
बाबर म्हणाले, ‘कात्रज उपनगरातून सर्वात जास्त कर मनपाला मिळतो. मात्र सत्ताधारी भाजपाने विरोधी नगरसेवकांना निधी देताना दुजाभाव केला. कर आमचा आणि विकास विशिष्ट भागाचा, असे चालू देणार नाही. २५ वर्षांपूर्वी मनपात समाविष्ठ झालेल्या कात्रजला बिडीपी आरक्षण आले. त्यामुळे जमिनी असलेल्या भूमीपुत्रांवर अन्याय झाला. पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी, महापालिका हॉस्पिटल, ई-लर्निंग स्कुल, खेळाची मैदाने आदी विकास कामांपासून कात्रजला जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले आहे’.
नव्याने समाविष्ठ २३ गावांपैकी सहा गावे आमच्या दक्षिण पुण्यातील आहेत. त्या ठिकाणी पीएमआरडीएने केलेल्या विकास आराखड्यात अन्यायकारक आरक्षणे टाकण्यात आली. त्यावर घेतलेल्या हरकती सूचनांचा गांभीर्याने पुनर्विचार केला जावा. तसेच या गावांच्या मूलभूत सुविधा व विकास कामे यासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशा विविध मागण्याही सर्वानुमते यावेळी करण्यात आल्या.
कात्रज : पुणे शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रजला कायम दुय्यम वागणूक मिळत आहे. दोन खासदार व तीन आमदार निवडून देणाऱ्या कात्रजला वोटबँक म्हणून बघितले जाते. हे कुठं तरी थांबले पाहिजे. परिसरातील समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. त्यामुळे जर कात्रजच्या विकासाला चालना मिळाली नाही. आणि एका महिन्यात मुख्य समस्यांबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही. तर, पुढील काही दिवसांत पक्षापासून अलिप्त होण्याची वेगळा पर्याय निवडावा लागू शकतो असा अल्टीमेट राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांनी दिला.
कात्रज चौक येथे स्व. सुदामराव बाबर प्रतिष्ठाण व स्व.अजितदादा बाबर प्रतिष्ठाण वतीने नमेश बाबर यांच्या नेतृत्वाखाली माझं कात्रज माझा अभिमान अंतर्गत कात्रज, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी,आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी-कोळेवाडी गावाच्या माजी सरपंच-उपसरपंच, सदस्य आणि नागरिकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी बाबर बोलत होते. यावेळी नगरसेविका अमृता बाबर, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, विलास मांगडे, सुभाष मांगडे, राजू काशीद, विक्रम भिलारे, दीपक गुजर, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Esakal