धरण, पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाचं आपापल्या भागातील धरणाकडं लक्ष असतं. ते किती भरलं, कधी भरेलं? हे जाणून घेण्यासाठी दररोज त्याचे अपडेट्स घेत असतो. कारण, त्यातूनच तर वर्षभर पिण्यासाठी, शेती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी गरज पूर्ण होते. मग, तुम्हाला माहितीये का या धरणांचा इतिहास किती पुरातन आहे ते. चला जाणून घेऊयात.

प्राचीन काळात इजिप्त अन् चीनमध्ये धरणं बांधली गेली. इ.स.पूर्व 2900 च्या सुमारास नाईल नदीवरील कोशेस याठिकाणी धरण बांधण्यात आलं. त्याची उंची 15 मीटर असून, ते सर्वांत प्राचीन मानलं जातं. इ.स.पूर्व 2700 मध्ये त्याच नदीवर बांधलेल्या ‘साद एल काफारा’ या दगडी धरणाचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. याशिवाय भारतात इ.स. 500-1800 या काळात अनेक मातीची धरणं बांधली गेली.

हेही वाचा: नोबेल पुरस्कारांची अशी झाली सुरुवात…!

1869 मध्ये पुणे शहराजवळ खडकवासला येथे पहिलं मोठं दगडी धरण बांधलं गेलं. पाणी अन् जमिनीची धूप थांबावी म्हणून रोमन लोकांनी इटली, उत्तर आफ्रिका व स्पेनमध्ये दगडी धरणं बांधली. तसंच, चौदाव्या शतकात इराणमध्ये पहिलं केबर नावाचं कमानी धरण बांधलं. दरम्यान, 1960मध्ये भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाल्यानं पाण्याची गरज वाढली. त्याच सुमारास उद्योगही सुरू झाले अन् जलउर्जेची मागणी वाढली. 2006मध्ये चार हजार 50 धरणं पूर्ण, तर 475 धरणांचं बांधकाम चालू होतं. यामुळेचं 1950 ते 1993मध्ये भारत हा वर्ल्ड बँकेकडून सर्वांत जास्त कर्ज काढणारा देश ठरला. हा झाला धरणांचा इतिहास. आता भारतातील टॉप 10 महाकाय धरणांबद्दल जाणून घेऊयात.

  टिहरी धरण

टिहरी धरण

● धरण : टिहरी

● कुठे : उत्तराखंड

● कोणत्या नदीवर : भागीरथी

● किती उंची : 260 मीटर

● किती लांबी : 575 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 3540 एमसीएम (मिलियन क्यूबिक मीटर)

देशातील सर्वांत उंचावर बांधलेलं धरण अशी याची ख्याती. शिवाय एवढ्या उंचावर बांधलेली धरणेही जगात कमीच आहेत. या धरणाचा पहिला टप्पा 2006 मध्ये, तर दुसरा टप्पा 2012 मध्ये पूर्ण झाला. सिंचनासोबतच पाणीपुरवठा अन् वीजनिर्मिती करणं हा या धरणामागचा उद्दिष्ट. या धरणाच्या पॉवरहाऊसपासून निर्माण झालेली वीज उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, हरयाणा, जम्मू-काश्मीर, राजस्थान व हिमाचल प्रदेश या राज्यांना पुरविली जाते. तसंच, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व दिल्लीला पिण्यासाठी पुरवठा केला जातो.

  भाक्रा धरण

भाक्रा धरण

● धरण : भाक्रा

● कुठे : हिमाचल प्रदेश

● कोणत्या नदीवर : सतलज

● किती उंची : 226 मीटर

● किती लांबी : 520 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 9867.84 एमसीएम

‘उगवत्या भारताचं तीर्थक्षेत्र’ असं माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धरणाला संबोधलं होतं. तसंच धरणाला गुरू गोविंदसिंग यांच्या नावानं ओळखलं जातं. पंजाबच्या सीमेपासून 13 किलोमीटर अंतरावर हे धरण बांधण्यात आलंय. 1963 मध्ये धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. दोन वीजनिर्मिती केंद्रांमधून एक हजार 361 वीज निर्माण होते, ती पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि चंडिगड यांना पुरविली जाते. हरितक्रांतीसाठी धरणाचं पाणी उपयुक्त ठरलं होतं. विशेष म्हणजे प्रकल्पाला सुरुवात झाल्यापासून पंडित नेहरूंनी तब्बल 13 वेळी भेट दिलीय.

