प्रख्यात चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके यांनी गेल्या ५० वर्षांत साकारलेल्या महत्त्वाच्या २०० कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या कलादालनात सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमांत साकारलेल्या या कलाकृतींचे हे प्रदर्शन म्हणजे प्रमोदबाबूंच्या वैचारिक कलाजाणिवेचा यथार्थ गौरव आहे.

प्रख्यात चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके यांनी गेल्या ५० वर्षांत साकारलेल्या महत्त्वाच्या २०० कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या कलादालनात सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमांत साकारलेल्या या कलाकृतींचे हे प्रदर्शन म्हणजे प्रमोदबाबूंच्या वैचारिक कलाजाणिवेचा यथार्थ गौरव आहे.

मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या कलादालनात एका अशा चित्रकाराच्या कलाकृती आहेत, ज्यांनी अनेक वर्ष कला महाविद्यालयात प्राध्यापकी केली. के. आर. नारायणन भारताचे राष्ट्रपती असताना त्यांचे पोट्रेट साकारले. ज्यांच्या अनेक कलाकृती देश-विदेशात संग्रहित आहेत. प्रतिष्ठित संस्थांनी त्यांच्या कलाकृतींचा गौरव केला. हे सुविख्यात चित्रकार आहेत, प्रमोदबाबू रामटेके. त्यांचा १९७१ ते १९२१ या ५० वर्षांतील अर्थात सुवर्णमहोत्सवी चित्रकारितेचा प्रवास रसिकांना थक्क करणारा आहे.

धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापासून आजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक छायाचित्र अनेक शासकीय कार्यालयांत, महत्त्वाच्या मासिकांत, पुस्तकांत, विशेषांकात आणि शासकीय दस्तावेजातही प्रसिद्ध होत आहे. खरे तर ते पेंटिंग आहे आणि ते कुणी साकारले, याविषयीची उत्सुकता जाणकारांनाही आहे. काही मासिकांनी हे चित्र मुखपृष्ठ म्हणून वापरताना चित्रकाराचा यथोचित उल्लेख केला. ते बहुचर्चित पेंटिंग साकारणारे चित्रकार आहेत नागपूरचे प्रसिद्ध चित्रकार प्रमोदबाबू रामटेके. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या कलादालनात सुरू असलेल्या प्रदर्शनाचा प्रवास ‘बोधिसत्व’ या शीर्षकाने साकारलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या याच पेंटिंगने सुरू होतो. प्रमोदबाबू यांचे हे एकमेव पेंटिंग असे आहे, ज्यावर त्यांनी स्वत:ची सही केली नाही. त्या पेंटिंगवर सही करून, त्यांना चित्रावर मालकीहक्क सांगायचा नाही, यातून त्यांची सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगल्भ कलाजाणीव अधोरेखित होते.

प्रमोदबाबू यांच्या गेल्या ५० वर्षांतील चित्रकारितेच्या प्रवासाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यासाठी मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या कलादालनात आमंत्रित केले आहे. कलावंताला हे निमंत्रण मिळणे म्हणजे त्या कलावंताचा राष्ट्रीय स्तरावरील चित्रकार म्हणून सन्मान करणे होय. प्रमोदबाबू त्यांच्या चित्रकलाकृतींच्या माध्यमातून जगविख्यात आहेतच; पण अधिकृतपणे त्यांच्या चित्रांना हा राष्ट्रीयस्तराचा दर्जा मिळणे म्हणजे त्यांच्या कलाकृती आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची वाट प्रशस्त करणारे आहे.

‘बोधिसत्व’ या चित्रापासून सुरू होणारा कलाप्रदर्शनाचा प्रवास वेगवेगळ्या विषयांवरील कलाकृतींमध्ये गुंतवत जातो. कॅन्व्हॉसवर, पेपरवर, स्टोनवर ऑईल पेंटिंग, वॉटर कलर, ॲक्रेलिक, पेस्टल, इंकने रेखाटलेल्या या कलाकृती आपले विचारवाही सूत्र सांगत जातात. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करतात. रमवतात. गमवतात आणि गुंतवतातही. यातल्या बहुतांश कलाकृती अमूर्त शैलीतल्या असल्याने त्यातला आकृतीबंध, रंगावृत्ती, रेषांमध्ये अडकवतात आणि चित्रशीर्षकाच्या अनुषंगाने चित्राभ्यास करायला लावतात.

प्रमोदबाबू यांनी हे प्रदर्शन सुरू होताना मुंबईत येऊन भल्या मोठ्या कापडावर रंगरेषा ओढल्या आहेत. त्या साध्या वाटत असल्या तरी, त्या पांढऱ्या कापडावरील रंगाविष्कार खुणावतो. याच दालनात भदंत नागार्जुन आर्य सुरई ससाई यांचं व्यक्तिचित्र आपलं लक्ष वेधून घेतं.

