मोहोळ(सोलापुर) : ऊस तोडणी मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिना वय असलेल्या बालकाचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले. हा अपघात मोहोळ नरखेड रस्त्यावरील देशमुख वस्ती जवळ दुपारी साडेचार वाजता झाला. अर्णव अनिल चव्हाण असे मृत बालकाचे नाव आहे. तर प्रियंका भाऊसाहेब चव्हाण वय 13 ,शांताबाई बबन राठोड वय 40, सुनिता भाऊसाहेब चव्हाण वय 35, कलुबाई तात्याराम आडे वय 20 ,उषाबाई संदीप चव्हाण वय 40, सचिन श्रीमंत साळुंखे वय 25, बाळासाहेब माणिक चव्हाण वय 45,शानुबाई बाळासाहेब चव्हाण वय 40, उमा सोमनाथ चव्हाण, सर्व रा. वडवणे जि. बीड अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचा: राजीनाम्यानंतर सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, चर्चांना उधाण

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर क्रमांक एम एच 23 टी 2398 मधून सर्व ऊस तोडणी कामगार भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्यावर ऊसतोडणी साठी निघाले होते. ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असताना तो मोहोळ- नरखेड रस्त्यावरील देशमुख वस्ती जवळ आल्यावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. त्यात वरील नऊ जण जखमी झाले तर एका बालकाचा मृत्यू झाला. दरम्यान जखमीं पैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची खबर सोमनाथ धनु चव्हाण रा वलीपुर तांडा यांनी मोहोळ पोलिसात दिली असून ,ट्रॅक्टर चालक सचिन श्रीमंत साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here