विरार: मुंबईच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघात झील आणि बतूल या विरारच्या दोघींची निवड झाली होती. त्यानंतर आता मुंबईच्या महिलांच्या सिनियर (ज्येष्ठ) क्रिकेट संघात विरारच्या तीन मुलींची निवड झाली आहे. जान्हवी काटे, रिया चौधरी आणि जाग्रवी पवार यांची मुंबईच्या सीनियर महिला संघात निवड झाल्याची माहिती आहे. मुंबईचा महिला संघ BCCI मार्फत घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील साखळी स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धा ३१ ऑक्टोबरपासून पुणे येथे होणार आहेत.
हेही वाचा: T20 WC: टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू सामना फिरवू शकतो – लक्ष्मण
जान्हवी काटे, रिया चौधरी आणि जाग्रवी पवार यांची या तिघींची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या तीनही खेळाडू मागील ५ वर्षांपासून अमेया स्पोर्ट्स अकादमीमार्फत चालवण्यात येणाऱ्या गोल्डन स्टार क्रिकेट अकादमीमध्ये शिकत आहेत. प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्याकडून या तिघींनी प्रशिक्षणाचे धडे घेतले आहेत. मागच्या वर्षीही या तिघींची याच गटात निवड झाली होती.

हेही वाचा: T20 WC: ‘मेंटॉर’ धोनीचा पहिला फोटो व्हायरल; लाईक्सचा वर्षाव!
१९ वर्षांची जान्हवी काटे ही उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते व उजव्या हाताने फलंदाजी करते. तर २० वर्षाची रिया चौधरी ही यष्टिरक्षक असून सुंदर फलंदाजी करते. २० वर्षांची जाग्रवि पवारदेखील उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी व फलंदाजी करते. जान्हवी काटेने मागच्या वर्षी २३ वर्षाखालील महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत चांगले कौशल्य दाखवत BCCI मार्फत होणाऱ्या चॅलेंजर स्पर्धेत इंडिया रेड संघात निवड झाली होती. रिया चौधरी हिची नॅशनल क्रिकेट अकॅडमीतर्फे १९ वर्षांखालील मुलींच्या बेंगळुरू येथील प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली होती. नुकतीच या तिघींची निवड झाल्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या साऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षा केला जात आहे.
Esakal