संघर्ष सुरूच असतो माणसाचा वरचा मजला गाठण्याचा. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट कलादालनाचा दुसरा मजला असाच खुणावतो. पायऱ्या चढत असतानाच काही छोटी चित्रही आपला ताबा घेतात. डार्कशेडमधल्या अंधारात शोधल्या जातात आपल्याच मनातील भावभावना. त्या अनाहूतपणे आत्ममग्नतेचाही शोध घ्यायला भाग पाडतात. चित्र बघताना अथांग समुद्रात मासेही सापडतात. सिम्बॉल ऑफ बर्थ, द बर्थ, द कॅट, द क्वीन आणि द किंगसुद्धा आसपास दिसतात. मेडिटेशन, लेडी विथ मून, लव्ह ॲन्ड पीस, ड्रीम, क्लाऊड स्पेस, फ्लाईंग बर्ड, मदर ॲन्ड चाईल्ड अशा असंख्य शीर्षकांकित चित्रांचा प्रवास करून आपण एकएक मजला पार करत बुद्धाच्या पेंटिगजवळ येऊन थांबतो.

बोधिसत्व ते बुद्धा हा या चित्रकलाकृतींचा प्रवास आहे. त्यामध्ये असलेल्या चित्रांत माणसांच्या जागण्यासाठीचा संघर्ष आहे. आनंद, दु:ख, निस्सीम प्रेम, राग, लोभ, अनंत विकार, संस्कृती, विकृती असे बरेच काही दडले आहे. हे सारे खुल्या दिलाने प्रमोदबाबू यांनी रंग, रेषा, आकार, उकारातून रसिकांसमोर पेश केले आहे.

प्रमोदबाबू यांनी आयुष्याची पंचाहत्तरी पार केली आहे. त्यातील ५० वर्षे ते कलाजीवनात रमले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि नागपूर विद्यापीठातून कलाशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयात कलाध्यापक म्हणून ज्ञानदानाचे व्रत स्वीकारले. काही वर्षांपूर्वीच ते शासकीय चित्रकला महाविद्यालयातून पेंटिंग विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. पेंटिंग, पोट्रेट कलाप्रकारात त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची खास ओळख आहे. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत त्यांनी कलावंतांची पाठराखण केली आहे. भूमिका घेऊन कलाविष्कार करतानाच त्यांच्या शांत, संयमी आणि सुस्वभावीपणाने मोठा चाहता वर्ग कमावला आहे.

प्रमोदबाबू यांच्या चित्रांमध्ये आक्रस्ताळेपणा दिसत नाही. काही मोजके अपवाद सोडले तर भडकपणा नाही. शीतरंगांचा बहुतांश वापर त्यांच्या चित्रात आविष्कृत आहे. तीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रतिबिंबीत झालेली शैली असावी. ही शैली वळणदार आहे. काव्यात्मक आहे. त्यामुळे त्यांच्या कलाकृती आपल्याला एक कलात्मक विणकाम वाटतात. त्या कलाकृती तरल, साध्या, पण अथांग भासतात. त्यांच्या चित्रातील अवकाशही तसाच आहे. दूर घेऊन जाणारा. दूरदृष्टी देणारा. क्षितिजापलीकडे असणारे अवकाश शोधण्याची प्रेरणा देणारा.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या कलादालनात त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीतील चित्रं रसिकांसमोर पेश करणे हा त्यांच्या कला कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सवी जीवनगौरव आहे. अनेक महत्त्वाच्या संस्था, प्रतिष्ठित व्यक्ती आणि कलाप्रेमींनी प्रमोदबाबू यांची चित्र त्यांच्या दालनांत संग्रहित ठेवली आहेत. आयुष्यभरात प्रमोदबाबूंनी हजारो चित्र रेखाटली. अनेकांचे पोट्रेट काढले. त्यातही के. आर. नारायणन राष्ट्रपती असताना त्यांना समोर बसून त्यांचे पोट्रेट काढणे, हा ते त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठेवा मानतात. प्रमोदबाबूंनी वयाची पंचाहत्तरी पार केली असली तरी, त्यांचा उत्साह आजही तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

नॅशनल गॅलरीच्या कलादालनात २१ सप्टेंबरला सुरू झालेले हे प्रमोदबाबू यांच्या चित्रांचे प्रदर्शन २० नोव्हेंबरपर्यंत अर्थात तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीचे आहे. कला-सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते, चित्रकार आणि क्युरेटर म्हणून प्रसिद्ध असणारे प्रभाकर कांबळे यांनी या प्रदर्शनाचे समन्वय म्हणून काम केले आहे. केंद्र सरकारने प्रमाेदबाबू यांच्या कलाकृतींचे हे प्रदर्शन भरवून, त्यांच्या सुवर्णमहोत्सवी कारकीर्दीचा यथोचित गौरव केला आहे. एका छताखाली, एका चित्रकाराच्या ५० वर्षांत साकारलेल्या २०० कलाकृतींचे हे प्रदर्शन हा कलाप्रेमींसाठी एक यादगार सोहळा आहे.

mahendra.suke@esakal.com

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here