उत्तराखंडमधील जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे. हा भारतातील प्रमुख व्याघ्रप्रकल्प असून वाघांचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. आधी कोरोना आणि नंतर आलेल्या पावसाळ्यामुळे हे उद्यान पर्यटकांसाठी अनेक दिवसांपासून बंद होते. त्यानंतर या उद्यानाचा बिजराणी झोन शुक्रवारपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ५० हून अधिक पर्यटक बिजराणी, ढेला आणि झिरणा येथे रात्रीच्या मुक्कामासाठी रवाना झाले. बिजराणी झोन पर्यटकांसाठी दिवसाही खुला करण्यात आल्यामुळे रामनगरमध्ये पर्यटकांच्या हालचालीही वाढल्या. यामुळे कॉर्बेटसह रामनगरमधील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.

हेही वाचा: दिवाळीला परदेशात सुट्टयांचा प्लॅन करताय? ही ठिकाणे आहेत उत्तम

शुक्रवारी सकाळी बिजराणी गेटवरून पर्यटक जंगल सफारी आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी रवाना झाले. मदन जोशी म्हणाले की, पावसामुळे बिजराणी झोन दरवर्षी ३० जून ते १५ ऑक्टोबर पर्यंत बंद असतो. १५ ऑक्टोंबरला बिजराणी झोनसोबतच ढेला, झिरणा आणि बिजराणी येथे रात्री मुक्कामास परवानगी दिली जाते. कॉर्बेट पार्कचे संचालक राहुल यांनी सांगितले की, प्रसिद्ध ढिकला झोन १५ नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी केली जात आहे. बिजराणीमध्ये सकाळी ५० जिप्सी आणि संध्याकाळी शिफ्टमध्ये ३० जिप्सी पर्यटकांना जंगल सफारीसाठी घेऊन जातात. जिप्सीमध्ये जास्तीत जास्त सहा लोकांना बसण्याची परवानगी आहे. सर्वप्रथम दिल्लीतील पर्यटक जंगल सफारीला गेले.

रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष हरीमन सिंह म्हणाले की, रामनगरमधील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स पुढील दहा दिवसांसाठी पुर्ण क्षमतेने भरलेली आहेत. १० ते १५ हजार पर्यटक रामनगरला पोहोचले आहेत. दुसरीकडे पार्कचे संचालक राहुल यांनीही कॉर्बेटचे बुकिंगही पूर्ण झाल्याचे सांगितले.

  वाघ

वाघ

पहिल्याच दिवशी वाघाचं दर्शन-

बिजराणीचे रेंजर बिंदर पाल यांनी सांगितले की, बिजराणी उघडण्याच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांना दोनवेळा वाघाचं दर्शन घडून आलं. बिजराणी झोनमध्ये वाघ सहजपणे दिसतात. त्यामुळे बिजराणी झोनचे जंगल सफारी मार्ग अनेक पर्यटकांना खूप उत्साहित करतात.

३३७ लोकांनी केली बिजराणीची सफारी-

रामनगर रेंजरनी सांगितले की, बिजराणी झोनमध्ये पहिल्या खेपेत ३० तर दुसऱ्या वेळी ३० जिप्सी गाड्या पर्यंटकांना जंगल सफारीसाठी घेऊन गेल्या. पहिल्या सफारीमध्ये १५८ लोकांनी भेट दिली. गर्जिया झोनमध्येही १३८ पर्यटकांनी भेट दिली. ते म्हणाले की, संध्याकाळी १७९ लोक बिजराणीमध्ये सहलीला गेले, तर १६६ लोकांनी गर्जिया झोनमध्ये जंगल सफारी केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here