

फार पूर्वी लुओ लोकांमध्ये एक प्रथा होती, ज्यात विधवांना त्यांच्या पतीच्या मृतदेहाला दफन करण्यापूर्वी त्याच्यासोबत एकाच खोलीत झोपवलं जाई. यावेळी विधवा स्त्रियांनी एक स्वप्न पाहावे, ज्यात ती तिच्या मृत पतीवर प्रेम करत आहे अशी अपेक्षा केली जाई. त्यांचा असा विश्वास आहे की, असे स्वप्न पाहिल्यामुळे एक विधवा बंधनातून मुक्त होते आणि पुन्हा लग्न करण्यास ती तयार होते. स्त्रियांच्या शुद्धीकरणासाठी ही प्रथा आवश्यक मानली जाते.



लुओ जमातीच्या एका प्रथेनुसार येथील मुली त्यांच्या मोठ्या बहिणीच्या आधी लग्न करू शकत नाहीत. जे त्यांच्या मोठ्या बहिणीच्या आधी लग्न करतात किंवा शारिरीक संबंध करतात, त्यांना समाजातून बहिष्कृत केले जाते. ज्या स्त्रिया वर शोधण्यात जास्त वेळ घालवतात, त्यांचे जबरदस्तीने लग्न केले जाते. जेणेकरून त्यांच्या लहान भावंडांचे लग्न होऊ शकेल. मोठ्या बहिणीचं आधी लग्न केल्याने त्यांचे कुटुंबातील आणि गावातील प्रतिष्ठा वाढते. या प्रथेचा एक नकारात्मक पैलू म्हणजे लग्नासाठी तयार नसतानाही तिला लहान भावंडांसाठी जबरदस्तीने लग्न करावे लागते. जर लहान बहिणीने तिच्या मोठ्या बहिणीच्या आधी लग्न केले तर वधूचा हुंडा तिच्या वडिलांना दिला जात नाही. त्याऐवजी वर वधूच्या काकांना हुंडा देतो. त्याचप्रमाणे जर लहान भावानं त्याच्या मोठ्या भावाच्या आधी लग्न केले, तर मोठा भाऊ लहान भावाच्या पत्नीने बनवलेले अन्न कधीच खात नाही. याशिवाय दोन्ही भाऊ एकत्र बसूनही अन्न खाऊ शकत नाहीत.

लुओ जमातीमध्ये आत्महत्या हा गंभीर अपराध असून यासाठी कडक शिक्षा दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीने लटकून आत्महत्या केली असेल तर त्याचा मृतदेह खाली उतरवून त्याला फटके दिले जातात.

लुओ जमातीच्या महिलांचा खतना करणे अनिवार्य आहे. ज्या महिला यास नकार देतात त्यांना शाप लागतो, असं म्हणतात. पुरुष अशा महिलांपासून दूर राहतात. खतना न करता लग्न केल्यास त्या महिलेला शेतांपासून दूर राखलं जातं. ती जर शेतात गेली तर सगळी पिके करपून जातील, असं मानलं जातं.
Esakal