कोगनोळी : कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील हालसिद्धनाथ देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. या ठिकाणी फक्त धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हॉटेल, खेळणी, पाळणे, नारळ, साखर, कापूर, भेळ यासह अन्य दुकाने लावण्यासाठी परवानगी नाही. मंदिरामध्ये फक्त मानकरी व पुजाऱय़ांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रम पार पाडावेत, अशी सूचना निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी दिली.

आप्पाचीवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात यात्रेनिमित्त शनिवारी (ता. १६) बोलावण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. सचिव संजय खोत यांनी स्वागत केले. आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवास कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू या राज्यातून लाखो भाविक येत असतात. चालू वर्षीची हालसिद्धनाथांची यात्रा गुरुवार (ता. 21) ते सोमवार (ता. 25) अखेर आहे. यात्राकाळात मंदिरामध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम व विधी विधान करण्यात येणार आहे. यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असेही उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी सांगितले.
यावेळी मानकरी, पुजारी, गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Esakal