पुणे : भारतीय हवाईदलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स आणि सारंग हेलिकॉप्टरच्या पथकांनी अवकाशात साकारलेल्या तेजस, सुखोईच्या चित्तथरारक प्रतिकृती… आठ हजार फूट उंचीवरून पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारणारे हवाई दलाचे जवान….अन् त्यांना उपस्थितीत प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात मिळणारी दाद अशा देशभक्तीमय वातावरणात हवाई दलाच्या नेत्रदीपक ‘एअर शो’ सादरीकरण शनिवारी पुण्यात पार पडले.

भारत-पाकिस्तान मधील १९७१ च्या युद्धात भारताने मिळविलेल्या विजयाच्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ देशात स्वर्णिम विजय वर्ष साजरा होत आहे. याचाच एक भाग म्हणून लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे भारतीय हवाईदला मार्फत शनिवारी ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी एअर चीफ मार्शल (निवृत्त) पी व्ही नाईक, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन, इतर अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंब तसेच, १९७१ च्या युद्धात सहभाग घेतलेले निवृत्त अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नऊ ‘हॉक एमके १५२’ विमानाच्या माध्यमातून सूर्यकिरण पथक आणि स्वदेशी बनावटीच्या एएलएच-ध्रुव या हेलिकॉप्टरमध्ये सारंग पथकाने हवाई प्रात्यक्षिके सादर करत हवाई दलाची ताकद सिद्ध केली. हवाई तळावरील मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे भारतीय हवाईदलाच्या वतीने एअर फोर्स स्टेशनच्या ‘पॅरेलल टॅक्सी ट्रॅक’चा वापर करत ही प्रात्यक्षिके सादर केली.
सूर्यकिरण पथकाचे नेतृत्व करणारे स्क्वॉड्रन लीडर माणिक भल्ला म्हणाले, ‘‘हवाई प्रात्यक्षिके सादर करण्यापूर्वी आम्ही सहा महिन्यांचा सराव केला. त्यानंतर पुढील सहा महिने देशातील विविध ठिकाणी हवाई प्रात्यक्षिके करत आहोत. तर नवीन वैमानिकांना अशा प्रकारच्या प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी साधारणपणे १०० ते २०० तासांचे हवाई सराव करावे लागते. यात मानसिक आणि शारिरिक तयारी अत्यंत गरजेची असते. ‘एअर शो’ला यशस्वी करण्यासाठी केवळ वैमानिकच नाही तर जमिनीवरील पथकाची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची ठरते.’’
‘‘सूर्यकिरण पथकातील प्रत्येक वैमानिक हा लढाऊ वैमानिक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कवायती सादर करण्यासाठी ते नेहमी तयार असतात. प्रत्येक ‘एअर शो’मध्ये प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी सूर्यकिरण पथकाचे नऊ विमान नेहमी सज्ज असतात.’’ असे फ्लाइट लेफ्टनंट रिद्धीमा गुरुंग म्हटल्या.

Esakal

19 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here