T20 World Cup 2021 स्पर्धेत भारताने पहिला सराव सामना जिंकला. लोकेश राहुल (५१) आणि इशान किशन (७०) या सलामी जोडीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताने १८९ धावांचे आव्हान ६ चेंडू आणि ७ गडी राखून पार केले. त्याआधी जॉनी बेअरस्टो (४९), मोईन अली (४३) आणि लियम लिव्हिंगस्टोन (३०) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने १८८ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने १ षटक राखून हा सामना जिंकला. आज भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध सराव सामना होणार आहे. त्याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि गौतम गंभीर या दोघांनी संघाचा X-फॅक्टर कोण आहे, याबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

गौतम गंभीर
विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, इशान किशन, वरूण चक्रवर्ती असे विविध खेळाडू सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. आपापल्या कामगिरीमुळे त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. मात्र, इरफान पठाण आणि गौतम गंभीर या दोघांनी संघातील X- फॅक्टर खेळाडू म्हणून एका वेगळ्याच खेळाडूची निवड केली आहे. “लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, वरूण चक्रवर्ती हे सारेच खेळाडू उत्तम आहेत. पण भारतीय संघाचा X फॅक्टर जसप्रीत बुमराह आहे”, असं मत गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं.

इरफान पठाण
“आपण जेव्हा वरूण चक्रवर्तीबद्दल बोलतो त्यावेळी मी एक सांगू शकतो की तो नक्कीच चमकदार कामगिरी करेल. त्याच्याकडे गोलंदाजीत दमदार कामगिरी करण्याची कला आहे. त्यातच त्याचा फॉर्म साऱ्यांनी IPL मध्ये पाहिला आहे. पण असं असलं तरीही गोलंदाजीचा विचार केला तर माझ्यासाठी जसप्रीत बुमराह हाच संघातील X फॅक्टर आहे. बुमराहपेक्षा मोठा गेमचेंजर संघात कोणीही नाही”, असं मत इरफान पठाणने व्यक्त केलं.
Esakal