सरदार सरोवर धरण

सरदार सरोवर धरण

● धरण : सरदार सरोवर

● कुठे : गुजरात

● कोणत्या नदीवर : नर्मदा

● किती उंची : 138 मीटर

● किती लांबी : 1210 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 9500 एमसीएम

जगातील दुसरे सर्वांत मोठे धरण. याचं भूमिपूजन 5 एप्रिल 1961 ला पंडित नेहरू यांच्या हस्ते झालं. पण, 1987 मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. 56 वर्षांनी धरण पूर्ण झालं. एका वीज प्रकल्पाची 1200 मेगावॅट, तर दुसऱ्या प्रकल्पाची 250 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता आहे. तसंच, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना वीज पुरवली जाते. या धरणातून 131 शहरं, तर 9633 गावांना पाणीपुरवठा केला जातो. जगात अमेरिकेतील ग्रँड कुली धरणानंतर सरदार सरोवरचा नंबर लागतो.

हिराकुड धरण

हिराकुड धरण

● धरण : हिराकुड

● कुठे : ओडिशा

● कोणत्या नदीवर : महानदी

● किती उंची : 60.96 मीटर

● किती लांबी : 4.8 किलोमीटर

● पाणी साठवण क्षमता : 5896 एमसीएम

धरणाच्या बांधकामाला 1947 मध्ये सुरुवात झाली, ते 1953 मध्ये पूर्ण झालं. हे धरण लामडुंग्री व चंडिलीडुंग्री या डोंगरांदरम्यान बांधलं आहे. याचा आशियातील मोठं व मातीचं लांब धरण म्हणून लौकिक आहे. धरणाखाली बुर्ला व चिपीलीमा हे दोन वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. त्यांची 307.5 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता आहे. ओडिशा, बिहार, झारखंड या राज्यांना वीज पुरविली जाते.

नागार्जुन सागर धरण

नागार्जुन सागर धरण

● धरण : नागार्जुन सागर

● कुठे : तेलंगणा

● कोणत्या नदीवर : कृष्णा

● किती उंची : 124 मीटर

● किती लांबी : 1550 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 450 टीएमसी

भारतातील सर्वांत मोठा अन् जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मानवनिर्मित जलाशय. कृष्णा नदीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीचे चिरेबंदी धरण बांधून 285 चौ. किमी. विस्ताराचं हे धरण निर्माण केलं. ऑक्टोबर 1955 मध्ये नागार्जुन नियंत्रण मंडळ स्थापन झालं, तर डिसेंबर 1955 मध्ये पंडित नेहरूंनी धरणाचं भूमिपूजन केलं. तसंच, याचं चतुर्थ पंचवार्षिक योजनेत काम पूर्ण झालं. धरणाला दोन भव्य कालवे खोदले आहेत. तसंच, धरणालगत चार वीज केंद्रांद्वारे अनुक्रमे 850, 90, 60 व 700 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.

  कोयना धरण

कोयना धरण

● धरण : कोयना

● कुठे : महाराष्ट्र

● कोणत्या नदीवर : कोयना

● किती उंची : 103.02 मीटर

● किती लांबी : 807.72 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 2980.69 एमसीएम

कोयना नदीवर 1963 मध्ये धरण बांधण्यात आलं. हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठं धरण आहे. या धरणाला ‘शिवसागर’ म्हणूनही ओळखलं जातं. 1920 मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. धरण क्षेत्रातील नेहरू उद्यान प्रेक्षणीय आहे. धरणाच्या दुसऱ्या टोकाला तापोला नावाचं गाव आहे. तिथं कोयना, सोलाशी अन् कंदोटा नद्यांचं उगमस्थान. या ठिकाणी बोटिंग आणि इतर पर्यटक सुविधा उपलब्ध आहेत. धरणाच्या काठावर कोयना अभयारण्य वसलेलं आहे.

