पुणे – ‘सणासुदीत दिवाळीला पूर्वी रेशनवर गहू, तांदळासोबतच पाम तेल, साखर, चणा डाळ, रवा-मैदा मिळायचा. हळू-हळू रवा व मैदा गेला, पुन्हा पाम तेल बंद झाले. मागच्या दिवाळीत काहीजणांना चणा डाळ आणि साखर मिळाली. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून आर्थिक परिस्थिती खराब आहे. रेशनवर निकृष्ट दर्जाचा तांदूळ दिला जात आहे. आम्हीही माणसंच आहोत, असा खराब तांदूळ कसा खायचा? किमान यंदाच्या दिवाळीत पाम तेल, साखर, चणा डाळ उपलब्ध करून द्यावी. गरीब लोकांची दिवाळी तरी व्यवस्थित जाऊ द्या,’ ही प्रातिनिधीक मागणी आहे मार्केट यार्डलगतच्या आंबेडकर नगरमधील सचिन पवार यांची.
रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत दिला जातो. पुढील नोव्हेंबरपर्यंत हे धान्य मोफत दिले जाईल. राज्य सरकारकडून दोन रुपये किलो दराने तीन किलो गहू आणि तीन रुपये दराने दोन किलो तांदूळ दिला जात आहे. त्यातही तांदळाचा दर्जा खराब असून, तो कसाबसा खावा लागत असल्याची भावना आंबेडकर नगरमधील नागरिकांनी व्यक्त केली.
या संदर्भात अन्नधान्य वितरण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘यापूर्वी भारतीय खाद्य महामंडळाकडून (एफसीआय) मध्यप्रदेश, पंजाब आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून रेल्वेने एफसीआयच्या गोदामांपर्यंत तांदूळ येत होता. सध्या भंडारा आणि गोंदियामधून ट्रकद्वारे वाहतूक करून तांदूळ मागविण्यात येत आहे. परंतु, पावसात भिजल्यामुळे तांदूळ खराब झाला आहे.’

हेही वाचा: पुणे : उपायुक्ताच्या घरी सापडली सव्वा कोटींची रोकड
विश्वजित कदम यांनी बैठक घ्यावी
राज्य सरकारने अनुदान बंद केल्यामुळे पाच वर्षांपासून रेशनवर पामतेल देणे बंद केले आहे. गेल्या दिवाळीत साखर उपलब्ध करून दिली होती. यावर्षी दिवाळीत पाम तेल, रवा, मैदा, चणा डाळ आणि साखर उपलब्ध करून द्यावी, अशी शिधापत्रिकाधारकांची मागणी आहे. यासाठी रेशन दुकानदार संघटना अन्नधान्य वितरण कार्यालयाला निवेदन देणार आहे. रेशन दुकानदार आणि शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नांबाबत राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी प्रशासन आणि रेशन दुकानदार संघटनेची एकत्रित बैठक बोलवावी, अशी मागणी संघटनेचे शहराध्यक्ष गणेश डांगी यांनी केली आहे.
लॉकडाउनच्या कालावधीत नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. सरकारने रेशन दुकानांतून गहू, तांदूळ यासोबतच तेल, साखर, रवा, मैदाही उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आम्हाला फराळाचे गोडधोड पदार्थ करून दिवाळीचा सण साजरा करता येईल.
– विजय कोठावळे, शिधापत्रिकाधारक, टिंबर मार्केट
दिवाळीत सणासुदीच्या कालावधीत रेशनवर साधारणपणे साखर, चणाडाळ उपलब्ध करून दिली जाते. या संदर्भात शासनस्तरावर अद्याप काही निर्णय झालेला नाही.
– सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी
Esakal