दीपाली सुसर
स्मिता पाटील मृत्यूच्या 35 वर्षांनंतरही आम्हा तरुण महिलांना आपलीशी वाटते. कारण, कौटुंबिक आणि सामाजिक दडपणाला बळी न पडता तिनं स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध केलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ते पैसे गरजूंना वाटणं असो, की झोपडपट्टीतील महिलांचं आयुष्य दाखवताना उघड्यावर अंघोळ करणं असो, की आपल्या प्रेमासाठी कुटुंब आणि समाज यांच्याविरोधात दंड थोपटणं असो, मुक्त स्वभावाची ही स्मिता म्हणजे बंडखोर महिलांच्या मनाचं प्रतीकच.
हेही वाचा: ‘आता कसा बोलला’!, अखेर विकी कौशलनं दिली गोड बातमी
आज स्मिताचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं तिचा वैयक्तिक, कौटुंबिक, अभिनय क्षेत्रातील आणि सामाजिक प्रवास कसा राहिला, ते जाणून घेऊया.जिच्या डोळयात विलक्षण जादू होती, जिची वाणी मधुर होती, थोडी लाजरीबोजरी अन् नैसर्गिक स्वरूपाची अभिनेत्री असा भास जिच्या फोटोकडे पाहून आजही होतो, ती म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील.
स्मिताचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला. तिचे वडिल राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री झाल्यामुळे त्यांना मुंबईला यावं लागलं. वडील मंत्री आणि आई सामाजिक कार्यकर्त्या. पण या गोष्टीचा स्मिताला कधीच अहंकार नव्हता. तिचं बालपण पुण्यात गेलं आणि तरुणपणाच्या उंबरठ्यावर ती मुंबईला आली. ‘कुछ अलग करने का’ हे तिनं शाळेत असतानाच ठरवलं होतं आणि मग ती हळूहळू शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ लागली. नाटकात सहभाग घेऊ लागली. त्यामुळे संवाद कौशल्यावर तिची कमांड आली. त्याच्याच जोरावर ती पुढे 1970 साली वयाच्या सोळाव्या वर्षीच वृत्तनिवेदिका म्हणून दुरदर्शनवर झळकू लागली.

Smita Patil
तेव्हा ती घरुन जातांना जीन्स घालून जायची, अन् स्टुडिओत गेल्यानंतर त्या जिन्सवर साडी घालून वृत्तनिवेदन करायची. हा जो जिन्स आणि साडीचा मेळ तिला त्या काळातसुद्धा जमला. म्हणून ती आजही तरुणींना आपलीशी वाटते. ‘सामना’ या चित्रपटात 1974 साली स्मितानं एक छोटी भूमिका साकारली होती. पुढे मग ‘चरणदास चोर’ हा चित्रपट तिनं केला. यानंतर अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ सौंदर्याची व्याख्या असणाऱ्या स्मिताचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. ती तिच्या चित्रपटातून कष्ट करणारी, परिस्थितीसोबत संघर्ष करण्याची उमेद देणारी पात्रं साकारू लागली.
पुढे तिनं वयाच्या 21व्या वर्षी हंसा वाडकर यांच्या आयुष्यावर ‘भूमिका’ हा सिमेना केला. त्यातील स्मितानं केलेलं ‘हंसा’ हे पात्र लोकांना खूप भावलं. याच सिनेमाला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. तेव्हा स्मिता खूप खूश होती. पण तिने पुरस्कारात मिळालेली रक्कम तिच्या बहिण्याच्या माध्यमातून गरजू लोकांना वाटून दिली. कारण काय तर मला मिळालेल्या पुरस्कारांचा पैसा हा जनतेचा आहे. तो गरजूंना वाटल्यास मला अधिक समाधान मिळेल, असं तिचं म्हणणं होतं.
हेही वाचा: ‘डिट्टो दीपिकासारखीच हवी मुलगी’, रणवीरचं ‘फॅमिली प्लॅनिंग’
कालांतरानं ती झपाट्याने सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका करू लागली. तिने 10 वर्षांत तब्बल 70 सिनेमे केले. पुढे जब्बार पटेलांचा ‘जैत रे जैत’हा चित्रपट आला. या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान स्मिताला पोटाचा प्रचंड त्रास होता. डॉक्टरांनी तिला आरामाची गरज आहे, असं सांगितल होतं. पण मी जर चित्रपटाला नकार दिला, तर निर्मात्याचं नुकसान होईल आणि ते तसं झालेलं मला अजिबात आवडणार नाही, अशी भूमिका तिनं घेतली. थोडक्यात काय तर तिनं आजारपणाला न जुमानता मोठया ताकदीनं चिंधीची भूमिका साकारली. या सिनेमाचं चित्रीकरण करण्यासाठी तिला रोज डोंगर चढावा लागायचा. तेव्हा स्मिता पोटाला घट्ट पट्टा बांधून चढायची आणि शूटिंग करायची.
आजही जर ‘ठाकरं, ठाकरं,’ अशी शब्द कानावर पडला, तर डोळयांसमोर स्मिता उभी राहते, ही तिच्या अभिनयाची ताकद आहे. पुढे ती वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांत काम करू लागली. केतन मेहतांच्या ‘आक्रोश’ या सिनेमाच्यावेळी पैशांची चणचण होती. तेव्हा स्मिता म्हणाली की, मी काही फक्त पैशांकरता चित्रपट करत नाही. चित्रपट चांगला करायचा आहे ना. मी करेल काम. अशा भूमिकांतून अभिनयाप्रतीचा तिचा प्रामाणिकभाव दिसून येतो.

Smita-Patil
आता तिचा प्रगतीचा आलेख वाढू लागला होता.1981 मध्ये ‘चक्र’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार स्मिताला भेटला. त्या सिनेमात झोपडपट्टीचं विदारक वास्तव दाखवलं होतं. या चित्रपटात ती उघडयावर अंघोळ करते. तिच्या त्या काळातील अशा विद्रोही भूमिकांमुळे आजही ती मुलींना आपली वाटते. तिच्या अभिनयात स्त्रीवाद ठासून भरलेला असायचा. तिला रडणाऱ्या नाही, तर लढणाऱ्या महिला अधिक आवडायच्या.
पुढे तिच्या लग्नाचा मुद्दा देखिल चांगलाच गाजला ती राज बब्बर यांच्या प्रेमात होती. राज बब्बर विवाहित होते. त्यांनी स्मिता करता स्वत:ची पत्नी आणि कुटुंब सोडलं. समाजातून आणि घरातून प्रचंड विरोध होत होता त्यांच्या प्रेमाला. पण त्यांनी त्या रोषाला सामोरे जाऊन लग्न केलं. त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरु झालं. पण स्मिताच्या आयुष्याला कुणाची तर नजर लागली अन् तिला आजारपण सुरू झालं. 28 नोव्हेंबर 1986 तिला मुलगा झाला. त्याचं नाव प्रतिक आणि काही दिवसात म्हणजे 13 डिसेंबरला स्मितानं शेवटचा श्वास घेतला.
मृत्यूच्या वेळी ती फक्त 31 वर्षांची होती. तिनं तिची शेवटची इच्छा आधीच सांगून ठेवली होती. माझ्या मृत्यूनंतर माझ्या देहाचा सुवासिनीप्रमाणे मेक-अप करुन मगच मला अग्नी द्या. मृत्यूनंतर तिची ही अंतिम इच्छा पूर्ण करण्यात आली. मृत्यूनंतर पुढच्या काळात तिचे 14 चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपट आणि बंडखोर अभिनयामुळे आजही ती तरुणींच्या मनात घर करून आहे.
Esakal