देशातील ढोलावीरा आणि रुद्रेश्वर मंदिरांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश केला आहे. त्यानंतर भारताची जागतिक वारसास्थळे ४० झाली आहेत. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या युनेस्कोच्यावतीने जागतिक वारसास्थळ समितीच्या ४४ व्या परिषदेत भारतातील हडाप्पा संस्कृतीचे प्राचीन शहर ‘ढोलावीरा’ आणि तेलंगणातील सुप्रसिद्ध रुद्रेश्वर (रामाप्पा) मंदिर या दोन स्थळांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाला. त्यामुळे भारताने आपल्या मुकुटात दोन शिरपेच खोवताना आता ‘सुपर-४० क्लब’ गाठला आहे. पण जगातील अनेक छोटे देशांतील स्थळांची संख्या ही आपल्यापेक्षा खूपच अधिक असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या क्रमांकाच्या इटलीमध्ये तब्बल ५८ जागतिक वारसास्थळ आहेत, त्यावरुन आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे, हे दिसून येईल. कारण आपल्या खंडप्राय देशात आणखी ४०-५० वारसास्थळे नक्कीच आहेत.
जागतिक वारसास्थळ समितीच्या ४४ व्या परिषदेच्या या निर्णयानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, ‘‘ढोलावीरा आणि रामाप्पा मंदिराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर भारताने ४० स्थळांचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. हा दर्जा देताना त्यावेळचा समाज, त्यांची बुद्धीमत्ता, चालिरीती आणि नागरिकांचे जीवनमान, त्यांचा जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा गौरव केला आहे. तर २०१४ पासून भारतातील दहा स्थळांना जागतिक वारसास्थळांचा दर्जी मिळाला आहे.’’

आणखी सहा स्थळे तात्पुरत्या यादीत
जागतिक वारसास्थळ म्हणून सहा ठिकाणांची तात्पुरत्या यादीत आता नावे नोंद झाली आहेत. सातपुडा व्याघ्र प्रकल्प, वाराणसी येथील गंगानदीवरील घाट, हिरे बेनकल (कर्नाटक) येथील मेगॅलिथिक साईट (आदीमानवानी पाषाणाचा वापर करत तयार केलेली थडगी, बांधकाम), महाराष्ट्रातील मराठी सैनिकांची वास्तुकला (मराठी मिलिटरी आर्किटेक्चर), भेडाघाट-लमेटाघाड (नर्मदा खोरे, जबलपूर, मध्यप्रदेश) आणि कांचीपूरमची मंदीरे (तामिळनाडू) आदी सहा स्थळांची नावे आहेत. यांच्याशिवाय युनेस्कोकडे भारताने तब्बल ४८ ऐतिहासिक स्थळांची यादी दिली आहे. युनेस्कोच्या मार्गसुचीनुसार देशातील कोणत्याही पुरातत्वस्थळ, जागेची तात्पुरत्या यादीत समावेश करु शकता. त्यानंतर कोणत्याही देशाकडून एका वर्षानंतर त्या स्थळाची संपूर्ण माहिती युनेस्कोकडे सादर करता येते. मग त्यानंतर अभ्यास करुन त्या स्थळाला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्को जाहीर करते. यावेळी एकूण नऊ स्थळांची यादी भारतीय पुरातत्वशास्त्र खात्याने दिली होती. त्यापैकी सहांची तात्पुरत्या यादीत समावेश आहे.

काकतीय रुद्रेश्वर (रामाप्पा) मंदिर, तेलंगण
तेलंगण राज्यातील हे एक अतिशय सुंदर असे मंदिर आहे. राज्यातील पालमपेठ या गावात हे मंदिर आहे. भगवान शिवशंकरांचे हे मंदिर अतिशय सुबक आहे. हे मंदिर काकतीय राज्यांच्या कालावधीत (इस सन ११२३ ते १३२३) बांधण्यात आले आहे. मजबूत अशा संरक्षक भिंतीत मधोमध हे मंदिर वसले आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या कळसाचे वजन कमी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विटा या वजनाने अतिशय हलक्या आहेत. पूर्णपणे सछिद्र आहेत. त्यामुळे त्यांना ‘तरंगत्या विटा’ (फ्लोटिंग ब्रिक्स) म्हणतात. आणि हे अशा प्रकारचे उदाहरण जगात कुठेही आढळून आलेले नाही. मंदिरातील प्रत्येक खांब हा सुरेखरित्या, नाजूकपणे कातला आहे. त्यावर विविध कोरीव काम केले आहे. त्यावरील अतिशय वेगळ्या अशा मूर्ती नृत्य करताना दिसतात. त्यातून त्यावेळच्या तेथील चालीरिती आणि काकतीय संस्कृती दिसून येते. या मंदिरापासूनच जवळ काकतीय राजांनी बांधलेले धरण आहे. त्याला ‘रामाप्पा चेरुवु’ असेही नाव आहे. आणि येथून जंगल, परिसर आणि शेत-शिवाराचे अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. आणखी एक गोष्ट म्हणजे काकतीय रुद्रेश्वर मंदिराला ‘रामाप्पा’ मंदिर असेही नाव पडले आहे. त्याचे कारण म्हणजे ‘रामाप्पा’ या वास्तुशिल्पीने हे मंदिर बांधले. पुढे त्याचेच नाव मंदिराला पडले. भारतात फक्त या एकाच मंदिराला त्याच्या वास्तुशिल्पीच्या नावाने ओळखले जाते.
