शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला. प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय,” अशी सुरुवात करत अनेकांवर बाण डागला. पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही मुद्दे…

हर्षवर्धन पाटील यांच्या विधानाचा समाचार घेत, हर्षवर्धन पाटलांसारखे लोक भाजपाचे ब्रॅन्ड ॲम्बॅसॅडर करुन टाकायला हवे. पहले मुझे नींद नही आती थी, दरवाजे पर टिक टिक हुई तो जग जाता था, फिर मैं भाजपा मे गया, अब मैं कुंभकर्ण की तरह सोता हुँ, असा टोला पाटलांना लगावला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले, मी पुन्हा येणार म्हणणारे आता म्हणतायेत मी गेलोच नाही. नाही गेलो तर मग बसा. ज्यांना आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय त्यांनी जर वचन पाळलं असते तर कदाचित तेही मुख्यमंत्री बनले असते, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
समोरून वार करा. अंगावर आलेल्यांना शिंगावर घेऊ. ईडी सीबीआयच्या माध्यमातून जर मला आवाहन द्यायचे असेल तर शिवसैनिकांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उत्तर देईन, मुख्यमंत्री म्हणून नाही.
हिंदुत्व म्हणजे काय?, असा सवाल करत मुख्यमंत्री यांनी सांगितले की, मोहनजी मी तुमच्यावर टीका करतोय, असा समज करू नका. आपण जे सांगत आहोत ती जमलेली माणसं ऐकत नसतील तर कशाला ही मेळाव्याची सोंगे? आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व.
सत्तेचं व्यसन लागले तर तुम्ही कारण नसताना दुसऱ्याची आयुष्य उध्वस्त करून टाकता. सर्व काही माझ्या अंमलाखाली असाव हे सुद्धा अंमली पदार्थाचे व्यसनच.
छापा काटा खेळ असतो तसे छापा टाकून ‘काटा’ काढण्याचा प्रकार जो सुरु आहे, हे फार काळ चालत नाही. मी आजही सांगतो, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.
हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही तर नवहिंदूंपासून. शिवसेनेवर टीका करायला तोंडात बोंडख घालुन बसले आहेत आहेत ते १९९२ च्या दंगलीत शिवसेना नसती तर आज दिसले असते का.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकमेव मर्द तेव्हा उभा होता. धमक्या मिळत होत्या. मात्र, त्यांनी म्हणाले ज्या रंगाची गोळी आम्हाला चाटून जाईल तो रंग हिंदुस्थानातून संपवून टाकू.
हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, इथे माता भगिनींचा मान सन्मान राखला जाणार. ज्याने हे केले त्याला तात्काळ अटक केली आणि त्यास फाशी दिल्यावाचुन राहणार नाही, असे मी राज्यपालांना नम्रपणे सांगितले आहे.
माहिती अधिकाराचा हवाला देत त्यांनी म्हटलं, देशातील बंदराचा ७५ टक्के निधी गुजरातला वळवला. वाचा आणि थंड बसा. संपूर्ण जगातला चरस गांजा महाराष्ट्रात मिळतो, असे चित्र उभे केले जात आहे. का करता हा नतद्रष्टपणा? आपली संस्कृती तुळशी वृंदावनाची, पण चित्र उभं केल जात आहे जस सगळीकडे चरस गांजा दारी लावतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here