मुंबई : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तानिमित्त सर्वत्र खरेदीचे वातावरण होते. दसऱ्याला पुस्तकाची पूजा, शस्त्रपूजा, वाहनांची पूजा व रोजच्या वापरातील वस्तूंची पूजा केली जाते. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या उपनगरीय लोकलची प्रवाशांकडून पूजा करण्यात आली.
रंगीबेरंगी पताके, फुले, हार यांनी लोकलला सजविण्यात आले होते. तर, महिला डब्यातील महिला प्रवाशांनी लोकलमध्ये गरबा केला. गुरुवारी, (ता.14) रोजी दसऱ्यानिमित्त नागरिकांकडून बाजारात खरेदीची लगबग सुरू होती. मुंबई महानगरातून नागरिक लोकलने दादर, परळ येत होते. आपट्याची पाने, नारंगी, पिवळा रंगांच्या झेंडूची फुले खरेदी केली जात होती. शुक्रवारी दसऱ्याची अनेक कार्यालयांना सुट्टी असल्याने गुरुवारीच प्रवाशांनी लोकलला सजविले. लोकलमधील प्रवासी गटांनी दररोजचा लोकल डबा रंगीबेरंगी फुलांनी, पताक्यांनी सजविला होता. लोकल डब्यावर देवीला फोटो लावून, हार घालून देवीची आरती करण्यात आली. त्यामुळे लोकलमधील वातावरण भक्तिमय झाले होते. महिला प्रवाशांनी नेहमीच्या प्रवाशांसह गरबा केला. मोबाईलवर गाणी लावत आणि स्वतः गाणी म्हणत लोकलमध्ये गरबा केला. तर, दररोज सुरक्षित इच्छित स्थानकावर पोहचविणाऱ्या लोकलच्या मोटरमनचा प्रवाशांकडून शाल, नारळ, पेढे देऊन सत्कार केला.