सौदर्यांचे चाहते तर सर्वच जण असतात. पण जगातील सर्वात सुंदर कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपं आहे “निसर्ग”. निसर्गासारखं सुंदर कुणीच नाही. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासारखं स्वर्गीय सुख नाही. जेव्हा जेव्हा सुंदर ठिकाणांचा उल्लेख येतो, तेव्हा बरेच लोक परदेशांचा विचार करतात, पण भारतात सुद्धा अनेक सुंदर आणि मोहक ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी प्रत्येकाने एकादातरी जायलाच हवं… आज जाणून घेऊया, मनाला लुभावणाऱ्या भारतातील दहा सुंदर ठिकाणांबद्दल….

यमथांग व्हॅली, सिक्कीम-
सिक्कीम हे अतिशय सुंदर राज्य आहे, पण येथील यमथांग व्हॅलीची गोष्टच निराळी. या ठिकाणाला ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ असेही म्हणतात. यमथांग व्हॅली समुद्रसपाटीपासून ३५६४ मीटर उंचीवर आहे. देश -विदेशातील अनेक पर्यटक येथे भेट देतात. येथे सुंदर तलावदेखील आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करतात.

टी गार्डन हिल, मुन्नार-
सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी केरळ प्रसिद्ध आहे. मुन्नार हे केरळमधील अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. केरळच्या मुन्नारमधील टी गार्डन पाहण्यासारखे आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ७००० फूट उंचीवर आहे. येथे हिरवळ आणि नैसर्गिक परिसराची सुंदर दृश्ये लोकांच्या मनाला मोहित करतात.

स्टॉक रेंज, लडाख-
जर तुम्हाला सुंदर पर्वतांच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडत असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. येथे तपकिरी आणि बर्फाच्छादित पर्वत आजूबाजूला दिसतात. गिर्यारोहण आणि कॅम्पिंग सारख्या अनेक साहसी गोष्टी येथे करता येऊ शकतात.

नोहकालिकाई धबधबा, मेघालय-
नोहकालिकाई धबधबा देशातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा जितका सुंदर आहे, त्याची कथाही तितकीच रोचक आहे. असे म्हणतात की, एकदा एका स्थानिक खासी मुलीने एका खडकावरून उडी मारली. त्या मुलीचे नाव लिकाई होते. नोहकालिकाई धबधब्याचे नाव तिच्या नावावरून पडले आले.

नंदा देवी, उत्तराखंड-
उत्तराखंडमध्ये स्थित नंदा देवी एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. नंदा देवी हे भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. त्याच्या टेकड्यांचा वरचा भाग बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेला आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल, तर आयुष्यात एकदा या स्थळाला नक्की भेट द्या.

लोणार सरोवर, महाराष्ट्र-
लोणार सरोवर हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. लोणार सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लोणार सरोवराच्या आसपासची वैविध्यपूर्ण झाडे आणि वनस्पती त्याच्या सौंदर्यात भर घालतात.

लेह,लडाख-
लेह हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. हिमालयाच्या कुशीत वसलेले लेह साहसी मोहीमांकरिता अतिशय रोमांचक ठिकाण आहे. येथील पर्वत आणि सुंदर तलाव मन प्रसन्न करतात. येथे भेट देण्यासारखी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. जर तुम्ही अजून लेहला गेला नसाल तर एकदा नक्की जाऊन या.

की गोम्पा मॉनेस्टी, हिमाचल प्रदेश- हिमाचल प्रदेशात स्थित की गोम्पा मॉनेस्टी मठ आहे. हे ठिकाण एका नदीकाठी वसलेले असून समुद्रसपाटीपासून १३,६६८ फूट उंचीवर आहे. येथील सुंदर दृश्यं हॉलिवूड चित्रपटातील दृश्यांनाही लाजवतील.

होगेनक्कल धबधबा, तामिळनाडू- होगेनक्कल धबधब्याला नियाग्रा धबधबा म्हणूनही ओळखलं जाते. हे ठिकाण निसर्ग प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. या धबधब्याचे दृश्य पाहण्यासारखे आहे. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.

जंस्कार पर्वतरांग-
जर गोठलेल्या नद्यांवर ट्रेक करण्याची इच्छा असेल, तर हिमाचलच्या जंस्कारकडे जायला हवं. दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात येथील नद्या गोठतात. नद्यांवर गोठलेल्या बर्फावर चालणे थोडे धोकादायक आहे, परंतु हिमालयाचे मनमोहक दृश्य, गोठलेले धबधबे आणि प्राचीन मठांचे सुंदर दृश्य हे सारे सुखावणारे आहे.
Esakal