पिंपरी : शहरात लसीकरण सुरु झाल्यापासून लोकसंख्येच्या तुलनेत २५ लाख जणांपैकी २१ लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यातील पहिला डोस १३ लाख ७५ हजार जणांनी घेतला आहे तर दुसरा डोस ७ लाख ४१ हजार जणांनी घेतला आहे. परंतु, साडेतीन लाख जणांचा पहिलाच डोस अद्यापपर्यंत बाकी असल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. उर्वरित नागरिकांना लस देण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत शोध मोहीम सुरु ठेवणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.

महापालिका प्रशासनाने ८ ऑक्टोंबरपासून सोसायट्या, चाळी, झोपडपट्टी, स्थलांतरित मजूर अड्डे व इतर ठिकाणी साडेतीन लाख जणांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी चतुर्थ श्रेणीतील १२५ मनुष्यबळ कर्मचारी महापालिकेने नेमले आहे. ते सध्या घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत. परंतु, यातूनही लसीकरणासाठी ३० ते ४० जण अवघे लस देण्यासाठी सापडत आहेत. त्यामुळे, नेमके लसीकरण चुकवेगिरी करणारे कोण आहेत, याचा शोध प्रशासनाच्यावतीने सुरु आहे.

यातील बरेच जण हे सुशिक्षित नागरिकदेखील आहेत. लसीकरणावर अद्यापही विश्वास नसल्याने लस टोचून घेण्यास ते पुढे सरसावत नसल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी लशीचा तुटवडा असताना लस घेण्यासाठी रांगा लागत होत्या. नागरिकांची झुंबड उडत होती. आता परिस्थिती उलट झाली आहे. नागरिकांना शोधून लसीकरणासाठी समुपदेशन करावे लागत असल्याने विरोधाभास दिसून येत आहे. शहरात नेमके लसीकरण कोणाचे राहिले आहे याचा शोध कोविन ॲपवरही लागत नाही. त्यामुळे, लसीकरणापासून वंचित राहिलेला परिसर समजणे कठीण झाले आहे.

दैनंदिन अडीच लाख लशींचा पुरवठा होत आहे. त्या तुलनेत दोनशे जणांचे लसीकरण होत आहे. घरोघरी लसीकरणासाठी मनुष्यबळाला सर्व सामग्रीसहित जाणे सध्या अवघड पडत आहे. यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ व यंत्रणेची गरज आहे. त्या अनुषंगाने काम सुरू आहे. लवकरात लवकर शोधमोहिम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here