सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election 2021) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कऱ्हाड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Adv. Udaysingh Patil-Undalkar) यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे याच मतदारसंघातून निवडणुकीची तयारी केलेले सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळसाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) कोणत्याही परिस्थितीत सहकारमंत्र्यांना याच मतदारसंघातून निवडून आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे याबाबत राष्ट्रवादीचे नेते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरवात झाली आहे. त्यामुळे कोण कोणत्या मतदारसंघातून अर्ज दाखल करतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सुमारे ५७ अर्जांची विक्री झाली असून, यामध्ये अनेक आजी, माजी संचालकांनी अर्ज विकत नेले आहेत. आज पहिल्याच दिवशी (कै.) विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून आज अर्ज दाखल केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच मतदारसंघातून सहकारमंत्री पाटील यांनी जिल्हा बँकेत संचालक म्हणून येण्याची तयारी केली होती. त्यानुसार त्यांनी ठरावही केले आहेत. यापूर्वी सहकारमंत्र्यांना निवडून येऊन संचालक होता आलेले नाही. एकदा खासदार उदयनराजेंकडून, तर एकदा ॲड. उदयसिंह पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

हेही वाचा: Facebook पोस्टमुळे बांगलादेशात पुन्हा भडका; हल्लेखोरांनी जाळली हिंदूंची 20 घरं

उदयसिंह पाटील-उंडाळकर

उदयसिंह पाटील-उंडाळकर

यावेळेस सहकारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक होत असल्याने त्यांना कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून निवडून आणण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्यांच्या नावाचे सोसायट्यांचे ठरावही करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून इच्छुक असलेले काकांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना इतर मतदारसंघातून ॲडजेस्ट करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे ॲड. उंडाळकर यांनी आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. १९६७ मध्ये कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून विलासराव पाटील (काका) यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग ११ वेळा याच मतदारसंघातून काका बँकेत संचालक राहिले. बँकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष व मार्गदर्शक अशा भूमिका बजावत सातारा बँकेचा नावलौकिक देशभर वाढवला. काकांचा वारसा राजकारण, समाजकारणाबरोबर सहकारात चालवण्यासाठी ॲड. उदयसिंह पाटील यांनीच काकांच्या जागेवर निवडणूक लढवावी, असा आग्रह कऱ्हाड तालुक्याबरोबर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी धरला होता. उदयसिंह पाटील यांनी या सूचनेनुसार वरिष्ठ नेतेमंडळीच्या सल्ल्याने व कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातील मतदारांशी चर्चा करून उमेदवारी निश्चित केली होती. आज पहिल्याच दिवशी त्यांनी अर्ज दाखल करत विलासकाकांचा वारसा व सेवा सोसायट्यांशी असलेली बांधिलकी जोपासण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हेही वाचा: भारत-पाक सामन्यानं प्रश्न सुटणार नाही, भाजपनं काश्मीरवर बोलावं – संजय राऊत

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here