ढोलावीरा (हडाप्पा संस्कृतीचे शहर, गुजरात)
सध्याच्या गुजरात राज्यात हे स्थळ आहे. तेथे एक प्राचीन शहर होते, पण आता केवळ विविध अवशेष पाहायला मिळतात. इसवी सन पूर्व तिसऱ्या ते दुसऱ्या सहस्रकाच्या (पाच हजार वर्षापूर्वी) दरम्यान या शहराचे अस्तित्व होते. त्याकाळात ते एक अत्यंत भरभराटीला आलेले शहर होते. या शहराचा शोध तब्बल चार-साडे चार हजार वर्षांनी थेट विसाव्या शतकात म्हणजे १९६८ साली लागला. हडाप्पा संस्कृतीशी ढोलावीरा शहराची संस्कृती पूर्णपणे मेळ खाते. त्यावेळेची तेथील शहराची रचना ही अद्वितीय होती. तेथील नागरिकांचे जलव्यवस्थापन सर्वोत्कृष्ट होते. नगराची अनेक स्तरांची सुरक्षा यंत्रणा आजही पुरातत्वाशास्त्रज्ञांना अचंबित करते. बांधकामात मोठ्या प्रमाणात दगडांचा वापर झाला आहे. तसेच विशेष म्हणजे दफन करुन मृतदेहाची सुयोग्यरितीने विल्हेलाट लावण्याची प्रक्रिया एकमेवाद्वितीय ठरावी. ढोलावीराच्या नागरिकांना कलेतही प्रावीण्य प्राप्त झाले होते. तांब्याच्या विविध वस्तू ते बनवत असत. शंख, दगड, मौल्यवान खड्यांपासून विविध प्रकारची दागिनेही तेथील उत्खननात आढळून आली आहेत. तसेच मातीची भांडी, मडके इतर संसोरोपयोगी इतर विविध वस्तू, सोने, हस्तिदंत अशा अनेक वस्तू तेथे सापडल्या आहेत. तसेच त्या प्रदेशातील इतर समृद्ध संस्कृतीशीही ढोलवीराचा व्यापार-उदीम चालायचा. एकूणच मानवी विकासाच्या ज्या गोष्टी प्राचीन काळात झाल्या, त्याची साक्ष ढोलवीराचे अवशेष आजही देत आहेत.

ढोलावीरा आणि रामाप्पा मंदिराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर प्राचीन नागरिकांच्या जीवनशैली, चालीरिती, त्यांच्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि एकूणच समाजमनावर प्रकाश पडला आहे. युनेस्को जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसास्थळांना नव्याने ओळख देण्याचा प्रयत्न करत असते. त्या स्थळांची सुरक्षितता, जतन आणि परिसराचा विकास होण्याकडेही लक्ष पुरवते. या स्थळांमध्ये मानवी मूल्ये पाहते. १९७२ सालापासून अस्तित्त्वात आलेल्या वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेजने (जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसास्थळ) एकूणच मानवाचा इतिहास जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संघटनेने जगभरातील वारसास्थळांना मानवी इतिहासाला मूर्तस्वरुप देण्यात प्रयत्न सुरु केला आहे.
