पुणे : प्रवेशपत्रातील गोंधळ, अस्तित्वात नसलेले परीक्षा केंद्र आणि प्रचंड गलथान कारभारामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मोठ्या नामुष्कीने महिनाभरापूर्वीच आरोग्यसेवेची लेखी परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. आज महिनाभरानंतरही नव्या तारखेला पुन्हा एकदा तोच गोंधळ झाला असून, उमेदवारांनी आता राज्य सरकारच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे. तर दुसरीकडे निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासन बौद्धिक दिवाळखोरी निघाल्याची घोषणाच करावी, अशी कडाडून टीका केली आहे.
रविवारी (ता.२४) आरोग्य सेवेच्या गट ‘क’ची लेखी परीक्षा आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांना शुक्रवारपासून प्राप्त झाले. त्यात बहुतेकांना दोन वेगवेगळ्या केंद्राचे प्रवेशपत्र, तर काहींना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. अहमदनगरचा श्रीकांत सांगतो,‘‘मी राहतो नगर जिल्ह्यात आणि केंद्र आलेय सातारा आणि सांगलीत. मी माझ्या जिल्ह्याला पहिले प्राधान्य दिले असताना परीक्षा केंद्र इतके लांब कसे आले.’’ तर माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी ट्वीटरवर परखड मत व्यक्त करत म्हटले,‘‘हे जर खरे असेल तर प्रशासनाने बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करावी.’’ राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रासंबंधी अनेक अडचणी असून, विद्यार्थी चळवळी आता सरकारच्या भरतीबद्दलचतच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित करत आहे.

उमेदवारांच्या अडचणी
-
वेगवेगळे केंद्र असलेले दोन प्रवेशपत्र मिळाले
-
प्राधान्यक्रमाबाहेरील जिल्ह्यात दिले परीक्षा केंद्र
-
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा
-
प्रत्येक पदासाठी आणि जिल्ह्यासाठी वेगळे शुल्क घेतले असताना परीक्षा एकच
-
अनेकांच्या प्रवेशपत्रात परीक्षा केंद्र आणि पिनकोड भिन्न
गडचिरोलीच्या विद्यार्थ्याने नागपुर केंद्र टाकले होते. परंतु त्याला पुण्याचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. परीक्षा केंद्र साताऱ्याचे आणि पिनकोड नागपूरचा आला आहे. अशा प्रकारे पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे, खाजगी कंपन्यांना परीक्षा नीट घेता येणारच नसतील तर त्यांच्याकडे देण्याचा अट्टाहास का. चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे किती नुकसान होत आहे. एमपीएससी मार्फत परीक्षा का घेतली जात नाही हे समजत नाही.
– कमलाकर शेटे, उपाध्यक्ष, युक्रांद पुणे शहर
आरोग्यसेवक भरतीत पुन्हा एकदा परीक्षा केंद्राचा तोच घोळ पाहायला मिळाला आहे. मी परीक्षाकेंद्रासाठी औरंगाबाद जिल्हा दिला होता. मला मिळाला सोलापूर जिल्हा.
– विश्वामित्र घाडगे, उमेदवार
Esakal