नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात (hindavi swarajya) किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. महाराजांचे किल्ल्यांवर जीवापाड प्रेम होते. किल्ल्यांमुळे मराठ्यांच्या मुलुखांचे साम्राज्य (Maratha Empire) टिकून होते. सागरी आरमारांना सुरक्षा देण्याचे कामही किल्ले करायचे. पनवेल, उरणपासून वसईपर्यंतच्या आरमारांवर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे काम बेलापूरच्या किल्ल्यातून (Belapur Fort) होत असे. आज तोच किल्ला दुर्लक्ष होत असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आला (Fort in bad condition) आहे. सुवर्णमयी इतिहासातील अनेक चांगले-वाईट दिवस पाहिलेला आणि पेशवेकाळातही नवी मुंबईचे महत्त्व अधोरेखित करणारा हा साक्षीदार आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
हेही वाचा: नवी मुंबई : तळोज्यात सात जणांच्या दरोडेखोर टोळीला अटक
खऱ्या अर्थाने त्याला आता नवी उजाळी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
इतिहास संशोधकांच्या मते १५७० च्या दशकात भुईकोट प्रकारातील हा किल्ला एका टेकडीवर तयार करण्यात आला. जंजिरा किल्ला तयार करणाऱ्या सिद्दी जोहर याने हा किल्ला बांधल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रजांची अशा विविध साम्राज्यांची सत्ता या किल्ल्याने पाहिली आहे. १५७० च्या काळात पोर्तुगिजांकडून हा प्रदेश जेव्हा सिद्दीने ताब्यात घेतला, तेव्हा पनवेलच्या बंदरावर येणाऱ्या मालवाहू जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी नवी मुंबईच्या खाडीकिनारी या टेकडीवर किल्ल्याची टेहाळणीकरता निर्मिती केली. त्यानंतरच्या काळात पोर्तुगिजांनी पुन्हा बेलापूर किल्ला सिद्दीकडून ताब्यात घेतला. त्या काळातील परिसराला शाबाज बोलले जायचे. पुढे याच शब्दावरून शहाबाज नावाचे गाव तयार झाले.

बेलापूर किल्ला
१७३३ मध्ये कोकणाच्या स्वारीवर आलेल्या पेशवे साम्राजाचे चिमाजी आप्पा वसईला जाताना बेलापूरचा किल्ला लढवला. पोर्तुगिजांकडून चिमाजी यांनी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात दाखल केला. त्या वेळेस किल्ला जिंकल्यास जवळच्या अमृतेश्वर मंदिरात बेलाच्या पानांचा हार घालेन, असा पन चिमाजी आप्पा यांच्या सैन्याने केला होता. त्यानुसार तेव्हाच या किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण करण्यात आले. १८१७ पर्यंत या किल्ल्यांवर मराठ्यांचे राज्य होते. नंतरच्या काळात भारतात आलेल्या इंग्रजांची नजर या किल्ल्यावर पडली. इंग्रज काळातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने हा किल्ला मराठ्यांकडून ताब्यात घेतला.
हिंदवी स्वराज्याचे शिलेदार असणारे हे किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त करण्याचा फतवा काढला होता. या फतव्यात बेलापूरच्या किल्ल्याचेही नाव होते. इंग्रजांनी या किल्ल्याची प्रचंड प्रमाणात नासधूस केली. किल्ल्यावरच्या तोफा, बुरूज, तटबंदी यांची तोडफोड केली. तोफा निकामी केल्या. आता किल्ल्यावर फार जुने अवशेष फक्त नावापुरतेच उरले आहेत. पनवेल, उरण, नवी मुंबई पसिरातील इतिहास तज्ज्ञ आणि काही किल्लेप्रेमी संवर्धनासाठी जात असतात. पण, नंतर या ठिकाणी आलेल्या सिडको, महापालिका आणि इतर प्राधिकरणांनीही दुर्लक्ष केल्याने किल्ल्यावर अलीकडच्या काळातील अवशेषही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत.
हेही वाचा: ‘डिट्टो दीपिकासारखीच हवी मुलगी’, रणवीरचं ‘फॅमिली प्लॅनिंग’
उरले फक्त अवशेष
बेलापूर किल्ल्यावर आताही एक मुख्य बुरूज मोठ्या दिमाखात उभा आहे. किल्ल्यावर एक विहीर आहे. विहिरीत कोरलेले एक शिलालेख आहे. किल्ल्याच्या परिसरात देवीचे छोटेसे देऊळ आले. देवळाशेजारी दोन पोर्तुगीजकालीन विहीर आणि एक छोटेसे सुकलेले तळे आहे. मंदिराशेजारी तटबंदीचे काही भग्न अवशेष पाहायला मिळतात. या किल्ल्यावर सैनिकांची घरे, पाण्याचा हौद, कार्यालय, तटबंदी, तोफांच्या खोचा आदी अवशेष आता नष्ट झाले आहेत.
वादावादीत बुरूज ढासळला
बेलापूर किल्ल्यावर जाण्याआधी वेशीवर पोर्जुगिजांनी एक बुरूज बांधला होता. हा बुरूज सध्या किल्ले गावठाण नावाने प्रसिद्ध आहे. या बुरुजाला संवर्धन करण्याचे काम सिडकोने एका खासगी कंत्राटदाराला दिले होते; परंतु त्याच्या कामाच्या दर्जावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्याने ते काम बंद ठेवावे लागले. या दरम्यान बुरुजाचे बांधकाम उघडे राहिल्याने ऊन-वाऱ्याचा मारा सोसून अखेर उरलेले अवशेषही कोसळले. आता आक्षेप घेणाऱ्या संघटना, सिडको आणि कंत्राटदार सर्वांनीच तोंडावर हात ठेवले आहे.
Esakal