जुनी सांगवी : सद्यस्थितीमध्ये कोरोनाची लस घेणे सर्वांसाठी महत्वाचे आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने शिक्षण व्यवस्था सुरू होत असताना शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या विद्यार्थी घटकांचे संपूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सजग राहत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधून प्रथमच विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारत सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी कोविड लसिकरण शिबिराचे आयोजन केले.
आयोजित केलेले लसीकरण शिबिर हे निश्चितच कौतुकास्पद असून सर्व महाविद्यालयांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी महाविद्यालयास भेट देवून काढले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सांगवी रुग्णालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ यांनी आयोजन केले होते.
व कोरोना प्रतिबंधक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित लसीकरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी संदीप कदम, डॉ. पराग काळकर, डॉ. संतोष परचुरे, प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.
लसीकरण मोहिमेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सांगवी रुग्णालय, थ्री एम कंपनी, युनिटेड वे, बेंगलोर व वॅक्सीन ॲान व्हील्स या संस्थांनी विशेष सहकार्य केले. शिबिराच्या सुरूवातीला महाविद्यालयामध्ये उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये १२३ शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व १६० विद्यार्थी असे एकुण २८३ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली.
यावेळी सर्वांची अँटिजन टेस्ट नकारात्मक आली. सदर लसीकरण शिबिरामध्ये सांगवी रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, डॉ. रवींद्र मंडपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर हांडे, डॉ. श्रद्धा कोकरे तसेच 3 एम कंपनीच्या डॉ. योगिता सावंत, डॉ. माधवी गाडवे यांच्या नेतृत्वाखालील चमूने लसीची एक मात्रा घेतलेल्या व एकही मात्रा न घेतलेल्या प्रकारांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी गटाचे स्वतंत्र वर्गीकरण करत एक मात्रा झालेल्या ५६ व एकही मात्रा न झालेले १०३ असे सुमारे १५९ विद्यार्थ्यांचे दिवसभरात यशस्वी लसीकरण केले.
Esakal