाणी ते ‘सीड बॅल’ तयार करून रस्त्यांच्या कडेला टाकतात. त्यांनी आतापर्यंत एक हजाराहून अधिक जनजागृतीपर कार्यक्रम विदेशात घेतले आहे. देश-विदेशातील शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत माहिती देण्यावर त्यांचा जास्त भर असतो.

सायकल बाबाची दोन वेळा लूट
देशी प्रवास करणे सोपे वाटत असले, तरी विदेशात मात्र हे काम कठीण असते. कारण त्या ठिकाणचे लोक, भौगोलिक भाग सर्व काही नवे असते. यात्रेतील सकारात्मक बाबींवर डॉ. राज जास्त बोलत असले, तरी काही नकारात्मक गोष्टीही त्यांच्या यात्रेत घडत असतात. इराणमध्ये चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाईल व कॅमेऱ्याची लूट केली होती. आतापर्यंत दोन वेळा मला या प्रवासात लूटल्याचे ते सांगतात. इजिप्तमध्ये लहान मुलांनी पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यावर दगडफेक केली होती. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. या संकटाचा सामना करण्यासाठी आता मन तयार झाल्याचेही ते सांगतात.

हेही वाचा: काळ्या जादूचे ‘चक्रव्यूह’ भेदताना

मलेशियातील अपघातात गंभीर जखमी
या यात्रेदरम्यान डॉ. राज यांना दोन वेळा अपघात झाले आहेत. मलेशियात असताना त्यांच्या सायकलला एक महिलेच्या मोटारीची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. यानंतर डॉ. राज आता जगाची यात्रा थांबवतात की काय, अशी शंका त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली. मात्र, उपचार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या यात्रेला पुन्हा सुरुवात केली.

दहा वर्ष हॉस्पिटल चालवले
डॉ. राज यांनी एम.डी.(आयुर्वेद चिकित्सक) असून सुरुवातीला त्यांनी आपल्या पत्नीच्या (डॉ. कविता) मदतीने भूना येथे आस्था हॉस्पिटल सुरु केले. या रुग्णालयात गरजूंना मोफत आरोग्य सेवा पुरवली जात होती. मात्र, पत्नीच्या अपघाती मृत्युमुळे डॉ. राज पूर्णपणे खचले. काही दिवसानंतर ते पुन्हा रुग्ण सेवत परतले आणि हॉस्पिटलला दिवंगत पत्नी डॉ कविता यांचे नाव दिले. पुढे पाच ते सहा वर्ष त्यांनी पुन्हा रुग्ण सेवेला वाहून घेतले. मात्र, आई-वडीलांच्या निधनानंतर डॉ. राज यांनी रुग्णसेवा पूर्ण विराम दिला. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एकूण दहा वर्ष हॉस्पिटल चालवले आहे.

या देशांची केली यात्रा :
श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस, मलेशिया, सिंगापूर, ब्रुनेई, इंडोनेशिया, तिमोर, फिलिप, ताइवान, जपान, कोरिया हाँगकाँग, मकाऊ, ओमान, यूएई, इराण, अझरबैजान, आर्मेनिया, जॉर्जिया, तुर्की, इटली, वेटकॉनसिटी, सैन मैरिनो, स्लोवेनिया, क्रोएशिया, हंगेरी, स्लोवाकिया, ऑस्ट्रिया, चेक गणराज्य, पौलॅंड, लिथुआनिया, लातविया, एस्टोलनया, फिनलंड, इंग्लंड, स्कॉटलंड, आर्यलॅंड, अमेरिका, इजिप्त, सुदान, इथोपिया, युगांडा, रवंडा, झांजिबार, टांझानिया.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here