  इंदिरा सागर धरण

इंदिरा सागर धरण

● धरण : इंदिरा सागर

● कुठे : मध्य प्रदेश

● कोणत्या नदीवर : नर्मदा

● किती उंची : 92 मीटर

● किती लांबी : 653 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 12220 एमसीएम

23 ऑक्टोबर 1984 ला धरणाच्या कामाला सुरुवात झाली. 31 मे 2005 ला त्याच काम पूर्ण झालं. या धरणाची वीजनिर्मिती क्षमता एक हजार मेगावॅट एवढी आहे. इंदिरा सागर हा सरदार सरोवर धरणाच्या वरच्या बाजूला असलेला बहुउद्देशीय प्रकल्प आहे. 16 मे 2000 रोजी मध्य प्रदेश सरकार आणि राष्ट्रीय जलविद्युत विकास महामंडळ यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार मध्य प्रदेश सरकार आणि राष्ट्रीय जलविद्युत विकास महामंडळ इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर प्रकल्पाची बांधकाम कामे हाती घेतली.

रिहंद धरण

रिहंद धरण

● धरण : रिहंद

● कुठे : उत्तर प्रदेश

● कोणत्या नदीवर : रिहंद

● किती उंची : 91.46 मीटर

● किती लांबी : 934.45 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 10.6 बीसीएम (बिलियन क्यूबिक मीटर)

हे धरण उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर बांधण्यात आलंय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांशिवाय बिहारला देखील सिंचनाचा लाभ होतो. धरणाचं काम 1954 पासून सुरू होऊन 1962 मध्ये पूर्ण झालं. या धरणामुळे निर्माण झालेल्या सरोवराला गोविंद वल्लभपंत सागर असे नाव ठेवण्यात आलं. इथं 50 मेगावॅटची सहा जनित्रे बसविण्यात आली आहेत. शिवाय धरण परिसरात अनेक वीजनिर्मिती केंद्रे आहेत, जिथं कोळशापासून वीजनिर्मिती केली जाते. या केंद्रांमधून 20 हजार मेगावॅट वीज निर्माण होते.

मेत्तूर कृष्ण राजा सागर

मेत्तूर कृष्ण राजा सागर

● धरण : मेत्तूर

● कुठे : तमिळनाडू

● कोणत्या नदीवर : कावेरी

● किती उंची : 37 मीटर

● किती लांबी : 1700 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 93.47 टीएमसी

कावेरी नदीखोरे अन् त्रिभुज प्रदेशातील शेतीचा विकास व्हावा, पावसाळ्यातील नदीपुराचे नियंत्रण व उन्हाळ्यात पाणीपुरवठा ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 1834 मध्ये स्थापत्य अभियंता सर ऑर्थर कॉटन यांनी कावेरी नदीखोऱ्याची प्राथमिक पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कावेरी नदीवर धरण बांधण्याची योजना तयार केली. ‘कावेरी प्रोजेक्ट’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या योजनेत मेत्तूरच्या वरच्या बाजूस पालामली सीतामलई या टेकड्यांदरम्यान दरीत धरण बांधण्याची योजना होती. परंतु, त्याला शेजारील संस्थानाकडून विरोध झाला. दरम्यान, 21 ऑगस्ट 1934 ला धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. या धरणाच्या कालव्यांवर 200 मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती केंद्र उभारण्यात आली. मेत्तूर धरण व हिरव्यागार टेकड्या आदींमुळे परिसर निसर्गसुंदर बनला असून, पर्यटनाच्या दृष्टीने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कृष्ण राजा सागर धारण

कृष्ण राजा सागर धारण

धरण: कृष्ण राजा सागर

● कुठे : कर्नाटक

● कोणत्या नदीवर : कावेरी

● किती उंची : 39.8 मीटर

● किती लांबी : 2620 मीटर

● पाणी साठवण क्षमता : 49.45 टीएमसी

या धरणाचं बांधकाम 1911 मध्ये सुरू होऊन 1932 मध्ये पूर्ण झालं. या धरणाला ‘केआरएस’ या नावानंही ओळखलं जातं. मैसूरचे कृष्ण राजा वाडियार चतुर्थ महाराज यांनी गंभीर आर्थिक स्थिती असतानाही, दुष्काळामुळे या धरणाची निर्मिती केली. त्यामुळं त्यांचं नाव धरणाला दिलं गेलं. धरणाशेजारीच एक वृंदावन उद्यान आहे. हे धरण मैसूर, मांड्या, बंगळूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे. या धरणाचं पाणी तमिळनाडू राज्यात वाहत जातं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here