१६७ देशात १,१५४ वारसास्थळे
जगभरातील १६७ देशातील जागतिक वारसास्थळांची संख्या एकूण १,१५४ इतकी झाली आहे. जागतिक वारसास्थळ परिषदेत सहभागी झालेल्या देशांची ही संख्या आहे. पण त्यापैकी २८ देशांनी या परिषदेत भाग घेतलेला नाही. त्यामुळे या देशातील वारसास्थळाचा समावेश नाही. एकूण १,१५४ स्थळापैकी ८९७ वारसास्थळे ही सांस्कृतिक आहेत. २१८ नैसर्गिक (वन, नद्या, पर्वत, अभयारण्ये आदी) आहेत. तर ३९ स्थळे ही संयुक्त अशी आहेत. समितीने सुसुत्रीकरणासाठी देशांची पाच भौगोलिक क्षेत्रात विभागणी केली आहे. ती अशी ः १) आफ्रिका. २) मध्य आशिया. ३) आशिया आणि पॅसिफिक. ४) युरोप आणि उत्तर अमेरिका. ५) दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन.
या देशात एकही जागतिक वारसास्थळ नाही
बहामास, भूतान, ब्रुनेई, बुरुंडी, कोमोरस, कूक आयलंडस्, डीजिबुती, एक्वेटोरियल गिनीया, एस्वातिनी, ग्रेनाडा, गिनीया-बिसाऊ, गयाना, कुवैत, लायबेरिया, लिकटेंनस्टाईन, मालदिव्हज, मोनॅको, नौरु, निऊई, रवांडा, सेंट व्हिंसेंट अँड ग्रेनाडीनस्, समोआ, साओ टोम अँड प्रिन्सीप, सिएरा लिओन, सोमालिया, दक्षिण सुदान, टिमोर-लेस्टे, टोंगा, त्रिनिदाद अँड टोबॅगो आणि तुवालु. या २८ देशात सध्या तरी एकही जागतिक वारसास्थळ नाही. किंवा त्यासाठी त्यांनी आतापर्यंत रिसतर प्रस्ताव सादर केलेला नाही.
पहिल्या वीस देशातील वारसास्थळांची संख्या
इटली (५८), चीन (५६), जर्मनी (५१), फ्रन्स (४९), स्पेन (४९), भारत (४०), मेक्सिको (३५), इंग्लंड (३३), रशिया (३०), इराण (२६), जपान (२५), अमेरिका (२४), ब्राझिल (२३), आॅस्ट्रेलिया (२०), तुर्कस्थान (१९), ग्रीस (१८), पोलंड (१७), पोर्तुगाल (१७) आणि झेक प्रजासत्ताक (१६).
-ही आहे भारतातील ४० वारसास्थळांची यादी
धोलाविरा (गुजरात)
रुद्रेश्वर (रामाप्पा) मंदीर (तेलंगण)
ताजमहल (आग्रा)
खजुराहो (मध्य प्रदेश)
हम्पी (कर्नाटक)
अजंठ लेणी (महाराष्ट्र)
वेरुळ लेणी (महाराष्ट्र)
बुद्धगया (बिहार)
सूर्य मंदिर (कोणार्क, ओडिशा)
लाल किल्ला संकुल (दिल्ली)
सांची (मध्य प्रदेश)
चोळामंदिर (तामिळनाडू)
काझीरंगा वन्यजीव अभयारण्य (आसाम)
महाबलीपुरम (तामिळनाडू)
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (पश्चिम बंगाल)
हुमायूनची कबर (नवी दिल्ली)
जंतर मंतर (जयपूर, राजस्थान)
आग्रा किल्ला (उत्तरप्रदेश)
पट्टाडकल (कर्नाटक)
एलिफंटा (महाराष्ट्र)
तीन माऊंटेन रेल्वेज (सिमला, निलगिरी, दार्जिलिंग)
नालंदा महाविहार (बिहार)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (महाराष्ट्र)
कुतुबमिनार (दिल्ली)
चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान (गुजरात)
हिमालयन राष्ट्रीय उद्यान (हिमाचल प्रदेश)
गिरीदुर्ग (राजस्थान)
चर्चेस आणि कान्व्हेंटस् (गोवा)
भीमबेटका (मध्य प्रदेश)
मानस वन्यजीव अभयारण्य (आसाम)
फतेहपूर सिक्री (उत्तर प्रदेश)
राणी की बाव (पाटण, गुजरात)
केवलादेव राष्ट्रीय उद्यान (भरतपूर, राजस्थान)
नंदादेवी आणि व्हॅली आॅफ फ्लावर्स राष्टीय उद्यान (उत्तराखंड)
पश्चिम घाट
कांचनजंगा नॅशनल पार्क (सिक्कीम)
चंदीगड (राजधानी संकुल)
अहमदाबाद
व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट इन्सेम्बल (मुंबई)
जयपूर (पिंक सिटी)
Esakal