मागील आठवड्यापासून केरळात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यात भयंकर स्थिती निर्माण झालीये. पूरपरिस्थिती आणि भूस्खलनामुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. काही ठिकाणी पुराचं पाणी शिरल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये लग्नाला जाण्यासाठी निघालेल्या वधू-वराला पाण्यातून मार्ग काढत लग्नस्थळापर्यंत पोहोचावं लागलंय. आश्चर्चकारक गोष्ट म्हणजे या दाम्पत्याने जेवणासाठी वापरणाऱ्या मोठ्या कढईचा उपयोग केला. या भांड्यात बसून दोघेही तरंगत लग्नमंडपात दाखल झाले.

सौजन्य – पीटीआय
थलावडी येथे हा लग्नसोहळा जवळच्या मंदिरात मर्यादित नातेवाईंकाच्या उपस्थितीत पार पडला. आरोग्य कर्मचारी असलेल्या या जोडप्याच्या अनोख्या होडीचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आकाश आणि ऐश्वर्या हे जोडपे स्वयंपाकाच्या भांड्यात बसून लग्नस्थळाच्या दिशेने प्रवास करताना दिसत असल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. जिल्ह्यातील वाढत्या पाणीपातळीचं कव्हरेज करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना हे समजलं. यानंतर ते थेट लग्नमंडपात पोहोचले. यावेळी कुटुंबीयांनी पत्रकारांना माहिती दिली.
पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहे. वधू-वर लग्नस्थळी येण्यासाठी निघाले. मात्र, पाणी भरल्याने दोघांना या मोठ्या कढईत बसवून आणण्यात आलं. सोमवारी लग्न करण्याचे नियोजित होते. पावसामुळे शुभमुहूर्त टळून लग्नाला उशीर होऊ नये, यासाठी दोन्हीकडचे नातेवाईक दोन दिवसांपूर्वीच पोहोचले होते. मात्र, दोन दिवसांची मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे स्वयंपाकाच्या भांड्यात बसून लग्नसोहळ्यापर्यंत मार्गस्थ व्हावं लागलं. हा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Esakal