बौद्ध धर्मियांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे, कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे.

बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे, धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Pravartan Din). दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमी दिवशी साजरा करतात. यंदा दसरा अर्थात विजयादशमी 15 ऑक्टोबरला असल्याने धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 आणि 15 ऑक्टोबरला आहे.
पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन सेलिब्रेशनसाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे राज्यात प्रार्थनास्थळं खुली झाली असली, तरीही सामुहिक स्वरूपात धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा सलग दुसर्‍या वर्षी दीक्षाभूमीवर सामुदायिक स्वरूपात साजरा केला जाणार नाही.
बौद्ध धर्मियांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे, कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाखांपेक्षा जास्त अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता.
बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केलं म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.
सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी, नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. 2 ऑक्टोबर 2006 रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील 10 लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन 1957 पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात.
दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटलासुद्धा भेटी देतात. ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणांचा समावेश आहे. या दिनाच्या निमित्तानं दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात. सन 2018 मध्ये 62 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे 62000 तर सन 2019 मध्ये 67543 अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.
चंद्रपुरातील दीक्षाभूमी हे सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे. नागपूर येथे धर्मांतर केलेल्या 16 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी चंद्रपूर येथेही धर्मांतर सोहळा घडवून आणला, ज्यात सुमारे 2 ते 3 लाख लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. त्यामुळे दरवर्षी येथेही धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
औरंगाबाद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळ असलेल्या औरंगाबाद लेणी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. येथे शहरासह औरंगाबाद जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. या दिवशी देश-विदेशातील भिक्खू संघ धम्म प्रवचन देतात, 22 प्रतिज्ञांचे पठण घेतात.
सन 1987 पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर सुरु आहे. या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी प्रकाश आंबेडकर हे करत असतात. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर 9 ऑक्टोबर 2019 रोजी 63 वा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता.
दरम्यान, मागील दोन वर्षांपासून कोविड 19 नियमावलीचं पालन करत गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. म्हणूनच मागील वर्षी आणि यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमीवर कोणताही कार्यक्रम जनसामान्यांसाठी खुला नसेल.
मात्र, ऑनलाइन स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं, भीम अनुयायींना देखील कोविडचे नियम पाळत सुरक्षितपणे हा सण साजरा करण्याचं आवाहन केलं गेलंय.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here