पिंपरी : जे राज्य सरकार केंद्र सरकारच्या विचाराचे नाही. जिथे भाजपची सत्ता नाही, त्या सरकारला केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून अस्थिर करायचा प्रकार सुरु आहे. तीच स्थिती सध्या राज्यात आहे. सीबीआय, इडी, इन्कम टॅक्स या तपास यंत्रणांचा पदोपदी गैरवापर होत आहे. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या मंत्री, नेत्यांवर टाकले जात असलेले सर्व छापे, कारवाया राजकीय आकसातून केल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत शनिवारी केला. तसेच कितीही छापे टाकले तरी फरक पडणार नाही. हे सरकार यत्किंचितही हलणार नाही, पाच वर्षांचा कालखंड पूर्ण करेल. आपल्या कामाने व जनतेच्या विश्वासावर पुढच्या टर्ममध्येही सत्तेत येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पवार म्हणाले, ‘‘अनेक वर्षे राज्यात, केंद्रात प्रतिनिधित्व केले. वेगवेगळी सरकारे पाहिली. मात्र, यामध्ये राज्य सरकारबाबत केंद्राचा दृष्टिकोन हा सहानुभूतिपूर्वक असायचा. मात्र, आताचे भाजपचे सरकार राज्यातील सरकारवर काही ना काही कारणांवरून दोषारोप करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने करीत आहेत. तपास यंत्रणांचा पदोपदी गैरवापर केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या तरी केंद्र सरकारने किमती कमी केल्या नाहीत. यावरून पेट्रोल हे उत्पन्न वाढविण्याचे साधन बनविल्याचा दृष्टिकोन ठेवल्याचे दिसून येतेय. आम्ही सत्तेत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किमती वाढल्याने देशात किमती वाढवाव्या लागल्या होत्या. मात्र, त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपने दहा दिवस संसदेचे कामकाज बंद पाडण्याची भूमिका घेतली होती. आणि आज तोच पक्ष सत्तेत असताना दरदिवशी पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवत आहे.’’

कोळशा संदर्भातील तीन हजार कोटींची थकबाकी महाराष्ट्राकडे असल्याने केंद्र सरकारला अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे भाजपचे मंत्री सांगतात. यामधील चौदाशे कोटी देण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यानी केलेली आहे. मात्र, दुसरीकडे केंद्राकडून राज्याला जीएसटीचे ३५ हजार कोटींचे येणं असताना ते देत नाही. असे असतानाही महाराष्ट्राकडेच बोट दाखविणे योग्य नाही.
पत्रकार परिषदेवेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर आझम पानसरे आदी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी गायब होणे गंभीर बाब
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांनी तत्कालीन गृहमंत्र्यांवर काही आरोप केले. ही तक्रार मुख्यमंत्री व माझ्याकडे आली. यावरून अनिल देशमुख यांना सत्तेपासून दूर होण्यास सांगितले. त्यांनी राजीनामाही दिला. त्यानंतर पोलिस आयुक्तांविरोधात लागोपाठ तक्रारी आल्या, खटले दाखल झाले. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी केलेल्या तक्रारीवरून देशमुखांनी एका दिवसात राजीनामा दिला असताना पोलिस आयुक्त मात्र त्या दिवसापासून कुठे गायब झाले याचा पत्ता नाही. देशात आहेत की बाहेर आहे हे काहीही स्पष्ट नाही. केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे. मात्र, त्यांच्याकडे सर्व यंत्रणा असताना पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी गायब होणे गंभीर बाब आहे.
गुन्हेगारीत गुंतलेले लोक होताहेत पंच
केंद्र सरकार विरोधात काही मत मांडत असल्याने अमली पदार्थ प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नंतर या प्रकरणातील पंच गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ती व्यक्ती गायब आहे. गुन्हेगारीत गुंतलेल्या लोकांना पंच म्हणून घ्यायचे व चांगल्या लोकांना अडकविणायचे प्रकार सुरु असल्याचे दिसून येत असल्याची टीकाही पवार यांनी केली.
यामध्ये पाहुण्यांचा दोष नव्हता
माझ्या कुटुंबातील म्हणजेच अजित पवारांच्या तीन भगिनी यांच्याकडे इन्कम टॅक्सने छापे टाकले. यामध्ये काही निष्पन्न होईल असे दिसत नाही. छापा मारतात. मात्र, हा छापा एक, दोन दिवस नव्हे तर तब्बल पाच दिवस सुरु होता. एक ते दीड दिवसातच येथे काहीही नाही हे कळल्यानंतरही हे लोक तेथेच होते. तेथे थांबण्याबाबत त्यांना फोन यायचे. शेवटी यंत्रणेचे अधिकारीही कंटाळले. या पद्धतीने पाच दिवस छापा टाकून दबाव आणणे योग्य नाही. एक दोन दिवसांचा पाहुणचार ठीक आहे. मात्र, जास्त दिवस थांबल्यावर पाहुण्यांचीही हकालपट्टी करण्याची वेळ येते. मात्र, यामध्ये पाहुण्यांचा दोष नव्हता. त्यांना वरून फोन येत होते. त्यामुळे ते पाच दिवस तेथे बसून होते.
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा हात मी सक्तीने वर केला -पवार
भाजपचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, काहीही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. यावर बोलताना पवार म्हणाले, आघाडी सरकार झाले त्यामध्ये माझा किंचित हात होता. सर्व आमदारांची बैठक घेतली. त्यामध्ये नेतृत्व कोणी करायचे याबाबत काही नावे आमच्याकडे आली होती. त्यामध्ये उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते. त्यांच्या हात मी वर उचलला. व हेच होतील असे जाहीर केले. मात्र, त्यांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती. त्यांना मी सक्तीने हात वर करायला लावला. त्यांचे वडील व मी सहकारी होतो. उध्वव यांना लहानापासून ओळखायचो. ज्यावेळी सरकार बनविण्याची वेळ आली . त्यावेळी आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी द्यावी, असा माझा आग्रह होता. त्यामळे फडणवीस यांनी असा आरोप करणे चुकीचे आहे.
महाविकास आघाडीचा निर्णय त्यांच्या कानात सांगेल
आगामी निवडणुकीबाबत महाविकास आघाडी एकत्र येईल की नाही याचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत व अजित पवार हे स्थानिक परिस्थिती पाहून घेतील. शिवसेना, काँग्रेस यांच्याशी चर्चा करतील. त्यांनी ठरवावे, त्यांनी मला विचारल्यावर मी त्यांच्या कानात सांगेन. मात्र, मिडियाला सांगणार नाही अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
Esakal