पक्ष्यांचे आवाज, मातीचा सुवास, पानांची संगीतमय सळसळ, झाडांच्या रंगछटा, फुला-पानांचे मोहक रंगाकार, वेलींचा लपंडाव आणि मोठ्या वृक्षांची छाया तानसा अभयारण्याला दिलेली भेट संस्मरणीय करून टाकते. निळंशार पाणी, त्यावर पडलेलं आकाशातील पांढऱ्या ढगांचं प्रतिबिंब, जलाशयाच्या कडेने थाटात उभी असलेली हिरवीगार झाडं, असं हे तानसा जलाशयाचं रूप बघताक्षणी आपण त्याच्या प्रेमात पडतो.
धरणाच्या जलाशयात मनसोक्त डुंबण्याचा आणि अभयारण्यात भटकंती करून तिथले वन्य जीवन पाहण्याचा दुहेरी अनुभव घ्यायचा असेल, तर या ठिकाणाला तोड नाही. मुंबई-ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं, केवळ वन्यजीवांचीच नाही, तर मुंबई-ठाणेकरांचीही तृष्णा भागवणारं हे एक आगळंवेगळं ठिकाण. भल्यामोठ्या पाईपलाईनच्या बाजूने मैलोन् मैल राईड करण्याची मजा, आकाशाला भिडणाऱ्या आणि गर्द झाडीतून रानवाटा तुडवत भटकण्याचा आनंद आणि नजर जाईल तिथवर पाणीच पाणी ही या जागेची वैशिष्ट्यं. असे हे तानसा जलाशय व अभयारण्य शहापूर आणि त्याच्या नजीकच्या तालुक्यांच्या परिसरात विखुरलेले आहे.
मुंबईपासून अवघ्या ९० किलोमीटर अंतरावरील या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनने शहापूर येथून जाता येते. रेल्वेने गेल्यास आटगाव रेल्वे स्थानकापासून १३ किलोमीटरवर तानसा अभयारण्य आहे. येथे पोहोचण्यासाठी शहापूर शहरापासून बसेसची सुविधा आहे. तानसा एका भेटीत पाहून पूर्ण होत नाही. अनेक भेटी देणं शक्य नसलं, तरी किमान दोनदा भेट द्यावी लागते. एक जलाशय पाहण्यासाठी आणि दुसरी अभयारण्यात भटकंती करण्यासाठी.

तानसा भेट जलाशयासाठी असली तरी हे पाणी मुंबईपर्यंत ज्या भल्यामोठ्या पाईपलाईनमधून येतं त्याला समांतर असलेल्या रस्त्यावरून आपल्याला काही किलोमीटरचा प्रवास करता येतो. भविष्यात येऊ घातलेल्या हायपरलूपसारख्या सुविधा नेमक्या कशा असतील, याची एक छोटी झलक या भल्या मोठ्या पाईपलाईनच्या माध्यमातून पाहता येते. दर वर्षी साधारणपणे जुलै महिन्यात तानसाचे नाव कानावर पडू लागते कारण याच काळात तानसा धरण तुडुंब भरून वाहू लागते आणि मुंबईकरांसाठी वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. सुरक्षेच्या कारणास्तव या धरणाला भेट देता येत नसली, तरी जलाशय मात्र पाहता येतो. समुद्रकिनारी राहणाऱ्या मुंबईकरांना पाण्याचे फारसे कौतुक नसले, तरी नजर जाईल तिथवर पसरलेलं गोडं पाणी त्यांनाही क्वचितच पाहायला मिळते.

आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे तानसा धरणक्षेत्रात प्रचंड पाऊस पडतो. हे पावसाचे पाणी फक्त एकाच ठिकाणी साचून न राहता त्याला अनेक फाटे फुटतात, म्हणून तानसामध्ये फिरताना अनेक लहान-मोठे ओढे वाहताना दिसतात. पावसाळ्यात या ओढ्यांमध्ये डुंबायला धमाल येते. तानसा अभयारण्यासोबतच जलाशयाच्या क्षेत्रामध्येही विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. त्यामध्ये पाणकावळा, जांभळी पाणकोंबडी, लाजरी पाणकोंबडी, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा आणि राखी बगळा इ. स्थानिक पक्षी आणि स्थलांतरित पक्ष्यांचे थवेही विहार करताना नजरेस पडतात. निळंशार पाणी, त्यावर पडलेलं आकाशातील पांढऱ्या ढगांचं प्रतिबिंब, जलाशयाच्या कडेने थाटात उभी असलेली हिरवीगार झाडं, असं हे तानसा जलाशयाचं रूप बघताक्षणी आपण त्याच्या प्रेमात पडतो.

मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने तानसा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात विविध पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक आढळतात. इथे दिसणारी जैवविविधता फार अभावाने इतर कोणत्याही प्रदेशात पाहायला मिळते. म्हणून अभयारण्याची सहल एखाद्या मार्गदर्शकाच्या साथीने करायला हवी. खरंतर मार्गदर्शक सोबत नसतानाही विविध पक्षी सहज दिसून जातात. या पक्ष्यांच्या सवयी, आवाज, शिकारीच्या पद्धती, घरटी जवळून पाहायच्या असतील, तर चांगला कॅमेरा आणि दुर्बिण सोबत न्यायला विसरू नका. पक्ष्यांचे आवाज, मातीचा सुवास, पानांची संगीतमय सळसळ, झाडांच्या रंगछटा, फुला-पानांचे मोहक आकार व रंग, वेलींचा लपंडाव आणि मोठ्या वृक्षांची छाया अभयारण्याची भेट संस्मरणीय करून टाकते. अभयारण्यामध्ये विविध प्रकारची झाडं आणि औषधी वनस्पती तर आहेतच; पण काही ठराविक अभयारण्यांमध्येच पाहायला मिळणारी बांबूंची बेटंही आहेत.

हे अरण्य साहसाची आवड असणाऱ्या आणि रानोमाळ भटकंती करणाऱ्या ट्रेकर्सनाही साद घालत असतं. जलाशय आणि अभयारण्याबरोबर माहुली किल्ल्यावर नेणाऱ्या वाटाही याच जंगलातून जातात. माहुली किल्ला, प्राचीन शिवमंदिर, त्याच्या मागच्या बाजूने असलेला सूर्यमाळेचा प्रदेश ट्रेकर्सना खुणावत असतो. इथल्या रानवाटा अजून फारशा गर्दीने रुळलेल्या नाहीत. कदाचित म्हणूनच तिथलं वैभव टिकून आहे. निसर्गाची एक अनोखी किमया असलेला हा प्रदेश विविध रूपातून तुमच्यासमोर येत राहतो. मुंबईच्या कोलाहलातून बाहेर पडून मन शांत करायचं असेल, तर तानसाला भेट देणे अत्यावश्यक आहे.
Esakal